पुणे : पुण्याच्या माजी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली. आता या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झालाय. रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॉपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या त्यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबादमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग करून पोलिसांच्या बदल्या-नियुक्त्यांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे उघड केल्याचा ठपका आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानेही एक गुन्हा दाखल केला आहे. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना पाठवलेला गोपनीय अहवाल मार्च २०२१ मध्ये समाजमाध्यमांवर व्हायरला झाला होता. रश्मी शुक्ला यांच्या या अहवालातील तपशील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले होते. तसेच त्याआधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलिसांच्या नियुक्त्या व बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप केला होता. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गोपनीय अहवाल रश्मी शुक्ला यांनीच फोडत देवेंद्र फडणवीस यांना पुरवल्याचा आरोप केला. या घटनाक्रमानंतर फोन टॅपिंगप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अनोळखी व्यक्तीविरोधात शासकीय गुपिते अधिनियमान्वये (ऑफिशिअल सिक्रेट अॅक्ट) गुन्हा नोंदवला होता.