२०० कोटींच्या गुंतवणुकीतून होणार नवीन रोजगारांची निर्मिती
संतोष राऊळ
ओरोस : एमएसएमईचे देशातील २० वे २०० कोटींची गुंतवणूक असलेले ट्रेनिंग सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करणार आहे. पर्यटनातून आणि उद्योग व्यवसायातून सिंधुदुर्ग आर्थिक सबळ व्हावा ही माझी इच्छा आहे. आता परिवर्तन करायचे आहे. मुंबईवरून येणाऱ्या मनिऑर्डवर अवलंबून न राहता सिंधुदुर्गची ओळख बनवायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने उद्योजक बना, असे आवाहन सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
कोणताही उद्योग लहान-मोठा नसतो, तो उद्योग असतो. पैसे उभारत असंख्य लोकांना रोजगार देण्याचा निर्धार उद्योजक बनणाऱ्या लोकांनी करावा. अमेरिकेत ज्या दर्जाचे मशरूम केले जाते, त्या पद्धतीने देशाच्या उत्तर भागात एका मुलीने उद्योग सुरू केला. त्यांचा आदर्श घ्या. माझ्या खात्यात ६.५ लक्ष उद्योग आहेत, यात आपण कुठे आहोत हे शोधा आणि आजच निर्धार करा. आजच्या परिषदेनंतर सिंधुदुर्गच्या सुंदर निसर्गात समृद्ध उद्योजक घडले पाहिजेत, तेव्हाच खरे समाधान आपल्याला मिळेल, असे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले.
उद्योग उभारण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाकडून उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
काथ्या उद्योगातून आर्थिक उन्नती करा: नारायण राणे
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरामध्ये कोकण कॉयर महोत्सवाचे (काथ्या उद्योग) उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी नारायण राणे यांनी कॉयरच्या सर्व स्टॉलवर भेटी देऊन माहिती घेतली तसेच यामध्ये अजूनही प्रगती करा आणि आर्थिक उन्नती करा, असे आवाहनही उद्योजकांना केले.
कुडाळ येथील एसटी बस मैदानावर कोकण कॉयर महोत्सव पाच दिवस असणार असून यावेळी त्यांच्यासमवेत कॉयर बोर्डाचे अध्यक्ष कुप्पूरमू, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव बी. बी. स्वॅईन, माजी खासदार निलेश राणे, खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, आदी उपस्थित होते.
संपर्क, संवाद, समन्वय कार्यक्रमांचे शानदार उद्घाटन
ओरोस येथे संपर्क, संवाद आणि समन्वय कार्यक्रमांचे केंद्रीय उदयोग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. यावेळी कुंभार कारागिरांना कुंभार चाके, शेतकऱ्यांना मध मक्षिका पालन करण्यासाठी साहित्य, सूत काढण्यासाठी चरखा, अगरबत्तीच्या मशीन, बांबूचे रोप वाटप, तर उद्योगासाठी २ कोटी ५३ लाखांची कर्ज मंजूर झाली. त्याचे वाटप नव उद्योजकांना करण्यात आले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आदी उपस्थित होते.
‘उद्योग क्रांतीचा जिल्हा बनविण्यासाठी तरुण-तरुणींनो उद्योजक बना’
सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण- तरुणींना उद्योजक म्हणून घडविण्यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ ६० अधिकाऱ्यांचे पथक या महाउद्योग परिषदेच्या जिल्ह्यात दाखल झाले आहे. जिल्ह्यातील नवउद्योजक व उद्योजकांना ते मार्गदर्शन करणार असून युवकांना ही मोठी संधी आहे. आगामी काळात सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या नकाशावर झळकला. तसाच आता उद्योगशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग देशाच्या नकाशावर झळकावा यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सिंधुनगरी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
तीनदिवसीय महाउद्योग परिसंवादाच्या निमित्ताने शरद कृषी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. देशभरातील अनेक नवउद्योजकांनी केलेली प्रगती व त्यानिमित्ताने त्या भागात केलेल्या रोजगारांची निर्मिती या परिषदेत आपण व्यवसायाच्या प्रात्यक्षिकासह दाखवली आहे. तरुण-तरुणींनी उद्योजक बनावे, असे आवाहनही राणे यांनी केले.