
मुंबई : सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. खासदार संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेतली. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन या मंत्र्यांनी संभाजीराजेंना देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर एका लहान मुलाच्या हातून फळाचा रस घेत संभाजीराजे यांनी आपण उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी काही मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत, असे शिंदे म्हणाले. आता मागे काहीच ठेवायचे नाही असा निर्णयच सरकारने घेतला आहे. आता या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत आहेत, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर संभाजीराजे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
यावेळी संभाजीराजे म्हणाले, आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. मला आनंदानं सांगायचंय की, ज्या मागण्या समोर ठेवल्या होत्या त्यातील काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री वळसे पाटील, अमित देशमुख यांच्यासह इतर नेते इथे आले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मलासुद्धा वाचवलंत याबद्दलही आभार मानतो. सर्व मराठा समाजाच्या संघटनांचेही त्यांनी आभार मानले.