Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीमागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे नाही

मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे नाही

खासदार संभाजी राजेंचा निर्धार

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्दावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. राज्य सरकारने संभाजीराजे यांना चर्चेसाठी निमंत्रण धाडले असून राजेंच्या वतीने मराठा समाजाचे प्रतिनिधी वर्षावर चर्चेला जातील, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. तिथे जर निर्णय होऊ शकला नाही तर पुन्हा माझ्याशी प्रतिनिधी चर्चा करतील अशी माहिती राजे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत दिली. असे असले तरी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत उपोषण मागे घेण्यास संभाजीराजे यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

” मराठा आरक्षणबाबत २२ मागण्या पुढे आल्या, त्यापैकी ६ मागण्या आम्ही मांडल्या आहेत. या मागण्यांवर राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं, यासाठी केंद्र सरकारकडे जाण्याची गरज नाही. तसंच या मागण्यांसाठी न्यायालयाचे कोणते निर्बंध आहे असेही काही नाही, याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. मी उपोषण करत आहे, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय,” असं खासदार संभाजीराजे म्हणाले. दरम्यान कोणीही कायदा हातात न घेण्याचे आवाहन संभाजी राजे यांनी यावेळी केले.

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आज सकाळी संभाजीराजे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून अशक्तपणा व तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत असल्याचं संभाजी राजे यांनी सांगितलं. डॉक्टरांनी सल्ला दिला असला तरी कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिला आहे.

‘हे उपोषण माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी थांबणं गरजेचं’

संभाजी छत्रपतींना वर्षा बंगल्यावरून चर्चेसाठी निमंत्रण आलं आहे. यासाठी ते स्वत: न जाता मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यांना संयमाने भूमिका मांडण्यासाठी संभाजीराजेंनी आवाहन केलं आहे. आता खूप त्रास होऊ लागलाय, पण तरीही समाजाठी मी झटणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. मराठा समन्वयकांनी कायदा हातात घेऊ नये, या मताचा मी आहे. मुख्यमंत्र्यांकडून बोलवणं आल्यामुळे आता समन्वयकांनी जाऊन आपलं म्हणणं मांडा, असं छत्रपती म्हणाले. मी संभाजी आहे राजे नाही, मी जनतेचा सेवक आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री यांनी बोलावलं असेल तर आपण प्रोटोकॉल नुसार जावं लागतं, असं त्यांनी म्हटलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -