कीव, युक्रेन : युक्रेनच्या खासदाराने भारताकडून औषधांसह राजकीय मदत मागितली आहे. युक्रेनला केवळ शस्त्रांची गरज नाही तर त्यांना मानसिक पाठिंब्याचीही गरज आहे. रशिया आमच्यासारख्या शांतताप्रेमी देशातील लोकांना मारत आहे. सर्व भारतीय राजकारण्यांनी एका सार्वभौम देशाच्या मानवी हक्कांचे रक्षण करावे, असे युक्रेनच्या खासदार सोफिया फेडयना म्हणाल्या. त्या इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
गुरुवारपासून युद्धाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी युक्रेनमधून अत्यंत विदारक दृश्य समोर आली. अनेक शहरांवर बॉम्बहल्ले करण्यात आले. यामध्ये पहिल्याच दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला. युक्रेनमध्ये नागरिकांवर देखील हल्ले करण्यात येत आहे. एक व्यक्ती सायकलने जात असताना अचानक त्याच्यावर बॉम्बहल्ला झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजधानी कीव शहरावर हवाई हल्ल्याचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
युक्रेनच्या सैन्याने शुक्रवारी पहाटे कीववर घोंगावत असलेले रशियाचे एक विमान पाडले. पण, हे विमान रहिवासी इमारतीवर कोसळले. त्यामुळे इमारतीला आग लागली, असे वृत रायटर्सने दिले आहे.
रशियाविरोधात सायबर हल्ला?
दुसरीकडे निनावी हॅकर्सने रशियाविरुद्ध सायबर युद्धाची घोषणा केली आहे. निनावी हॅकर्सने म्हटले आहे की, आम्ही रशियाविरोधात सायबर युद्धाची घोषणा केली आहे. तसेच काही तासांपासून रशिया टुडे ही वेबसाईट हॅक झाली आहे. त्याची जबाबदारी देखील या गटानं स्वीकारली आहे.
१३ सैनिक ठार
युक्रेनियन बेटावरील १३ सैनिकांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्याने रशियन युद्धनौकेने १३ सैनिकांना ठार केले.
रशियाने निवासी इमरातींवर देखील हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये देखील रशियाने बॉम्ब हल्ले केले आहेत. शुक्रवारी पहाटे कीवमध्ये दोन मोठे स्फोठ झाल्याचे सीएनएनने म्हटले आहे, तर तिसरा मोठा स्फोट राजधानीपासून काही अंतरावर झाला आहे.
रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. या प्लांटमधील कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवण्यात आले होते. 1986 मध्ये घडलेल्या आपत्तीनंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं. आता ही अणुभट्टीवर रशियाच्या ताब्यात असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
कीवसह इतर प्रमुख शहरे ताब्यात घेऊन सरकार स्थापन करण्याचा रशियाचा हेतू असू शकतो, असे अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले.
युद्धाच्या पहिल्या दिवशी तब्बल युक्रेनमध्ये १३७ जणांचा मृत्यू झाला. रशियाच्या हल्ल्यात १० लष्करी अधिकाऱ्यांसह आतापर्यंत ३१६ लोक जखमी झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हवाल्याने एएफपीने हे वृत्त दिले आहे.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी सैन्य पाठवल्यानंतर हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी युद्धाविरोधात निदर्शने केली. त्यानंतर रशियन पोलिसांनी १७०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे, असे वृत्त एफपीने दिले आहे.
दरम्यान, युक्रेनच्या मध्यवर्ती बँकेने रशिया आणि बेलारूसमधील संस्थांना तसेच दोन्ही राष्ट्रांच्या चलनांचा समावेश असलेल्या ऑपरेशन्सवर बंदी घातली आहे.