प्रहार वेब टीम
मुंबई : जय भोलेनाथ, हर हर महादेव, ओम नम: शिवायच्या जयजयकारात देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जय भोलेनाथ, हर हर महादेव, ओम नम: शिवाय या गजरांनी परिसर दुमदुमला आहे. शिवलिंगावर दुधाचा अभिषेक घालण्यासाठी भाविकांनी देशभरात ठिकठिकाणी प्रचंड गर्दी केली आहे.
जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून कोलकात्यापर्यंत सर्वत्र उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे.
मुंबईत वाळकेश्वर येथील बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी कान्हेरी गुंफा, तुंगारेश्वर (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) येथेही भाविकांची रीघ लागली आहे. ठाणे शहरातील कोपीनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. कोपिनेश्वर मंदिर हे ठाण्यातील पुरातन मंदिर आहे. देशातील सर्वात मोठी पिंड या मंदिरात आहे.
महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबादमधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. नाशिक येथे हजारो भक्तांनी गोदावरी नदीत पवित्र स्नान करुन कपालेश्वराचे दर्शन घेतले. तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथेही लाखो शिवभक्तांनी दर्शनासाठी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे.
याशिवाय मुंबईतील वरळी, जोगेश्वरी, बोरीवली, कांदिवलीसह ठिकठिकाणी हा उत्सव आनंदात साजरा होत आहे. दर्शन सुलभ व्हावे आणि मंदिर सुरक्षेसाठी पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.