गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
फेब्रुवारी २७; महाराष्ट्राचे ज्येष्ठ मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस; “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.
‘परि अमृतातेही पैजा जिंकणारी, ज्ञानोबा माऊलीची मराठी!’
काही वर्षांपूर्वी ज्ञानदानाच्या एका महाविद्यालयात, मराठी विषयाला विद्यार्थी कमी म्हणून एका प्राध्यापकांचे पद कमी झाले. आचार्य अत्र्यांच्या विधानाची आठवण झाली, “महाराष्ट्र संपन्न करायचा असेल, तर चांगल्या साहित्याची गरज आहे. समाजनिती कायद्याने सुधारत नाही. वैचारिक साहित्यच समाजात क्रांती घडवून आणतात.”
एका परिसंवादातील वाचलेला विचार – भारतात येताना परकीयांनी आपली संस्कृती आणली. सर्वांना सामावून घेणे ही आपली भारतीय संस्कृती. स्वातंत्र्याचा लढा चालू असताना आणि नंतरही राज्यात सामाजिक सुधारणेवरच जोर होता. १९८५ पर्यंत राज्य विचारनिष्ठ, बुद्धिनिष्ठ विचार देणारे होते. १९९० नंतर प्रगत तंत्रज्ञानाने समाजाचे चित्र बदलले. ‘आर्थिक विकास हाच खरा विकास’ हा विचार रुजला. लोकांचे जीवनमान बदलले. येथेच नवे नातेसंबंध जोडताना मराठी माणूस मराठी माणसांपासून दूर झाला. आपण आपली मराठी भाषा सोडू लागलो आणि मराठी भाषेच्या अधोगतीला सुरुवात झाली.
वैश्विकीकरणामुळे इंग्रजी बोलता येणे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले. तोच विचार मराठी भाषेला घातक ठरला. मराठी माध्यमाच्या शाळा कमी होऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढीस लागल्या. साहित्याचे वाचन कमी झाले आणि मराठी भाषा फक्त गुणांपुरती राहून आपल्यापासून दूर झाली नि पुन्हा मराठी भाषेची अधोगती सुरू झाली.
महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत विविध प्रांतातले लोक येतात, राहतात, मोठे होतात. आनंद आहे; परंतु मराठी मातीत राहताना त्यांना मराठी भाषेचा विसर पडतो. त्याहीपेक्षा आपणही विसरतो. घरातले बाहेर आणि बाहेरचे घरात या कारणाने पुन्हा मराठी भाषेची अधोगती सुरू झाली.
कागदोपत्री मराठी राजभाषा; परंतु व्यवहारात विशेष स्थान नसल्याने तिची अवस्था वि. वा. शिरवाडकरांनी म्हटल्याप्रमाणे “डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे” अशी आहे. मराठी भाषा मुंबईत अनेकांची मातृभाषा आहे, येथे राहणाऱ्यांची परिसर भाषा आहे, महाराष्ट्राची राजभाषा आहे, म्हणून शासन दरबारातील सूचना, माहिती सर्वांना समजेल अशा साध्या-सोप्या लोकभाषेत असल्यास ‘सर्वसामान्यांचा विकास म्हणजे लोकशाहीचा विकास’ या लोकशाही तत्त्वाला न्याय मिळेल. भारतात भाषावार प्रांतरचना करण्यामागे भाषेची विविधता टिकविणे हाच उद्देश असावा. त्यानुसार मुंबईत मराठी भाषा टाळू नका, इतर भाषा लादू नका. न लादता मराठी भाषिकच मराठीला टाळून दुसरी भाषा स्वीकारतात म्हणूनच मराठी भाषेची अधोगती सुरू झाली.
महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेचे स्थान काय? हा प्रश्नच अस्वस्थ करणारा आहे. अनेक मराठी वृत्तपत्र, मराठी वाहिन्या २४ तास चालू असताना मराठी भाषेची अधोगती का होते? मराठी शाळा चालविण्यासाठी संस्थाचालकांना अनेक अडथळे आहेत. ‘ना घरी ना दारी’ अशी मराठीची गत आहे. त्याला राजकीय पक्षही अपवाद नाहीत. शिक्षकांचीसुद्धा मराठी भाषा समृद्ध हवी. भाषेतूनच विचार, भावना मनाला भिडतात. तात्यासाहेब शिरवाडकरांनी म्हटल्याप्रमाणे, “नव्या युगाची आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मराठी भाषेत निश्चित आहे. तिच्या सामर्थ्याविषयी आम्ही तिची अपत्ये मात्र दुर्बल आहोत.”
आपणासमोर प्रश्न इंग्रजी भाषेचा नाही, तर मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा आहे. आजही ग्रामीण भागात मराठी भाषा पाय घट्ट रोवून उभी आहे. नागरीसेवा परीक्षेचे निकाल लक्ष वेधून घेतात. मातृभाषेतून शिक्षणाला प्रभावी इंग्रजी भाषेची जोड हवी. मराठी भाषेची अधोगती थांबविण्यासाठी सर्वात प्रथम ती ज्ञान आणि लोकभाषा होणे आवश्यक आहे. अर्ध्या हळदकुंडाने पिवळे झालेले मराठी लोकच मॉल व इतरत्र ठिकाणी मराठी लोकांकडेच दुर्लक्ष करतात. याउलट उच्चपदस्थ मराठी माणूस आदराने मराठीतच बोलतात. केवळ मराठी भाषेच्या प्रेमामुळे अच्युत गोडबोले मराठीत पुस्तके लिहितात.
महाराष्ट्र शासनाने तयार केलेला मराठी विश्वकोश उपलब्ध आहे. शैक्षणिक संकेतस्थळावरून, मराठी भाषेचे इंटरनेट माध्यम प्रगत आहे. मराठी भाषा शिकून नोकरी कोण देणार? असा अप्रचार पसरविला जातो. मराठी भाषेच्या करिअरला वाव आहे. मराठीसोबतच इंग्रजी व अन्य भाषेंचेही ज्ञान हवे. आज अनुवादकांना प्रचंड मागणी आहे. उच्च शिक्षणासोबत सर्व भाषेंचेही अनुवाद करताना ज्ञानाचे, विचाराचे आदान प्रदान होईल. पत्रकारिता, प्रसारमाध्यमे, चित्रपट, नाटक येथेही करिअर घडू शकते. दुभाषी म्हणूनही काम करू शकतो. व्यवहाराच्या बोलीभाषेवर लेखन करू शकता.
अमेरिकेत इंग्रजी भाषेवर जबरदस्ती होत असताना इस्त्राइल, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया येथे आपली भाषा शालेय आणि विशेष प्रयत्नांतून पुनर्जिवीत करण्यात यशस्वी होत आहेत. जपान, जर्मन, फ्रेंच, चीन या देशांत जाण्याआधी त्यांची भाषा शिकावी लागते. मातृभाषेची मौखिक शिदोरी शाळेत जाण्याआधी घरातून मिळते. एक सक्षम भारतीय भाषा म्हणून मराठी भाषेकडे विद्यापीठाने लक्ष देणे गरजेचे आहे. मराठी भाषा आज परिवर्तन प्रक्रियेला तोंड देत आहे. बदल स्वीकारताना लवचिकता न गमावता आपली भाषा सोडू नका.
भाषा ही कोणत्याही समाजासाठी संवादाचे साधन असते. भाषेसोबत त्या भाषेची संस्कृती, परंपरा, इतिहास, विचार येत असतो. भाषेची अधोगती सुरू झाल्यास वरील घटकांना धोका उत्पन्न होतो. भाषा दुर्बल झाली की आपले समाजातले वर्चस्व कमी होते. भाषिक लढ्यात आपण मागे पडतो. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने कोणाचाही दुःस्वास न करता आपल्या परिघातल्या माणसांना जवळ आणले पाहिजे, तरच मराठी भाषेची अधोगती थांबेल.
जाता जाता वि. स. खांडेकरांची एक आठवण – वि. स. खांडेकरांनी ‘श्री’ या अक्षराविषयी एका ठिकाणी लििहले आहे, “इंग्रज समुद्राच्या बेटावर राहणारे, त्यामुळे त्यांची मुळाक्षरे लाटांसारखी. आम्ही सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणारे म्हणून आमच्या अक्षराचे स्वरूप अवघड जागी बांधलेल्या किल्ल्यासारखे !!” मी मराठी !!…