Saturday, June 29, 2024
Homeदेशयुक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांची परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांची परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा

मुंबई : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो विद्यार्थ्यांसह भारतीय अडकले आहेत. त्यांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. राज्यातील अनेक नेते आणि मंत्रीही युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. अनेक पालकांनी नेत्यांशी संपर्क साधून आपल्या पाल्यांना युक्रेनमधून सुखरूप मायदेशात आणावं अशी विनंती केली आहे. आता या विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली आहे. रोमानिया-पोलंड सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत पुरवण्यासंदर्भातही त्यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. युक्रेनमधील महत्वाच्या शहरांना लक्ष्य केले जात आहे. रशियानं कीव्हसह अनेक शहरं उद्ध्वस्त केली आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्यात काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनच्या गृह मंत्रालयाकडून हा दावा करण्यात आलेला आहे. या हल्ल्यांमध्ये जवळपास १६८४ जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. हा आकडा वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

युद्धभूमी युक्रेनमध्ये भयंकर परिस्थिती असून, या देशातील विविध शहरांमध्ये हजारो भारतीय अडकले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत. केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ हाती घेण्यात आले आहे. युद्धजन्य परिस्थितीत भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीयांना घेऊन पाचवे विमान मायदेशी परतले आहे. आतापर्यंत अकराशेहून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत. अद्याप अनेक जण तिथेच अडकले असून, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील हजारो नागरिक आणि विद्यार्थी युक्रेनमधील विविध भागांत अडकले आहेत. त्यांच्या पालकांकडून राज्यातील नेत्यांशी संपर्क साधला जात असून, मुलांना परत आणावे अशी विनंती केली जात आहे. त्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली असून, त्यांनी स्वतः युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी फोनवरून यासंदर्भात चर्चा केली. युक्रेनच्या खार्किव्हमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली. बेलगोरोड (रशिया) मार्गे त्यांना भारतात आणण्याबाबतही चर्चा झाल्याचे कळते. रोमानिया-पोलंड सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत पुरवण्यासंदर्भातही चर्चा झाली, असे ट्वीट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -