मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अद्याप कायम असून आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरी अध्यक्षपद निवडले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या अधिवेशनात देखील यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष होण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.
९ मार्च रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी, याबाबत राज्य सरकारने २३ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले आहे. मात्र, राज्यपालांनी अजूनही त्याला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे राज्यपालांना पुन्हा एकदा स्मरण पत्र देण्याबाबत सरकार मध्ये विचार सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक होणार का, यावर प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे.
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर वर्षभर अध्यक्षपद रिक्त आहे. नियम बदलून आवाजी मतदानाने निवड करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाला विरोधी पक्षाने विरोध दर्शवला. तर २७, २८ डिसेंबरला निवडणूक घेण्याचा कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला. मात्र निवडणुकीत आवाजी मतदान घटनाबाह्य असल्याचं उत्तर राज्यपालांनी दिलं. राज्यपालांनी परवानगी न दिल्यानं सरकारने पत्र पाठवलं. त्यानंतर राज्यपालांनी त्या पत्राला उत्तर पाठवलं. काँग्रेस अध्यक्ष निवड करण्यावर ठाम आहे तर राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवड करण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली होती.