Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीनवाब मलिकांचा राजीनामा घेणारच!

नवाब मलिकांचा राजीनामा घेणारच!

मुंबई : राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यावर अख्खे राज्य सरकार त्यांना वाचवायला उभे राहिले आहे. पोलीस कोठडीत गेल्यावरही मलिक मंत्री पदावर कायम आहेत. त्यावरून हे सरकार राज्य घटनेचा अवमान करत आहे. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, ते सरकार मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार करणाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, ही दुर्दैवी बाब आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणारच, यासाठी भाजप सभागृहात संघर्ष करेल, अशी घोषणा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. या अधिवेशनात आम्हाला चर्चा करण्यात स्वारस्य आहे, राज्याच्या जनतेचे प्रश्न त्यात मांडले गेले पाहिजे. पण सरकारी पक्षाचीही अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे ही जबाबदारी आहे. अन्यथा ओबीसी आरक्षणावर बोलले म्हणून १२ आमदारांचे निलंबन केले गेले. विद्यापीठ सुधारणा विधेयक विरोधकांची मुस्कटदाबी करून या सरकारने मंजूर केले, अशा प्रकारचे व्यवहार हे सरकार करत असेल, तर आम्हालाही विचार करावा लागेल, असेही फडणवीस म्हणाले.

राज्याचा शेतकरी हवालदिल झाला आहे, वीज जोडणी कापायचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, मात्र तरीही शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिलेली नाही. शेतकऱ्याला उभे पीक जळताना पाहावे लागत आहे. आधीच २ वर्षे आस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे, आता सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. हे सावकारी सरकार आहे. ऊर्जा मंत्र्यांची वक्तव्ये ही हुकूमशाहसारखी आहेत. शेतकऱ्याला जाहीर केलेली मदत पोहचली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे दोन्ही विषय महत्वाचे आहेत. या सरकारने छत्रपती घराण्यातील व्यक्तीला उपोषणाला बसायला लावले, ही दुर्दैवी बाब आहे. एकीकडे आदिवासी विकास विभागात आदिवासींचे पेसाचे पैसे देत नाही. परीक्षांचे घोटाळे संपत नाही, या सरकारचा भ्रष्टाचार परमसीमेवर पोहचला आहे. आजवरच्या सर्वात मोठे हे भ्रष्टाचाराचे सरकार आहे. स्वतः अन्याय करायचा आणि नंतर कांगावा करायचा महाराष्ट्र झुकणार नाही. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुमच्या सारख्या अहंकारी लोकांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल, १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे, असेही फडणवीस म्हणाले.

तुमच्यातले काही दाऊदच्या घरची धुणीभांडी करताहेत

“तुम्ही देशातली सत्ताही घेतली, महाराष्ट्रातलीही तुम्हाला हवी, ग्रामपंचायत, सोसायट्याही तुम्हाला हव्यात, मग आम्ही धुणीभांडी करायची का?” असा सवाल काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला होता. या मुद्द्यावरून बरीच चर्चा झाल्यानंतर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. सरकारच्या चहापानावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकत असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नवाब मलिक प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. “युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही देश सांभाळा, राज्य आम्ही सांभाळतो. आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्ही जिंकलात, महापालिकाही तुम्हालाच पाहिजे, ग्रामपंचात, स्थानिक निवडणुका सगळंच तुम्हाला पाहिजे. मग आम्ही धुणीभांडी करायची का? धुणीभांडी करायला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती. धुणीभांडी करणाऱ्या मराठी माणसाला ताठ मानेनं उभं राहाता यावं, यासाठी शिवसेनेची स्थापना झाली”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवायचंय. पण त्यांच्यातले काही लोक दाऊदकडची धुणीभांडी करतायत. ती आधी बंद करायला लावा. दाऊदपुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही ही जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतेय, ती बंद झाली पाहिजे. माझं आव्हान आहे की जशी माझी पत्रकार परिषद चालते, तशी त्यांचीही घ्या. त्यांच्याकडूनही उत्तरं येऊ देत”, असं फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -