Sunday, January 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजजब भी ये दिल उदास होता हैं...

जब भी ये दिल उदास होता हैं…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

सीमा’ नावाचे २ चित्रपट येऊन गेले. बलराज सहानी आणि नूतनचा ‘सीमा’ आला १९५५ला! त्यातले शैलेन्द्रचे मन्ना डे यांनी गायलेले प्रार्थनागीत ‘तू प्यार का सागर हैं.’ ऐकले नाही आणि आवडले नाही असा प्रेक्षक सापडणे कठीण! आणि या कृष्णधवल चित्रपटातील नूतनच्या निरागस सौंदर्यावर मोहित झाला नाही असा कुणी तरुणही नसणार! याशिवाय बलराज सहानी यांच्या आश्वासक व्यक्तिमत्वाने प्रभावित झाला नाही असा आदर्शवादीही नसणार.

पण आजची आपली ‘सीमा’ आहे १९७१ची! या चित्रपटाचे संगीत होते शंकर जयकिशन यांचे, गीतकार गुलजार आणि मुख्य भूमिकेत सिम्मी गरेवाल, राकेश रोशन, कबीर बेदी. यातील एका आगळ्या गाण्याला आवाज होता रफीसाहेब व दक्षिणी गायिका शारदाचा! रफीसाहेबांच्या गाण्यामागे शारदाने फक्त तिच्या अनुनासिक आवाजात हुंकार दिले आहेत. पण तेही गाण्याचा अविभाज्य भाग बनलेत. शंकर-जयकिशन यांना गाफील ठेवून हे गाणे ऐकवून विचारले असते की ‘याचे संगीत कुणाचेय?’ तर तेही गोंधळात पडले असते इतके ते शंकर-जयकिशन यांचे वाटत नाही!

गाण्याचे मनाचा ताबा घेणारे शब्द होते- “जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है.” सिनेसृष्टीसारख्या व्यापारी जगातही कवी म्हणून जेवढे स्वातंत्र्य गुलजार यांनी भोगले असेल तेवढे क्वचितच इतर कुणी! कारण जे चित्रपटगीताचे विषय होणे अशक्य त्या विचारांची, भावावस्थांचीही या कलंदर कवीने लोकप्रिय गाणी करून टाकली! उर्दूच्या अतिप्रभावामुळे गुलजारची काही गाणी समजत नाहीत मात्र त्यातली एखादी ओळ जरी समजली तरी मनाचा ठाव घेण्याचे सामर्थ्य या लेखणीत आहे!

कधी मनात एक उदासी भरून येते, काही केल्या जातच नाही. कशानेही उत्साह येत नाही, सगळे व्यर्थ वाटते. मनाला रिझवण्याचे सगळे प्रयत्न फसतात. अशावेळी नकळत, एखादा चेहरा मनात तरळून जातो. कधीकधी सतत तरळत राहतो. आणि नकळतच ओठावर शब्द येतात

‘जब भी ये दिल उदास होता है..
जाने कौन आसपास होता है…..’

कवीने जरी ‘जाने कौन’ असे साळसूदपणे म्हटले असले तरी आपल्याला ‘तो चेहरा’ माहीत असतो! किती ओळखीचा, किती जवळचा, तरीही किती दूर, किती अप्राप्य! खरे तर त्याच्या जवळ नसण्यामुळेच तर या उदासीने घेरलेले असते. पण आमच्या गुलजारसाहेबांचा अंदाजच निराळा! जे उघड आहे ते हळुवारपणे झाकून नुसते हलकेच ध्वनित करायचे! आणि अनेकदा जे गूढ आहे, अनाकलनीय आहे, ते सोपे, सरळ करून टाकायचे!

गुलजार हा माणूस आपल्याला बाईकवर बसवून मनाच्या सर्कशीतील ‘मौतका कुवा’ मध्ये नेवून गरागरा फिरवतो! त्यात अनेकदा ‘डोळे आवाज देतात’ आणि ‘सुस्कारे धग बाहेर टाकतात’. ओठ ‘बंद असतात’ आणि ‘चुपचाप संवाद सुरु’ असतो! हा माणूस तुमच्या नकळत तुमच्या जाणीवेला भेदून टाकतो. दरवेळी हे गाणे ऐकणे म्हणजे हरवलेल्या प्रेमातील एक भयावह, उदास पोकळी अनुभवणे असते! तरीही कमालीचे सुखदायक.

‘होंठ चुपचाप बोलते हो जब,
साँस कुछ तेज़ तेज़ चलती हो,
आँखें जब दे रही हों आवाज़ें,
ठंडी आहोंमें साँस जलती हो,
जब भी ये उदास…’

एक विचित्र गोष्ट म्हणजे ही उदासी हवीहवीशी वाटते. गुलजारच्या लेखणीचे तेच वैशिष्ट्य आहे. ती दु:खाचे, एकटेपणाचे, उदासीचेही सोहळे करून टाकते. साध्या आठवणींचे वर्णनही कवी किती उत्कट, तरल आणि चित्रमयपणे करतो, पहा-

‘आँखोंमें तैरती है तस्वीरें
तेरा चेहरा, तेरा खयाल लिये…’

म्हणजे एकीकडे मनाच्या पटलावर तुझे भास, तुझी अनेक चित्रे तरळत आहेत आणि पार्श्वभूमीवर परत तुझाच चेहरा सतत दिसतो आहे! जणू सिनेमातल्यासारखा ओव्हरलॅपिंगचा नेत्रसुखद अनुभव! हा तरल अनुभव गुलजार केवळ शब्दांच्या सहाय्याने देतात! पुढची प्रतिमाही किती वेगळी आहे-

‘आइना देखता है जब मुझको,
एक मासूमसा सवाल लिये…’

म्हणजे मनात एक निरागस प्रश्न घेऊन मी आरशासमोर उभा आहे आणि आरसाच मला एकटक निरखतो आहे. कसली विचित्र प्रतिमा! पण थोडा विचार केला तर किती खरी, किती खाजगी आणि तरीही किती सार्वत्रिकपणे सर्वांची! नसतो का आपण अनेकदा आरशासमोर उभे- आपल्याच तंद्रीत, विचारमग्न मन:स्थितीत? असे अनुभव गुलजार सहजपणे मांडून जातात-

कोई वादा नहीं किया लेकिन,
क्यूँ तेरा इंतज़ार रहता है?

जिथे प्रेमच विफल झाले तिथे कोणत्या भेटीची खुणगाठ? कसला वादा? तरीही मनाच्या गाभा-यात एक अतर्क्य प्रतीक्षा असतेच ना? आणि चुकून कधी मनाला थोडा दिलासा वाटला, सगळे ठीक आहे असा भास झाला तर? ते कासावीस होते! त्याला वाटते बहुधा काहीतरी अभद्र येतेच आहे! अशी जीवघेणी शंका मनाला कुरतडू लागेतच.

बेवजह जब करार मिल जाये,
दिल बड़ा बेकरार रहता है…
जब भी ये दिल उदास होता हैं…

म्हणून मन असे उदास झाले, एकटे वाटू लागले की अशी गाणी सोबत ठेवावीत त्यासाठीच तर हा नॉस्टॅल्जिया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -