
मुंबई : शिवसेना उपनेते व मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय आयकर विभागाने धाड टाकली आहे. बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ते शिवसेना आमदार यामिनी यशवंत जाधव यांचे पती आहेत. नवाब मलिक यांच्यानंतर शिवसेनेच्या नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे १५ कोटींची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आयटीच्या तपासणी अहवालात समोर आल्याचा आरोप आहे. भाजपा नेते आमदार अमित साटम यांनी हा आरोप केला होता. स्थायी समितीचे अध्यक्ष असल्यापासून टेंडरच्या माध्यमातून हा पैसा फिरवण्यात आला. मागील २५ वर्षापासून स्थायी समितीत वसुली झाली आहे. २०१५ मध्ये ६ हजारांना महापालिका टॅब विकत घ्यायची त्याची किंमत २०२२ मध्ये २० हजार रुपये दाखवण्यात आली. महापालिकेत दरवर्षी किमान ६ हजार कोटींचे टेंडर पास होतात. २५ वर्षाचा हिशोब लावला तर किमान दीड लाख कोटींचा भ्रष्टाचार स्थायी समितीच्या माध्यमातून शिवसेनेने केला आहे, असा आरोप भाजपाने केला होता.
आयकर विभागाने म्हटले होते की, २०१९ मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती संबंधित चुकीची माहिती जोडली होती. त्यासाठी यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या प्रकरणी आयकर विभागाने यामिनी जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी केली असता ही बाब समोर आली. तपासात कोलकाता येथील शेल कंपन्याद्वारे काही आर्थिक व्यवहार झाल्याचं उघडकीस आलं. ज्यात यामिनी जाधव, त्यांचे पती आणि कुटुंबाने पैसे कमवले होते.
२०११-१२ मध्ये उदय महावर नावाच्या व्यक्तीने प्रधान डिलर्स नावाची कंपनी बनवली होती. त्यात पैसे जमवले त्यानंतर ही कंपनी जाधव कुटुंबाला विकली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात जवळपास ७.५ कोटी संपत्ती असल्याची माहिती देण्यात आली होती. ज्यात २.७४ कोटींची स्थावर मालमत्ता होती. तर आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटी संपत्ती असल्याचं समोर आलं होतं. ज्यात १.७२ कोटींची स्थावर मालमत्ता होती.
दरम्यान तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, नवाब मलिक यांच्याप्रमाणे पहाटेच प्राप्तिकर विभागाचे पथक यशवंत जाधव यांच्या माझगावमधील निवासस्थानी दाखल झाले. मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने आर्थिक निर्णयांमध्ये यशवंत जाधव यांचा सहभाग असतो. पालिकेच्या कंत्राट आणि अन्य व्यवहारांमध्येही स्थायी समितीची महत्वाची भूमिका असते. याआधी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या महिन्यात यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. यशवंत जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे म्हटले होते.
यशवंत जाधव यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी
यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय आणि माझगाव विभाग संघटक विजय लिपारे यांच्या काळाचौकीच्या घरी सुद्धा आयकर विभागाची टीम दाखल असल्याचे समजते. त्यांच्या घरी देखील छापेमारी सुरू आहे.
यशवंत जाधव हे शिवसेना उपनेते आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहेत
राजकीय कारकीर्द
१९९७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड
२००७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले
२००८: बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी निवड
२०११ नंतर: उपनेते, शिवसेना
२०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवड
२०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून नियुक्ती
२०१८: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड, एप्रिल २०१८ पासून यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्ष आहेत, ही स्थायी समिती अध्यक्ष पदाची त्यांची ३ टर्म आहे.