सीमा दाते
मुंबई लोकल. मुंबईची जीवनवाहिनी, पण गेल्या काही दिवसांपासून ही जीवनवाहिनी मुंबईकरांच्या नाकीनऊ आणते. केवळ मुंबईकर नाहीच, मुंबईबाहेरील प्रवाशांना गर्दीच्या वेळी लोकल प्रवास करणे त्रासदायक होत आहे. मध्य रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या असल्या तरी का होतोय त्रास प्रवाशांना?
मध्य रेल्वेचा पसारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कसारा, कर्जतपर्यंत आहे. अगदी प्रवासी याही भागातून मुंबईत रोजी-रोटी कामावण्यासाठी येतात. लांबच्या पल्ल्यातील प्रवाशांना अगदी माफक दरात सेवा ही मध्य रेल्वे देते. त्यामुळे रेल्वेचे कौतुक आहेच. आज लोकल सेवेमुळे अनेक जण नोकरीवर जाऊ शकतात, पण मग लॉकडाऊननंतर आताच अचानक गर्दी का वाढली, तर मध्य रेल्वेवर वाढवण्यात आलेल्या लोकल फेऱ्या. बरं मग लोकलच्या फेऱ्या वाढवल्यानंतर प्रवास अजूनच सुखरूप झाला पाहिजे होता. खरं तर प्रवाशांच्या सोयी-सुविधेसाठीच या फेऱ्या वाढवल्या आहेत, पण त्या वातानुकूलित लोकलच्या आहेत. प्रवाशांना खरंच त्याची गरज होती हेही रेल्वे प्रशासनाने एकदा विचारणे गरजेचे होते. प्रवाशांना वातानुकूलित लोकल नाही, तर सामान्य लोकलच हव्या आहेत, पण त्याही वेळेत.
आज मध्य रेल्वेवर ७५ लाखांहून अधिक प्रवासी लोकल प्रवास करत आहेत.या प्रवाशांना गरज आहे ती लोकल वेळेत येण्याची आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे सामान्य लोकल फेऱ्या वाढवण्याची. मुंबईत मध्य रेल्वेने कल्याण, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, कसारा या भागांतून लोक प्रवास करतात. या सगळ्यांसाठीच लोकल जीवनवाहिनी आहे, पण मध्य रेल्वेवर ३४ वातानुकूलित फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे समान्य लोकलच्या वेळांवर वातानुकूलित लोकल चालवल्या जात आहेत. प्रत्यक्षात या लोकलमधून एका डब्यात केवळ ५ ते ६ प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे या वातानुकूलित लोकल गेल्यानंतर येणाऱ्या सामान्य लोकलवर सगळ्या गर्दीचा भार येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली जाणवते आहे. वातानुकूलित लोकल आधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कल्याणपर्यंत होत्या. मात्र १८ फेब्रुवारीपासून या लोकलने बदलापूरपर्यंतही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. पण खरं तर प्रवाशांना वातानुकूलित लोकल सेवेपेक्षा सामान्य लोकलच्या फेऱ्या वाढवलेल्या हव्या आहेत. श्वासही घेऊ न शकणारी गर्दी मात्र प्रवाशांना नकोशी झाली आहे.
सर्वात आधी हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू केल्या. मात्र त्या मार्गावरही प्रतिसाद नसल्याने तेथील लोकल फेऱ्या रद्द केल्या आणि त्या मध्य रेल्वेवर चालवण्यात आल्या आहेत. मात्र मध्य रेल्वेवरही वातानुकूलित फेऱ्यांना अल्प प्रतिसाद असल्यामुळे या लोकल फेऱ्या मध्य रेल्वेवर उपयोगात येत नाहीत. विशेष म्हणजे सामान्य प्रवाशांना या वातानुकूलित लोकलचे भाडे देखील परवडणारे नाही. साधारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून बदलापूरपर्यंत अंदाजे २०० रुपये तिकीट असावे, तर बदलापूर ते अंबरनाथ केवळ एका स्थानकासाठी ६५ रुपये तिकीट आकारण्यात येत आहे. त्यामुळे इतके जादा भाडे असलेले तिकीट दर सामान्य लोकल प्रवाशांना परवडेल का? याचाही विचार रेल्वेने वातानुकूलित सेवा सुरू करण्याआधी करायला हवा होता.
सध्या सामान्य प्रवाशांनादेखील वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे बोर्डाने हालचाली सुरू केल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. वातानुकूलित लोकलच्या सिंगल जर्नीचं भाडं कमी करावं. तसेच मेट्रो ट्रेनच्या तिकीट दरावर एसी लोकलचं भाडं ठरवण्यात यावं, असा प्रस्तावच रेल्वे बोर्डाने दिला आहे. बोर्डाचा हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबईकरांना लवकरच स्वस्तात एसी लोकलमधून प्रवास करता येण्याची शक्यता आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सिंगल जर्नीसाठी प्रवाशांना १० रुपयांपासून ८० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्याची शक्यता पाहता भाडे कमी झाल्यानंतर ५ किमीसाठी सध्या ६५ रुपये द्यावे लागतात, आता १० रुपये द्यावे लागतील. १० किमीसाठी सध्या ६५ रुपये द्यावे लागतात, आता २० रुपये द्यावे लागतील. १५ किमीसाठी सध्या ९० रुपये द्यावे लागतात, आता ३० रुपये द्यावे लागतील. २० किमीसाठी सध्या १३५ रुपये द्यावे लागतात, आता ४० रुपये द्यावे लागतील. २५ किमीसाठी सध्या १३५ रुपये द्यावे लागतात, आता ५० रुपये द्यावे लागतील. ३० किमीसाठी सध्या १७५ रुपये द्यावे लागतात, आता ६० रुपये द्यावे लागतील. ३५ किमीसाठी सध्या १८० रुपये द्यावे लागतात, आता ७० रुपये द्यावे लागतील. ४० किमीसाठी सध्या १९० रुपये द्यावे लागतात, आता ८० रुपये द्यावे लागतील. ५५ किमीसाठी सध्या २०५ रुपये द्यावे लागतात, आता ८० रुपये द्यावे लागतील. ६० किमीसाठी सध्या २२० रुपये द्यावे लागतात, आता ८० रुपये द्यावे लागतील. विशेष म्हणजे बदलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रिटर्न भाडे ४० रुपये आहे, तर केवळ सिंगल जर्नीसाठी याच्याही दुप्पट भाडे प्रवासी देऊ शकतील का, असा प्रश्न आहे. भाडे कमी होईल ही नंतरची गोष्ट. मात्र त्यापूर्वी लोकलची गर्दी कमी होईल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जरी वातानुकूलित लोकलचे भाडे कमी केले तरी प्रवाशांना परवडणार आहे का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
seemadatte@@gmail.com