Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणमाणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट उभारण्यास शासनाची मान्यता

माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट उभारण्यास शासनाची मान्यता

अलिबाग : मुंबई गोवा महामार्गावरील प्रवाशांची नेहमीच मागणी होती आणि रायगड जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सुसज्ज असणे महत्त्वाचे आहे याअनुषंगाने सर्व प्रकारच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे कायम आग्रही असतात. रायगड आरोग्य सुविधा संपन्न होण्यासाठी माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट उभारण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. रायगड जिल्हा आरोग्यदायी होण्यासाठी पालकमंत्री यांनी केलेल्या प्रयत्नांना आणखी एक यश मिळाले आहे.

लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यानुसार रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या माणगाव तालुक्यात येथे ट्रॉमा केअर यूनिट उभारणे गरजेचे होते. कोकण रेल्वे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, पुणे-ताम्हिणी-माणगाव-दिघी हा राष्ट्रीय महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग अशा महत्त्वाच्या वाहतुकीचे केंद्र म्हणून माणगाव तालुका महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील औद्योगिकीकरण व पर्यटन यामुळे या भागातील नागरिकीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाहतुकीदरम्यान होणारे रस्ते अपघात, औद्योगिक क्षेत्रातील अपघात, महापूर, चक्रिवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाणही अलिकडच्या काळात वाढत असल्याचे दिसून येते.

वातावरणीय बदलांमुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती, रस्ते अपघाताप्रसंगी रुग्णांच्या बचावासाठी अतिमहत्त्वाच्या कालावधीत अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळण्यासाठी ट्रॉमा केअर युनिट जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यरत असणे गरजेचे आहे. त्यासाठी माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट उपलब्ध होण्यासाठीची विनंती आदिती तटकरे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलपासून सुमारे ११० कि.मी. अंतरावर असलेल्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयाची १०० इतकी बेड क्षमता आहे. नियोजित ट्रॉमा केअर युनिटमुळे गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत व सुविधा मिळणे आता शक्य होणार आहे.

कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गामुळे उपलब्ध वाहतुक सुविधांमुळे माणगाव परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. शासनाने निश्चित केलेले निकष विचारात घेता लेवल-३ ट्रॉमा केअर युनिटच्या बांधकामासाठी पुरेशी शासकीय जमीन येथे उपलब्ध आहे. आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी सर्व दृष्टीने अनुकूल अशा या ठिकाणी ट्रॉमा केअर उभारण्यासाठी मिळालेल्या शासकीय मान्यतेमुळे तटकरे यांच्या संकल्पनेतील आरोग्य संपन्न-रायगड ही संकल्पना पूर्णत्वास नेणारे एक यशस्वी पाऊल पडल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -