Friday, January 17, 2025
Homeसाप्ताहिककोलाजजपा... माता आणि मातृभाषा

जपा… माता आणि मातृभाषा

स्वयंसिद्धा : प्रियानी पाटील

मराठीची स्पंदनं आपणास का नाही जाणवत? भाषेचा गोडवा आपणास का नाही कळत? शिव्यांमधून होणारी स्त्रीची मानहानी, तिचा अपमान म्हणजे आपलं शिक्षण का? आपले संस्कार आहेत का?

भाषा – असं म्हटलं जातं की, भाषा ही जशी वळवावी तशी वळते. ग्रामीण भाषेचा सूर असो किंवा असो शहरी भाषा. काही दुखलं खुपलं, ठेचकाळलो तरी तोंडातून अचानक ‘आई गं’चा सूर काळजाला भिडून जातो.

आपल्या माय मराठीला जपताना थोडी काळजी घेतली गेली, तर भाषेचा आणि मातेचा आदर राखला गेल्याचं निश्चितच समाधान मिळून जाईल. भाषेचे उच्चार, पोटतििडकीने येणारे शब्द, रागाने येणारे अपशब्द जेव्हा बोलले जातात, तेव्हा भाषेचा आणि मातेचा अनादर होणार नाही याची काळजीही आपणच घ्यायला हवी.

मातृभाषेतच आई दडलीय. आपलेपणाचं स्थान निश्चित झालंय. जननी जगन्मातेच्या साक्षात्काराचं रूप दडलंय. तिचा आदर राखला जाईल याची काळजीही आपणच घ्यायला हवी.

जन्मदात्री आई, भाषेची ओळख पटवून देणारीही आईच. शिक्षणाची खरी ओळख घडवून जीवनाचा मार्ग दाखवणारी ही आईच. आपल्याकडून साऱ्या मर्यादा ओलांडून जेव्हा भाषेचा अनादर केला जातो, भाषेची हेळसांड केली जाते, तेव्हा आपल्या जन्मदात्रीचाही नकळतपणे अपमान होत असतो. तिची हेळसांड होते. ती नकळतपणे दुर्लक्षिली जाते. नात्याचा विसर पडून जातो. कारण जेव्हा भाषेचा दुरुपयोग केला जातो, भाषा बिघडते, भाषेचे अद्वातद्वा सूर निघतात, भाषेचे वाड्मय, व्याख्यान, कविता, गझल, सुरावटीमध्ये बदल न होता त्याच भाषेचे, शब्दांचे जेव्हा अपशब्द बनतात, तेव्हा भाषेचा खऱ्या अर्थाने अपमान होतो आणि हा अपमान असतो आपल्या माय मराठीचा… आणि नकळतपणे झालेल्या आपल्या जन्मदात्री आईचा देखील. कारण भाषेतील शब्दांचा अपशब्द निर्माण होताना तोंडातून येणारी एक ‘शिवी’ ही आपल्या भाषेचा अपमान, अनादर करण्यास कारणीभूत तर ठरतेच, पण आपल्या आईची… जन्मदात्रीची देखील तितकीच मानहानी करणारी ठरते.

आईवरून शिव्या देताना, कानांना ऐकताना भाषेचा किती दुरुपयोग होतोय हे ज्याला त्याला कळलं, तर भाषेचे वाभाडे निघणार नाहीत. मराठी भाषा ही आईची हेळसांड करण्यासाठी वापरण्याऐवजी वाड्मयरूपी तिची संस्कृती ओळखून भाषेचे अनेक धागे संस्कृतीचे बंध जोडण्यास वापरले, तर ते सार्थकी ठरतील, मग भाषेचाही सन्मान होईल आणि आपल्या जन्मदात्रीचाही.

किती पटकन शिव्यांची लाखोली वाहिली जाते. किती पटकन भाषा वेडीवाकडी वळवली जाते, किती घाणेरडे अपशब्द मुखातून वापरले जातात. पण आपल्या आईचा, जन्मदात्रीचा अपमान करणाऱ्या शिव्या देणं ही निश्चितच सन्मानार्ह बाब नाही.

लाखोली शब्दसुमनांची असावी, शिव्यांची नव्हे. पण हा शब्द शिव्यांसाठी इतक्या चपखलपणे बसला आहे की, लाखोली शिव्यांची वाहिली जाते, पण लाख मोलाची भाषा जपण्याचं सामर्थ्य कुणी दाखवलं तर… तर सन्मानच होईल भाषेचा. काहींच्या तोंडात शिव्या इतक्या चपखलपणे बसलेल्या असतात की, कोणतंही वाक्य शिव्यांशिवाय पूर्णच होत नाही. पण यातून येणारे अपशब्द हे आपल्या आईचा किती सन्मान करणारे असतात, हे ज्याने त्याने ओळखलं तर भाषेचाही सन्मानच होईल.

मराठी भाषेचे अनेक पैलू न्याहाळताना साहित्यामध्ये मराठी भाषेची ओळख ही शिक्षणाबरोबरच आपल्या बोलीभाषेतूनही अवगत झालेली आहे. कारण शहरी भाषेबरोबरच ग्रामीण भाषाही तितकीच गोड आहे. आईला हाक मारताना, ममा, मम्मीपेक्षा आई, माय या शब्दांत जास्त गोडवा वाटून जातो. कविता, गझलमध्ये स्त्री डोकावून जाते नकळत. कधी तिचं सौंदर्य प्रतीत होतं, तर कधी स्वभाव, अट्टहास. स्त्री कोणतीही असो. तिचा अपमान हा जगन्मातेचा अपमान असतो. वेडीवाकडी भाषा बोलली गेली असली तरी अपशब्द आणि शिव्याविरहित तिचं स्थान असावं. लहान मुलांचे बोबडे बोल कानांना किती तृप्त करून जातात. शिक्षणात पहिला इंग्रजी शब्द शोधून नंतर त्याचे मराठी अर्थाचे शब्द शोधले जातात. मराठीला दुय्यम स्थान कशासाठी? एका शब्दातून निघणारे अनेक अर्थ मराठीचा बाणा जपणारे असतात. अंतराअंतरावर भाषेचे कंगोरे न्याहाळायला मिळतात. मराठीचा स्वर आणि सूर मनामनांत घुमतो खरा. परदेशातून मराठीच्या शिक्षणासाठी येणारे संस्कृतीचा वारसा न्याहाळण्यासाठी जेव्हा सरस्वतीचं कोंदण आपल्या हातावर करून घेतात, तेव्हा वाटून जातं, आपण आपली संस्कृती किती जतन करतोय, हातावर का नाही हे कोंदण? हे कोंदण हातावर तर दूरचीच बाब, मनातही नाही, हे लक्षात येतं, तेव्हा आपलीच मान झुकते.

मराठी भाषा जाणून घेण्यासाठी त्यांची पावलं इथवर येतात. मराठीची स्पंदनं आपणास का नाही जाणवत? भाषेचा गोडवा आपणास का नाही कळत? शिव्यांमधून होणारी स्त्रीची मानहानी, तिचा अपमान म्हणजे आपलं शिक्षण का? आपले संस्कार आहेत का? भाषेची वृद्धी आपणच होत नाही, तर रांगत रांगत येणारं बाळ जसं मोठं होतं, तसतसेच मराठीचे अनेक पैलूदेखील बोबड्या बोलांपासून अनुभवाच्या उच्च शिखरापर्यंत व्यापलेले आहेत. भाषेचा आदर राखणं आपल्याच हातात आहे. फक्त अनादर नको होऊ दे…

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -