इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर
रशियाने युक्रेनवर युद्ध लादून आठ दिवस होत आले, दोन्ही बाजूचे शेकडो सैनिक आणि युक्रेनमधील कित्येक निरापराधी लोक मृत्युमुखी पडले. क्षेपणास्त्र आणि रॅाकेट लाँचर्सच्या तुफानी माऱ्यात कितीजणांचे प्राण गेले, याचा अंदाज करवत नाही. एकमेकांच्या सैन्य दलावरच नव्हे, तर युक्रेनमधील लहान-मोठ्या नागरी वस्त्यांवर मुक्तपणे बॅाम्बहल्ले चालू आहेत. युद्धाने युक्रेनचे तर प्रचंड नुकसान होत आहे. रशियन सैनिकांचीही मोठ्या संख्नेो रोज आहुती पडत आहे. अन्नधान्याचा साठा संपत चालला आहे. इंधनाचा तुटवडा भासू लागला आहे. युक्रेनच्या नागरिकांना रशियन सैन्याशी लढण्यासाठी देशानेच शस्त्रे दिली आहेत. रशियन सैन्याबरोबर युक्रेनमधील घरांघरातील प्रत्येकजण जिद्दीने लढत आहे.
शरण या किंवा मृत्यूला सामोरे जा, एवढाच पर्याय या युद्धात आहे. दोन्ही देश माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. रशियाने पुकारलेल्या युद्धाबद्दल जगातील बहुसंख्य देशांनी नापसंती व निषेध प्रकट केला असला तरी रशियाला रोखण्यासाठी थेट पुढे कोणी येत नाही, हेच गेल्या आठ दिवसांत बघायला मिळाले.
युक्रेनमधे उच्च शिक्षणासाठी गेलेले वीस हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी तेथे अडकले आहेत, त्यांना घरात किंवा बंकरमधे कोंडून बसावे लागले आहे. त्यांची उपासमार होत आहे. युक्रेनच्या सरहद्दीवर असलेल्या पोलंड किंवा अन्य देशांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मदत आणि मार्गदर्शन मिळत नाही. युक्रेनमधे त्यांना विचारत नाहीत, ते कोणाशी लढू शकत नाहीत आणि मायदेशी परतण्यासाठी भारत सरकारने पाठविलेल्या विमानांशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात मोबाइल फोन नव्हते, व्हॉट्सअॅप नव्हते, सोशल मीडिया नव्हता आणि इंटरनेटही नव्हते. आता या सर्व सुविधा सर्वत्र उपलब्ध असल्याने एका मोबाइल फोनमध्ये सारे जग एकवटले आहे. मुंबई- दिल्लीपासून हजारो किमी. दूर असलेल्या युक्रेनमध्यर संकटात सापडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची कशी दयनीय अवस्था आहे, हे सोशल मीडियावर बघायला मिळत आहे.
सोशल मीडियावर तेथील दृश्ये, भारतीय विद्यार्थ्यांची झालेली केविलवाणी अवस्था, रस्त्यावर चालू असलेले युद्ध, अहोरात्र चालू असलेले बॅाम्बहल्ले, सायरन वाजवत धावणाऱ्या मोटारी आणि रुग्णवाहिका, आगीचे लोळ, उणे पाच सेल्सिअस तापामान असलेली हाडे गोठवणारी थंडी यांचे व्हीडिओ रोज व्हायरल होत आहेत. युक्रेनमधून अन्य देशांत निघून जाण्यासाठी हजारोंच्या झुंडीच्या झुंडी मेट्रो स्टेशनकडे जाताना दिसतात. ट्रेन नसते वा मिळत नाही किंवा युक्रेनचे सुरक्षा दल तिकडे जाऊ देत नाही, यामुळे हजारो लोक हतबल होऊन स्टेशनवर बसलेले दिसतात. सगळीकडे लांबलचक रांगा दिसून येत आहेत. सर्वत्र रडारड चालू आहे.
युद्धाच्या खाईत लोटल्या गेलेल्या युक्रेनमधून बाहेर कसे पडायचे या एकाच प्रश्नाने सर्वांना घेरले आहे. कोणी भितीने आजारी पडले आहे, कोणाला नैराश्याने घेरले आहे. कोणाला आपल्या भविष्याची चिंता लागली आहे. भारतात आपल्या घरी आपल्या कुटुंबात पोहोचू शकणार नाही, या विचाराने हजारो भारतीय नागरिक व विद्यार्थी सैरभैर झाले आहेत.
दि. २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी टेलिफोनवरून चर्चा केली. हिंसाचार थांबविण्याचे त्यांना आवाहन केले. पण त्यानंतर मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना विशेषतः विद्यार्थ्यांना मायदेशात परत कसे आणता येईल, यावर सर्व लक्ष केंद्रीत केले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी देशांत पाठवले व तेथून भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आपल्या देशात आणण्याची जबाबदारी सोपवली. ज्योतिरादित्य शिंदे यांना रूमानियात, जनरल व्ही. के. सिंग यांना पोलंड, हरदीपसिंग पुरी यांना हंगेरीत, किरण रज्जू यांना स्लोवाकियात पाठवले. पोलंड, हंगेरी, रूमानियाच्या सरहद्दीवरून युक्रेनमधील भारतीय विद्यर्थ्यांना कसे बाहेर काढता येईल? यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न चालू आहेत. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी त्या त्या देशांच्या पंतप्रधानांशी संपर्क साधून भारतीयांना मदत करण्याची विनंती केली आहे.
डनिप्रो शहरात दहा दिवस पाचशे भारतीय विद्यार्थी बंकरमधे बसून आहेत. ‘इंडियन स्टुडंट्स इन डनिप्रो’ असा व्हॉट्सअॅप ग्रुप त्यांनी तयार केला आहे. भोपाळच्या आर्या श्रीवास्तवने पुढाकार घेतला असून ती या ग्रुपची अॅडमिन आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्याजवळ असलेले पैसे एकत्र करून सर्व ग्रुपच्या जेवण-खाणाची काळजी घेत आहे.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताने युक्रेनसंदर्भात तटस्थ भूमिका घेतलीच, पण मतदानाच्या वेळी भारताने गैरहजर राहून एक प्रकारे रशियाला मदत केली. हा युक्रेनच्या नागरिकांना राग आहे. म्हणून तो राग युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांवर काढला जातो आहे. युक्रेनच्या नागरिकांकडून काही ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांना मानहानी पत्करावी लागल्याच्या घटना घडल्या तसेच रूमानिया व पोलंडच्या सरहद्दीवर सुरक्षा दलाकडून मारही खावा लागला. भारतीय दूतावासाकडून सहकार्य मिळत नाही, नीट सूचना व मार्गदर्शन प्राप्त होत नाही, ही विद्यार्थ्यांची प्रमुख तक्रार आहे. कोणत्या सरहद्दीवर कसे पोहोचावे हे कोणी सांगत नाही. दुतावासात अधिकारी फोन उचलत नाहीत. मेसेज पाठवला, तर उत्तर देत नाहीत, असे विद्यार्थी सांगत आहेत. मूळ लखनौची रहिवासी असलेल्या मुलीने तर व्हीडिओ पाठवून, ‘आम्ही सुरक्षित नाही, आम्हाला भिती वाटते आहे, योगी-मोदी आम्हाला वाचवा’, असा आक्रोश चालवला होता.
युक्रेनमधील भारतीयांना मायदेशी आणणे यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ हा एकच दिलासा व आधार आहे. या युद्धामुळे सर्व देशाला समजले की, युक्रेनमधे बावीस हजार भारतीय विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. यापूर्वी या मुद्याची कधी देशात चर्चा झाली नव्हती. भारतातील खासगी वैद्यकीय शिक्षणापेक्षा युक्रेनमधील शिक्षणाची फी खूपच स्वस्त म्हणजे एक चतुर्थांश आहे. तिथला शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्तम आहे. शिक्षक, साधनसामुग्री, वातावरण, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, हाॅस्टेल किंवा अन्यत्र निवास व भोजनाची सोय उत्तम आहे. सोयी सुविधा कमी दरात दर्जेदार आहेत म्हणूनच भारतीय विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनकडे ओढा आहे. आपल्या देशात ५५० मेडिकल काॅलेजेस असूनही इथले विद्यार्थी युक्रेन व चीनकडे शिकायला का जातात, याचा आता शोध घेण्याची वेळ आली आहे.