Tuesday, December 3, 2024

तिचे कपडे

कथा : डॉ. विजया वाड

दिल्लीतील सायकलस्वार तरुणींच्या ओढण्या पळवून पसार’, ‘अश्लील बोलण्याने तरुण मुलींना त्रास देणारे, सतावणारे, रोडसाइड रोमिओ गजाआड.’

अशा बातम्या आपण वाचतो, तेव्हा आपले पित्त खवळून उठते. या मवाल्यांना चांगला धडा शिकविला पाहिजे, असे आपण रागाने म्हणतो. जोपर्यंत अनोळखी वा शेजाऱ्याच्या मुलीवर असा अनवस्था प्रसंग ओढवतो तोवर ठीक! पण स्वतःच्या मुलीवर असा प्रसंग ओढवला की, आपले प्राण कंठाशी येतात.

पण यात आपल्या मुलीचीही काही चूक आहे का?, हा आत्मशोधनाचा भाग जाणीवपूर्वक तपासून बघायला हवा. वयात आलेल्या मुलीचे शरीर आकार घेऊ लागते आणि आई मुलीसाठी अंतर्वस्त्राची निवड करते. नुसता पेटिकोट आता चालणार नाही, तर काचोळीही हवी हे तिला समजावून सांगते.

तिच्या कपड्यांच्या निवडीबाबतही याच वयात आईने मैत्रीण बनून चार गोष्टी तिला समजावून सांगणं फार गरजेचं आहे. त्या गोष्टी कोणत्या?

‘रोज तू टीव्हीवर ज्या बायका बघतेस त्यांच्या कपड्यांची नक्कल करायला जाऊ नकोस. ब्राचा बंद खुशाल दोन्ही अंगी दिसतो आहे. उघड्या पाठीवर फक्त एक गोंडा झुलतो आहे. तंग कपड्यांतून छाती उडी मारून बाहेर येते की काय अशी अवस्था आहे. काही नट्या तर बिनब्लाऊजच्याच वावरताहेत आणि पब्लिक फिगर म्हणून लोक त्यांना नावाजत आहेत. ही दृश्ये तुझ्यासाठी गोंधळात टाकणारी आहेत. अंग प्रदर्शन होईल असे स्कर्ट वा फ्रॉक घालून या मुली छोटा पडदा पार उघडानागडा करीत आहेत. पण ही आपली संस्कृती नाही. तू अंगप्रदर्शन न करताही सुंदर दिसू शकतेस. मी तुझ्यासाठी उत्तमोत्तम सलवार-कमीज शिवून देईन. ज्याला बाह्या असतील. तंग नसतील आणि तरीही तू अतिशय आकर्षक दिसशील. शालीन सौंदर्य मनाला भावते. तरुणांच्या नजरा आपल्याकडे असल्या तोकड्या कपड्यांनी ओढवून घेण्यापेक्षा आणि नंतर ‘मेला डोळेच उचलत नाही माझ्यावरून’ असं म्हणण्यापेक्षा आधीच सावध राहा. तुझ्या पोशाखात रुबाब हवा. आव्हान नको. तुझा पोशाख शालीन हवा, चीप नको. अशा चिपड्या पोरींकडे तरुण मैत्रिणी म्हणून ढुंकूनही बघणार नाहीत. कुलीन तरुणीचे चित्र तिचा पोशाख आणि तिचा साजशृंगार यावरूनही ठरते. तिच्या वागण्या-बोलण्यातली अदब आणि तिच्या पोशाखातली सभ्यता या दोन्ही गोष्टी तिचे व्यक्तिमत्त्व खुलवतात आणि तिच्याशी कसे वागावे याचे अंदाजही समोरचा माणूस ठरवितो.’

आपल्या मुलीशी सातत्याने संवाद साधत राहा. तिच्या मनावर नक्की तुमच्या बोलण्याचा सकारात्मक परिणाम होईल.

टीव्हीवरल्या अँकर्स जेव्हा कमीत-कमी कपड्यांत घराघरात घुसतात, तेव्हा घरातल्याच पुरुष माणसांनी त्यांच्यावर टीका करायची एकही संधी सोडू नये.

शी, काय हे कपडे? बघवत नाही. बंद करा तो चॅनल.’ इतके तर म्हणता येते?

आपले वडील, आपला दादा हे उमलत्या वयाच्या मुलींसाठी फार महत्त्वाचे घटक असतात. त्यांना या तरुणींचे कपडे आवडत नाहीत? मग आपण असे काही घालून त्यांच्या मनातून उतरता कामा नये, असा संवाद ती स्वत:च स्वत:च्या मनाशी सुरूही करते.
आपल्या म्हणजे मातेच्या पोशाखाचाही परिणाम मुलींवर नकळत होत असतो. त्यामुळे तो संस्कृती आणि संस्कार जपणारा असायलाच हवा, हे मी वेगळे सांगायला नको.

मुलगी रजस्वला होऊ लागली की, तिच्या छातीला येणारा आकार तिला प्रथम भयकंपित करतो. पण हे अतिशय नैसर्गिक आहे, हे आईनेच तिला समजावून सांगायचे असते. आता धावलीस, बागडलीस तर शरीराचे नाहक प्रदर्शन होईल, अंतर्वस्त्राची गरज आहे, हे समजावून सांगावे व घालायला लावावे. पोक काढून चालू नकोस, कारण शरीर तुझा निसर्गदत्त दागिना आहे, हेही तिला अतिशय जिव्हाळ्याने पटवून द्यायला हवे.

माझ्या एका परदेश सहलीच्या वेळी दोन टीनएजर मुली अतिशय तोकडे स्कर्ट्स, तेही तंग घालून आल्या. आम्हाला बोटीतून जायचे होते. त्यांना बसताच येईना. कारण बसता क्षणी सरळ अंतर्वस्त्रे दिसू लागली आणि कोणीतरी अर्वाच्य कॉमेंट पास केली ‘गेट वे ऑफ…’ त्या मुली सारा दिवस उभ्या होत्या. त्यात त्यांनी टोकेरी सँडल्स घातलेले पाय किती दुखले असतील ते त्याच जाणोत!

मला आठवते. आमच्या शाळेतील एक तरुण शिक्षिका इतक्या लोकटचा ब्लाऊज आणि स्कर्ट घालून शाळेत आली होती की, इयत्ता नववीच्या वर्गातल्या मुलांचे शिकण्याकडे लक्ष लागेना. मुख्याध्यापक वर्गावरून राऊंड मारून गेले. पार्शी मॅनेजमेंटच्या त्या शाळेतले मुख्याध्यापक धोतर आणि कुर्ता अशा पांढऱ्याशुभ्र खादीत येत असत. ते स्वत: उच्चविद्याविभूषित व परदेशातल्या शाळांमध्येही अध्यापनाचे काम करून आलेले होते. पण ते एक शब्दही त्या शिक्षिकेस बोलले नाहीत. तास संपता संपता वर्गात सेवकाबरोबर एक शाल आली. सोबत चिठ्ठी होती. ‘आज आपल्याला हिची गरज आहे.’ एखाद्या तरुणीला अशी समज इतक्या उत्तम प्रकारे देणारे ते मुख्याध्यापक माझ्या मनावर कोरले गेले आहेत.

तर मुलींनो, एक नूर आदमी आणि दसनूर कपडा हे जरी खरे असले तरी तो कपडा टिचका घालून लोकांच्या नजरेला आव्हान देण्यापेक्षा आपला संयमीपणा, संयतपणा यांचे दर्शन आपल्या कपड्यांमधून होऊ दे. तुम्हाला भगभग भगभग करणारी पेट्रोमॅक्सची बत्ती व्हायचे आहे की, देवघरातली समई हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे.

वृत्ती, वर्तन आणि पोशाख यांचा फार जवळचा ऋणानुबंध आहे. मी सारे जग फिरून आले आहे. आपण एका अत्यंत शालीन, सभ्य देशाचे प्रतिनिधित्व करतो. ज्याच्या संस्कृतीला नि संस्कारांना सारे जग मानते. तेव्हा ताठ मानेने म्हणा, ‘जे माझ्या संस्कारांना मानवते असेच अंगभर वस्त्र मी धारण करेन.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -