वॉशिंग्टन : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याने अमेरिका संतापली आहे. मात्र, त्यांनी युक्रेनच्या बाजूने लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. परंतु, रशियाला धडा शिकवण्यासाठी अमेरिका विविध प्रकारची तयारी करत असल्याचेही समजते. याचेच संकेत खुद्द अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आज (शुक्रवार) दिले. युक्रेन जिंकल्यानंतरही रशियातील रक्तरंजित खेळ असाच दीर्घकाळ चालणार आहे, असा स्पष्ट इशारा ब्लिंकन यांनी रशियाला दिला.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर आणखी कडक निर्बंध लादण्याचं ठरवले आहे. ते म्हणाले, G7 देश रशियावर कठोर निर्बंध लादण्यास तयार आहेत. यासोबतच आम्ही युक्रेनच्या धाडसी लोकांच्या पाठीशी उभे आहोत. आज सकाळी मी माझ्या G7 समकक्षांशी (प्रतिनिधी देश) भेटलो आणि युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या अन्यायकारक हल्ल्याबद्दल चर्चा केली. बैठकीत रशियावर आणखी कडक निर्बंध आणि इतर आर्थिक निर्बंध लादण्यावर सहमती झाली आहे. G-7 हा जगातील सात प्रगत अर्थव्यवस्थांचा एक गट आहे. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे.
रशिया-युक्रेन संघर्षाबाबत अमेरिकेत उच्चस्तरीय बैठकांची मालिका सुरू आहे. या बैठकीनंतर अँटोनी ब्लिंकन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, युद्ध हा काही दिवस किंवा आठवडे चालणारा खेळ नाही. तो एक दीर्घकाळ चालणारा खेळ आहे. रशियाने जाणूनबुजून स्वतःला या खेळात अडकवले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रशियाला त्यांच्या लष्करी शक्तीच्या जोरावर युक्रेनमध्ये सरकार स्थापन करायचे आहे. युक्रेनमधील सध्याचे सरकार हे अमेरिका समर्थक आहे, त्यामुळे रशियाने हे युध्द पुकारले आहे. हे सरकार अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडी नॉर्थ अटलांटिक मिलिटरी ऑर्गनायझेशनमध्ये (नाटो) युक्रेनच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे संतप्त झालेल्या रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिका युक्रेनच्या बाजूने थेट लढाईत उतरणार नाही, पण ती रशियाला सहजासहजी सोडणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीही अद्याप युक्रेनमध्ये सैन्य तैनात करण्याबाबत नकार दिला आहे. परंतु, रशियाला जे मदत करतील त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बायडन यांनी दिला. तर, दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी आपल्या भाषणात सांगितलंय की, युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू करण्याचं कारण म्हणजे, शेजारील देशांकडून येणाऱ्या धोक्यांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय. बाहेरुन कुणीही यात हस्तक्षेप केल्यास याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकीच दिलीय. पुतीन यांनी पश्चिमेकडील अमेरिका तसेच नाटोमधील देशांना उद्देशूनच ही धमकी दिल्याची चर्चा आहे.