घरातील लक्ष्मीचा आदर ठेवू या !

  247

मीनाक्षी जगदाळे


आठ मार्च जागतिक महिला दिन! विविध स्वरूपात कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना अनेक ठिकाणच्या सोहळ्यांना बोलवले जाईल, त्यांचा आदर, सत्कार, सन्मान केला जाईल. कुटुंबातील महिलांना देखील शुभेच्छा, भेट वस्तू देऊन तिच्यातील स्त्री शक्तीचा जागर केला जाईल. महिलांविषयक अनेक प्रेरक, सकारात्मक भाषणं केली जातील. स्त्रीला देवीचे रूप मानून ती किती पूजनीय आहे यावर लेख, बातम्या प्रसिद्ध होतील. आदर्श माता, आदर्श भगिनी, आदर्श पत्नी मानून विविध उपाध्या, विविध उपमा स्त्रीला बहाल करून तिच्याशिवाय सृष्टी, आयुष्य कसं अपूर्ण आहे यावर प्रत्येकाला उत्कंठ भावना दाटून येतील, यात शंकाच नाही ! महिला देखील प्रत्येक ठिकाणी आवर्जून स्वतःचे कौतुक करून घेईल, तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास, अभिमान वाटू लागेल आणि ती अधिक उत्साहाने, अधिक जोमाने पुढील कामाला लागेल यात शंकाच नाही. पण खरंच प्रत्येक महिलेला जिला समाजात नावाजलं जात, तिच्या कार्यक्षेत्रात तिला विशेष मानलं जात, समाजातून गौरवलं जात, जिच्या कार्याची कामाची दखल कुटुंबाबाहेर घेतली जाते, जिच्यासाठी कार्यक्रमांचे, सत्काराचे, पुरस्कारांचे सोहळे आयोजित केले जातात तिला तिच्या कुटुंबात तितक्याच प्रामाणिकपणे आदर, मान-सन्मान, प्रेम दिलं जातं का? हा देखील जागतिक पातळीवरील प्रश्न आहे.


बहुतांश ठिकाणी या प्रश्नाने उत्तर नाही! असेच येईल आणि येते आहे. समुपदेशनला आलेल्या असंख्य प्रकरणातून हेच समोर येते आहे की, आजही स्त्रीला कुटुंबात कोणतेही आदराचे, मानाचे, आत्मसन्मान अबाधीत राहील, असे स्थान नाहीये.


आपल्याला अाध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक विचारसरणीनुसार स्त्री घरची लक्ष्मी आहे ! घरातील सून, माता, पत्नी ही साक्षात लक्ष्मी आहे आणि तिला दुखावणं, तिचा अपमान करणं, तिचा अनादर करणं, तिच्या डोळ्यांत कोणत्याही कारणास्तव पाणी येणं हे पातक आहे ! घरातील लक्ष्मी आनंदी हवी, हसतमुख हवी, सुखी-समाधानी हवी ! असं असलं की, संपूर्ण घर कसं तेजोमय असतं हे आपण पूर्वांपार ऐकत आलो आहोत. अशा घरात कशाची कमतरता नसते, भरभराटीचे दिवस असतात, त्या घराला देवतांचे आशीर्वाद लाभतात हीच आपल्याला पूर्वजांची शिकवण आहे.


आजमितीला तर घरोघरी लक्ष्मी रडताना, जीव जाळताना, मन मारताना, अपमानाचे घोट पीत, अपशब्दांचा भडीमार सहन करत तळतळताना दिसते आहे, तिचा आत्मा सातत्याने दुखावलेला दिसत आहे.


समुपदेशनमधील कित्येक प्रकरणातून हेच निदर्शनास येते की, पत्नी आणि सून म्हणून वावरताना, जगताना स्त्री कमालीची त्रस्त झालेली आहे. प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे दोन शब्द तर सोडाच, पण ती घरातीलच सदस्यांकडून सातत्याने शिव्या, शाप, बदनामी, अर्वाच्य भाषा, हीन दर्जाची वागणूक, मारहाण, टोमणे, आरोप सातत्याने सहन करून प्रचंड दुखावली गेलेली आहे, मानसिक दृष्टीने उद्ध्वस्त झालेली आहे आणि मनातून मोडून पडलेली आहे आणि तिच्या या दुभंगलेल्या मनस्थितीशी कोणालाही काहीही कर्तव्य नाहीये, घेणं- देणं नाहीये !


तिचे विचार, तिची मतं, तिच्या अपेक्षा, तिची दुःखं, तिचा त्रास, तिची तगमग, तिचा त्याग, तिने केलेली तडजोड, तिचे गुण, तिच्या कला, तिच्या जाणिवा सर्व फाट्यावर मारणारे परके कोणीही नसून तिच्याच कुटुंबातील सदस्य आहेत.


हीच घराघरांतील लक्ष्मी आयुष्यभर विचार करत राहाते की मी कुठे चुकले, माझं काय चुकले, मी कुठे कमी पडले? माझे आई-बाबा कुठे चुकले? माझ्याच नशिबात इतका त्रास का? मी काय वाईट केले? मी कोणाशी वाईट वागले? मीच का सगळं भोगते आहे? कधी जाणीव होईल माझ्या चांगुलपणाची माझ्या सासरच्यांना? कधी महत्त्व कळेल यांना माझं?


अशा असंख्य प्रश्नांनी ही लक्ष्मी सतत स्वतःलाच कोसत राहाते, उत्तर शोधत राहाते, स्वतःलाच अपराधी मानत राहते आणि स्वतःच्याच मनाची समजूत घालून परत परत उभी राहते.


समुपदेशनला आलेल्या अनेक महिला ज्या कोणाच्या पत्नी आहेत, सुना आहेत, माता आहेत त्या ढसाढसा रडतात, आत्महत्या करण्याचे विचार करतात, दीर्घकालीन नैराश्यात असतात, स्वतःच्या जीवनाला कंटाळून गेलेल्या असतात, स्वतःला ताण-तणाव, दररोजचे वादविवाद, वैचारिक कलह, मतभेद, हेवे-दावे यामुळे अनेक आजारांनी अतिशय कमी वयात ग्रस्त झालेल्या असतात. अशी असावी का घरातील लक्ष्मी? अशी दुभंगलेली, तुटलेली, मोडलेली लक्ष्मी आपल्याला अपेक्षित आहे काय? हे सर्व प्रकारचे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करणारी स्त्री म्हणजे गृहलक्ष्मी का? ही आपली पौराणिक, अाध्यात्मिक शिकवण नक्कीच नाही...आणि कधीही नव्हती !


सातत्याने स्वतःचे दुःख लपवून, अपमानाचे घोट गिळत जगासमोर नटून-थटून, भरजरी साड्या नेसून, नट्टा-पट्टा करून, दागदागिने घालून सुहास्य वदनाने मिरवते ती मनातून देखील तेवढीच प्रफुल्लित, प्रसन्न, शांत, समाधानी, सुखी आहे काय? यावर विचार होणे आवश्यक आहे. या महिला दिनाला प्रत्येकाने या बाबींचा खोलवर विचार करावा, असे वाटते. प्रत्येक कुटुंबातील स्त्री भुकेली आहे फक्त प्रेमाची, तिला अपेक्षा आहे फक्त आदराची, तिला हवा आहे फक्त सन्मान, ती वाट बघते आहे फक्त कोणी तरी समजावून घ्यावं, ऐकून घ्यावं म्हणून !
meenonline@gmail.com

Comments
Add Comment

लिहित्या हातांना बळ देणाऱ्यांचा सन्मान!

डॉ. संजय कळमकर संशोधन, बालसाहित्य निर्मिती आणि अध्यापन या तीनही क्षेत्रांमध्ये लीलया संचार करताना इतरांना

‘एसटी’सुद्धा खासगीकरणाकडे?

मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले. गेल्या ४५ वर्षांत फक्त ८

झाडे लावा, झाडे वाचवा

रवींद्र तांबे मनुष्याला आपले जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा दिल्या आहेत. त्यामुळे जे काय मनुष्याचे अस्तित्व आहे

‘फिनटेक’ उद्योग आणि नव्या उद्योग संधी

उदय पिंगळे ‘फिनटेक’ हा शब्द यापूर्वी बऱ्याचदा वाचनात अथवा कानावर अनेकदा आला असेल. हा शब्द फायनान्स आणि

कोकणात ‘कोकण सुवास’चा दरवळ...!

माझे कोकण : संतोष वायंगणकर कोकणात सध्या भातशेतीचा हंगाम सुरू आहे. पूर्वी कोकणातील सर्वच गावातून भातशेती मोठ्या

हुंडाबळी एक लज्जास्पद विकृती...

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे मुलींकडून हुंडा का मागितला जातो? याची मानसशास्त्रीय कारणे लक्षात घेणे