Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलमांजरांची सभा

मांजरांची सभा

किलबिल : रमेश तांबे

एकदा मांजरांची भरली सभा. व्यासपीठावर होता एक बोका उभा. सगळ्यांना सांगत होता, गप्प बसा गप्प बसा. पण एवढी म्यँव म्यँव आणि गुरगुर की मासळी बाजार जसा! सगळी मांजरं आली. काळी-पांढरी, पटेरी-ठिपकेरी सारीच आली. मांजरी आल्या, बोके आले, पिल्ले आली, चिल्ले आली. सारीच मांजरे सभेला जमली.

आता व्यासपीठावरचा बोका सगळ्यांना लागला सांगू, “एकत्र या सगळ्यांनी; वेड्यासारखं नका वागू! एकीने राहाल तरच जगाल, नाहीतर उपाशी पोटी मराल.” मग एक-एकजण मत लागले मांडू, व्यासपीठावरूनच तावातावाने लागले भांडू! आपण तर खरे जंगलचे रहिवासी, उगाच केली आपण मैत्री माणसांशी. माणसाने आपल्याला फसवले. घासभर खाण्यासाठी किती किती रडवले. दुसरा म्हणाला, “आपल्याला कधी स्वयंपाक घरात बसून दुधभात, तर कधी उपाशीपोटी काठीचा मार! कधी आपण येताच बंद करतात खिडकी आणि दार, म्हणे मांजरांमुळे होतात मुलांना आजार!” तिसरा म्हणाला, “रस्त्यावरती काल, केवढा झाला माझा अपमान, वाटलं धरावी जाऊन मान! म्हणे मी आडवा गेलो अन् म्हातारीला झाला अपशकून, खरंच कशी विचार करतात माणसं, काय उपयोग शिकून!”

कधीपासून एक बोका, शोधत होता बोलायचा मोका! संधी मिळताच व्यासपीठावर आला अन् माणसांच्या तक्रारी करू लागला. “माणसांच्या राजाने म्हणे काढलंय फर्मान! उंदीर मारा आणि मिळवा पैसा अन् सन्मान! माणसं पण काय वेडपट, पैशासाठी मारू लागले उंदीर पटापट! मला नाही कळत… खायची नाहीत उंदरं, तर का सुटले मारत!”

पाचवा बोका म्हणाला, “गेले चार दिवस उंदीर नाही पोटाला, आमचे दोन शेजारी उंदीर उंदीर करून गेले स्वर्गाला.” नंतर आलेली मांजर तर खरेच बोलली, “घुशींपुढे माझी नेहमीच उडते घाबरगुंडी. अशा वेळी काय करावे काहीच कळत नाही. केवढ्या मोठ्या घुशी, आपल्यालाच चावतात पटदिशी!” त्याच कोपऱ्यात टपून बसतात अन् कमजोर मांजरींना मारतात.

नंतर एक पांढरा शुभ्र बोका गुरगुरत म्हणाला, “काळ्या मांजरांमुळेच आपल्याला उपाशी राहावे लागते. माणसांना काळी मांजरं आवडत नाहीत. यामुळे ते साऱ्याच मांजरांना हाकलून देतात.” पांढऱ्या बोक्याच्या या बोलण्याने सभेत एकच गोंधळ उडाला. काळी-पांढरी मांजरं पार हमरी-तुमरीवर आली. रंगावरून सरळ सरळ दोन गट पडले. सभेत भलतेच रामायण घडले.

या गोंधळातच एक मांजर व्यासपीठावर आली… मोठ्या आवाजात म्यँव म्यँव करत म्हणाली… “लोकं आम्हा मांजरींवरच खूप प्रेम करतात अन् बोके मंडळींना चांगलेच ठोकून काढतात. म्हणून सांगते बोक्यांनो तुम्ही साऱ्यांनी जंगलात जावे, आम्ही मांजरींनीच फक्त माणसांसोबत राहावे.” या नव्या आरोपाने सभा तर पेटूनच उठली, मांजरांमध्ये आणखी एक फूट पडली. पुन्हा एकदा सभा उधळली गेली. मांजरांचे नेते सारे डोक्याला हात लावून बसले. डोळ्यांसमोर मांजर बांधवाचे भांडण त्यांनी बघितले.

नेते मंडळी लागली त्यांना सांगू, “खरा शत्रू बाहेर आहे तुम्ही नका भांडू.” बोके विरुद्ध मांजरी, काळी विरुद्ध पांढरी सुरू होती झटापट… ओरबडत होती पटापट! सभेत एकच गोंधळ उडाला!

तेवढ्यात एक मोठी घूस शिरली सभेत. मग एकच झाला हल्लागुल्ला, कितीजण उडाले हवेत! सारी मांजरे सैरावैरा पळू लागली. एवढ्या मोठ्या मांजर सभेची पार वाताहत झाली.

नंतर मात्र एक गोष्ट घडली… काळीकुट्ट मांजरे माणसांपासून लांबच राहू लागली. बोके तर कधी येतात, कधी जातात पत्ताच लागत नाही. पण पांढऱ्या, करड्या मांजरी मात्र बसतात माणसांच्या घरात डोळे मिटून, मिळाले काही तर खातात… नाही तर म्यँव म्यँव करीत राहतात पडून!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -