Friday, July 5, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखराणेंच्या पुढाकाराने एमएसएमई कोकणात

राणेंच्या पुढाकाराने एमएसएमई कोकणात

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे (एमएसएमई) २०० कोटींची गुंतवणूक असलेले ट्रेनिंग सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ओरोस येथे केली. देशातील हे विसावे सेंटर आहे. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसएमईची संपर्क, संवाद आणि समन्वय परिषद नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली. या परिषदेच्या रूपाने कोकणातील छोटे-मोठे व्यापारी, उद्योजकांना मोठे बळ मिळाले. उद्योजकांना व्यासपीठ मिळावे आणि नवे उद्योजक घडविण्यासाठी प्रथमच अशा संपर्क, संवाद आणि समन्वय परिषदेचे आयोजन झाले. या परिषदेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. पर्यटनातून आणि उद्योग व्यावसायातून सिंधुदुर्ग आर्थिक सबळ व्हावा ही माझी इच्छा आहे. आता परिवर्तन करायचे आहे. मुंबईवरून येणाऱ्या मनिऑर्डरवर अवलंबून न राहता सिंधुदुर्गची वेगळी ओळख बनवायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने उद्योजक बना, असे आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले.

कोणताही उद्योग लहान किंवा मोठा नसतो. तो उद्योग असतो. पैसे उभारत असंख्य लोकांना रोजगार देण्याचा निर्धार उद्योजक बनणाऱ्या लोकांनी करावा. अमेरिकेत ज्या दर्जाचे मशरूम केले जाते त्या पद्धतीने देशाच्या उत्तर भागात एका मुलीने उद्योग सुरू केला. त्यांनाच आदर्श घ्या. माझ्या खात्यात ६.५ लाख उद्योग आहेत. यात आपण कुठे आहोत हे शोधा आणि आजच निर्धार करा. या परिषदेनंतर सिंधुदुर्गच्या सुंदर निसर्गात समृद्ध उद्योजक घडले पाहिजेत. तेव्हाच खरे समाधान आपल्याला मिळेल. अभिमानाने जगायचे असेल, तर आर्थिकसुद्धा झाले पाहिजे. जगात अशक्य काहीच नाही. मात्र प्रयत्न केले पाहिजेत. मी तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मंत्री झालो. त्या जनतेच्या उपकाराची कृतज्ञता म्हणून जिल्ह्यात उद्योजक घडावेत, म्हणून माझे प्रयत्न आहेत, असे राणे पुढे म्हणाले. एमएसएमईच्या संपर्क, संवाद आणि समन्वय परिषदेच्या माध्यमातून कोकणात उद्योग उभारण्यासाठी उद्योजकता विकास शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. कुडाळमध्ये कोकण वायर महोत्सवही आयोजित करण्यात आला. ओरोस येथे संपर्क, संवाद आणि समन्वय परिषदेवेळी कुंभार कारागिरांना कुंभार चाके, शेतकऱ्यांना मधमक्षिका पालन करण्यासाठी साहित्य, सूत काढण्यासाठी चरखा, अगरबत्तीच्या मशीन, बांबूचे रोप वाटप, तर उद्योगासाठी २ कोटी ५३ लाखांची कर्जे मंजूर झाली. त्याचे वाटप नव उद्योजकांना करण्यात आले.

एमएसएमई म्हणजे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे कार्य उल्लेखनीय आहे. या मंत्रालयाची व्याप्ती मोठी आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे जबाबदारी सोपवल्यानंतर सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची व्यापकता वाढली आहे. केंद्रीय उद्योग मंत्रालयाने देशभरात अकरा हजार करोड रोजगारनिर्मिती तसेच सहा कोटी उद्योजक तयार केले आहेत. या जिल्ह्यातील उद्योजकांना व्यवसायात उभे राहण्यासाठी, परिवर्तन घडविण्यासाठी स्वत:चे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी व जिल्ह्याची उद्योग क्रांती झालेल्या जिल्हा म्हणून ओळख करण्यासाठी वाव आहे. यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण एमएसएमई देत आहे. जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत, व्यावसायिकांपर्यंत उद्योगाच्या विविध योजना पोहोचण्यासाठी केंद्र सरकारच्या उद्योग विभाग प्रयत्न करणार आहे. मागासवर्गीय तरुण नोकरी मागणारे नाही, तर ते नोकरी देणारे तयार व्हावेत, म्हणून अशा उद्योजकांना उभारी देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती आणि जमातीचा स्वतंत्र उद्योग विभाग स्थापन केला. त्याची जोड घेऊन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातीचे उद्योजक घडावेत म्हणून तीनदिवसीय महाउद्योग परिषद आयोजित केली.

कोकणाला मोठा समुद्रकिनारा लांबला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण जगभर पर्यटनाची ओळख आहे. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वांत सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील नऊ पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे. जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या यादीमध्ये निवड म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र पर्यटनासह अन्य उद्योगधंदे तसेच व्यवसायाला बळकटी देण्याची नितांत गरज आहे. एमएसएमईमुळे देशभरातील व्यापाऱ्यांना, उद्योजकांना स्वत:सह आपल्या प्रदेशाची ओळख तयार होण्यास मदत होणार आहे. कोकणात कुंभार कारागीर मौठ्या प्रमाणात आहेत. मधुमक्षिका पालन व्यवसाय, सूत काढण्यासाठी चारखा, अगरबत्ती व्यवसाय, बांबूचे रोप वाटप तसेच कुल्हड व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यांना निधी उपलब्ध होत नाही. वेळेत कर्जे मिळत नाहीत. एमएसएमईमुळे अशा अनेक छोट्या कारागिरांना मोठी मदत झाली आहे. या व्यावसायिकांना आपण प्रत्येकाने सहकार्य करायला हवे. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून एक वेळ मातीच्या कुल्लडमधून चहा पिल्यास कुंभार कारागिरी करणाऱ्या देशातील कोट्यवधी कुटुंबांना रोजगार मिळेल, त्याचबरोबर आपल्या देशाची माती चुंबल्याचे समाधान मिळेल. मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय खूपच फायदेशीर आहे, खादी बोर्डाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी म्हटले आहे, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे एमएसएमईची संपर्क, संवाद आणि समन्वय परिषद कोकणात झाली. त्यांच्या मंत्रालयाने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्याचा फायदा कोकणातील तरुणांना- तरुणींना नक्कीच होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -