Sunday, July 7, 2024
Homeमहत्वाची बातमी“शेअर बाजार मंदीत, तर सोने तेजीत”

“शेअर बाजार मंदीत, तर सोने तेजीत”

डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजाराचा मागील आठवडा हा देखील मोठ्या प्रमाणात चढ-उतारांचा ठरला. आपण आपल्या मागील लेखातच सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय घडामोडी या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे सांगितले होते. आपण बांधलेल्या अंदाजानुसार मागील आठवड्यात शेअर बाजाराने हालचाल केली.

आपण त्याच लेखात रशिया आणि युक्रेन यांमध्ये चालू असलेला तणाव, युद्धजन्य परिस्थिती, इतर बाबतीत चालू असलेला तणाव या सर्वांचा विचार करता शेअर बाजारात सावधानतापूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे. पुढील काळात जर युद्ध किंवा त्या प्रकारची शक्यता निर्माण झाल्यास शेअर बाजारात फार मोठे चढ-उतार पाहावयास मिळतील हे सांगितले होते. त्याप्रमाणे शेअर बाजारात फार मोठे चढ-उतार झाले.

रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला ही बातमी आली आणि गुरुवारचा अर्थात २४ फेब्रुवारी हा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी फार मोठ्या घसरणीचा ठरला. युद्ध सुरू झाले आणि निर्देशांक निफ्टीची जवळपास ६०० अंकांनी घसरण होत सुरुवात झाली. त्यानंतर शेअर बाजारावरील दबाव हा कायम राहत नंतर तो वाढत गेला आणि शेअर बाजार मोठ्या घसरणीने बंद झाला.

या घसरणीमध्ये अनेक दिग्गज शेअर्ससोबत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सची धुलाई झाली. या युद्धामध्ये आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका काय असेल या चिंतेमुळे शेअर बाजार गडगडला. रशिया आणि युक्रेन युद्धात रशियाच्या विरोधात अमेरिकेने आणि नाटोने कोणतेही पाऊल उचलले नाही. उलट अमेरिकेने तटस्थ भूमिका घेतल्याने शुक्रवारच्या सत्रात पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात बाऊन्स बॅक दिसून आला. ज्यामध्ये निफ्टीमध्ये ४०० अंकांची रिकव्हरी झाली.

आपण मागील लेखात सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या वेळी आंतरराष्ट्रीय तणावजन्य परिस्थिती निर्माण होते, त्या वेळी आजपर्यंतचा इतिहास बघता जास्तीत जास्त गुंतवणूक ही सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यामध्ये होते. या तणावजन्य परिस्थितीमध्ये देखील हेच घडले. एका बाजूला सर्व जगातील शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळत असताना सोने या मौल्यवान धातूने विक्रमी वाढ दर्शविली. सोन्यामध्ये गुरुवारच्या सत्रात केवळ एका दिवसातच जवळपास २८०० रुपयांची वाढ झाली.

आपण तांत्रिक विश्लेषणानुसार चार्टचा विचार करता पुढील काळात देखील सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक येऊ शकते हे सांगितलेले होते. तसेच सोन्याने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारे संकेत दिलेले आहेत हे देखील सांगितलेले होते.

सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची मंदी झाली असून टेक्निकल अॅनालिसीसनुसार मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल.

मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५७८०० आणि निफ्टीची १७२२० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या खाली आहेत तोपर्यंत निर्देशांकामधील मंदी कायम राहील.

सध्या चालू असणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यानंतर शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर पुढील आठवड्यासाठी शेअर बाजार आणखी बाऊन्स बॅक करू शकतात. ज्यामध्ये निफ्टी १७०५०, तर सेन्सेक्स ५७००० पर्यंत उसळी घेऊ शकतो. शेअर बाजारात पुढील काळात होणारी वाढ ही विक्रीची उत्तम संधी असेल.

टेक्निकलबाबतीत पाहायचे झाल्यास निफ्टीने १६८०० ही पातळी बंदतत्त्वावर तोडलेली आहे. तसेच अल्पमुदतीच्या चार्टनुसार निफ्टीने १६४१० ही पातळी बंदतत्त्वावर तोडलेली आहे. त्याचप्रमाणे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक निफ्टीमध्ये मंदीचा “हेड अँड शोल्डर” तयार झालेला आहे. हेड शोल्डर फोर्मेशन तयार होणे हे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार मोठ्या घसरणीचे संकेत देत आहे.

तयार झालेल्या या मंदीच्या रचनेनुसार निफ्टीमध्ये पुढील काळात जवळपास २००० ते २५०० अंकांची घसरण होणे अपेक्षित आहे. बँकनिफ्टीकडे पाहायचे झाल्यास बँकनिफ्टीमध्ये देखील मंदीची रचना तयार झालेली आहे. या रचनेनुसार बँकनिफ्टी पुढील काळात मध्यम मुदतीत जवळपास ४००० ते ५००० अंकांची मोठी घसरण पाहावयास मिळू शकते. त्यामुळे पुढील काळात निफ्टी १४०००, तर बँकनिफ्टी ३२००० या पातळीपर्यंत येणे अपेक्षित आहे. एकूण तयार झालेले मंदीचे संकेत लक्षात घेता घाई-गडबड न करता शेअर्स आणखी स्वस्त होण्याची वाट बघणेच योग्य ठरेल.

आपण मागील लेखातच कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार कच्च्या तेलाने यापूर्वीच तेजीचे संकेत दिलेले असून जोपर्यंत कच्चे तेल ६४०० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी मोठी वाढ होणे अपेक्षित आहे, हे सांगितलेले होते. त्यानुसार कच्च्या तेलात देखील फार मोठी विक्रमी वाढ पाहावयास मिळाली. एकाच आठवड्यात कच्च्या तेलाने जवळपास ८०० रुपयांची तेजी दाखविली. पुढील काळात देखील कच्च्या तेलात विक्रमी वाढ होणे अपेक्षित आहे.

मध्यम मुदतीच्या चार्टनुसार कच्च्या तेलाची ६६०० ही खरेदीची पातळी असून जोपर्यंत कच्चे तेल ६४०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलातील तेजी कायम राहील.

अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ४९००० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोन्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.

samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -