कोकणी बाणा : सतीश पाटणकर
विवेकनिष्ठ विचारांपेक्षा भावनाप्रधानतेला अधिक महत्त्व देणाऱ्या या देशाला आपल्या बुद्धिमत्तेची केलेली गुंतवणूक हीसुद्धा एक मालमत्ता असू शकते. ही कल्पना कशी झेपावी? त्यामुळेच बौद्धिक संपदा किंवा ‘इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी’च्या संरक्षणाबाबत आपण नेहमीच अनभिज्ञ आणि म्हणूनच कदाचित फार बेफिकीर राहिलेलो आहोत. आपण लावलेले शोध, केलेले लिखाण, उत्पादनाची ओळख म्हणून वापरत असलेले एखादे चिन्ह, आपले पारंपरिक ज्ञान, हजारो वर्षांपासून प्रचलित असलेली एखादी हस्तकला ही आपली बौद्धिक संपदा आहे. तिच्यावर आपला हक्क आहे, दुसऱ्या कुणाला आपल्या अपरोक्ष ती वापरू न देणे हा आपला अधिकार आहे, याबाबत आपण बरेचदा अजाण असतो. आपली स्थावर-जंगम मालमत्ता आणि बौद्धिक संपदा यात थोडा फरक आहे. एक म्हणजे बौद्धिक संपदा आपल्याला कधीही मोजता येत नाही. जमीन किती एकर आहे किंवा सोने किती तोळे हे सहज मोजता येते आणि त्यानुसार त्याची किंमतही ठरवता येते. पण बौद्धिक संपदेची मोजदाद बौद्धिक संपदा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्या प्रत्येकीचे संरक्षण करणारे वेगवेगळे कायदे असतात. कुठल्याही कलाकृतीवरचा बौद्धिक संपदा हक्क म्हणजे कॉपीराइट – यात साहित्य, सर्व कला, चित्रपट यांचा समावेश होतो. एवढेच नाही तर संगणकाच्या सॉफ्टवेअर्सवरसुद्धा कॉपीराइटच दिला जातो. एखाद्या उत्पादनाचे किंवा सेवेचे चिन्ह, त्याचे बोधवाक्य, त्या उत्पादनाचे नाव हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे आणि त्यावर दिला जातो तो ट्रेड मार्क, उदा. मर्सिडीजचा स्टार किंवा कोका कोला हे नाव किंवा ‘जिंदगी के साथ भी…जिंदगी के बाद भी’ यासारखी घोषवाक्ये, इतकेच नव्हे तर चिन्हाचा रंग (रिलायन्स ग्रीन) किंवा आवाज म्हणजे अगदी ब्रिटानियाची ‘टिंग टिन टि टिंग’ ही धून या सगळ्यांवर ट्रेड मार्क मिळू शकतो. थोडक्यात, एखाद्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या दर्जाची ओळख ग्राहकाला पटवून द्यायला ज्या ज्या गोष्टी मदत करतात, त्या सगळ्यांवर ट्रेड मार्क घेता येतो.
कुठल्याही क्षेत्रातील नवा शोध मग ते उत्पादन असेल किंवा प्रक्रिया… त्यावर दिले जाते ते पेटंट. पण हे संशोधन निव्वळ शुद्ध वैज्ञानिक संशोधन नको, तर त्याला काही तरी औद्योगिक किंमत असली पाहिजे. वेगवेगळी औषधे, मोबाइल फोन, कार आणि इतर वाहनातले छोटे-छोटे भाग या सगळ्यांवर पेटंट दिली जातात. एखाद्या कंपनीला कुण्या संशोधकाचे असे पेटंटेड संशोधन विकत घेऊन बाजारात आणावेसे वाटले, तर या पेटंटचे मोल अगणित असू शकते आणि अशा वेळी एखाद्या संशोधकाचा अक्षरश: रंकाचा राव होऊ शकतो. औद्योगिक वापरासाठी असलेल्या एखाद्या वस्तूमधल्या एखाद्या कलापूर्ण भागाला – आकार, रंग, रूप यांना इंडस्ट्रियल डिझाइन या बौद्धिक संपदेच्या प्रकाराने संरक्षण देता येते. एखाद्या कारमधले काम करणारे भाग, म्हणजे इंजिन किंवा टायर यावर पेटंटने संरक्षण घेतलेले असते, तर तिचा आकार, रंग, रूप मात्र इंडस्ट्रियल डिझाइनने संरक्षित असतो. थोडक्यात – व्यापारीकरण झालेल्या वस्तूंमधल्या सौंदर्यपूर्ण घटकांवर इंडस्ट्रियल डिझाइन मार्क दिला जातो, तर कॉपीराइट मात्र फक्त शुद्ध कलाकृतींवर असतो.
भौगोलिक निर्देशक किंवा ‘जीआय’ (Geographical Indicator) हा बौद्धिक संपदेचा आणखी एक प्रकार. समृद्ध परंपरा आणि संस्कृती असलेल्या भारतासारख्या प्रत्येक देशासाठी अतिशय महत्त्वाचा. याशिवाय ट्रेड सिक्रेट हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे. ट्रेड सिक्रेट सोडून इतर सर्व संपदा संरक्षित करण्यासाठी आधी घोषित कराव्या लागतात. म्हणजे उदा. संशोधनाला पेटंट हवे असेल, तर ते संशोधन काय आहे ते आधी घोषित करावे लागते. पण कधी कधी मात्र काही माहिती आपल्याला कायम गुप्त राहायला हवी असते आणि तरीही तिला संरक्षण मिळायला हवे असते. याशिवायही बौद्धिक संपदांचे अजून काही प्रकार आहेत.
नोंदणीकृत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग घटक कंपन्या, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग घटक संघटना, उदाहरणार्थ- औद्योगिक संघटना, सोसायट्या, सहकारी, संस्था, विश्वस्त संस्था, स्वयंसेवी संस्था, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग घटकांना सहाय्यक करणाऱ्या शिक्षण संस्था आणि विद्यापीठे या जनजागृतीसाठी अर्ज करू शकतात. किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या तसेच पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि आर्थिक पाठबळ असलेल्या सल्लागार संस्था, संशोधन संस्था, तज्ज्ञ व्यावसायिक किंवा संस्था यासाठी अर्ज करू शकतात.
टीआयएफएसी, पेटंट फॅसिलिटी सेंटर, एनआरडीसी, इंडियन पेटंट ऑफिस, रजिस्टर ऑफ ट्रेडमार्क, रजिस्टर ऑफ जॉग्रफिकल इण्डिकेशन, रजिस्टर ऑफ मनुष्यबळ विकास मंत्रालय, एनआयआय पीएम, लॉ स्कूल, आयटीआय, पेटंट अॅटर्निज, वैयक्तिक बौद्धिक संपदा हक्क सल्लागार, डब्ल्यूआयपीओ, इयू-टीआयडीपी, यूएसबीटीओ, केआयपीओ, केआयपीए, आयआयएफटी, परराष्ट्र, मंत्रालय, संस्था, निमसरकारी अथवा सरकारी अनुदानित संस्था, खासगी कंपन्या या जनजागृती कार्यक्रमात भाग घेऊ शकतात. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग घटकांमध्ये बौद्धिक संपदा हक्क याविषयी जागृती करणे, त्यांच्या संकल्पना आणि व्यावसायिक डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे, बौद्धिक संपदा हक्क तरतुदींचा योग्य वापर केल्यास सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग घटकांना तंत्रज्ञानाचे अद्ययावतीकरण आणि क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी मदत होऊ शकते. यातील प्रत्येक भागासाठी करावयाचा अर्ज आणि मार्गदर्शक सूचना http://www.dcmsme.gov.in/pr10pdf या लिंक वर उपलब्ध आहेत.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)