कीव, युक्रेन : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अखेर युक्रेनवर लष्करी आक्रमणाचे आदेश दिले आहेत. गुरुवारी सकाळीच पुतीन यांनी पूर्व युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचा आपला मनसुबा उघडपणे व्यक्त केला. रशियन सैन्य आता क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये दाखल होत आहे. या परिस्थितीत युक्रेनने जगाकडे रशियाला रोखण्यासाठी मदतीची मागणी केली आहे.
‘पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला चढवला आहे. युक्रेनच्या शांत शहरांवर हल्ले होत आहेत. युक्रेन स्वतःचा बचाव करेल आणि जिंकेलही. परंतु, जग पुतीन यांना थांबवू शकतं आणि त्यांना रोखण्याची गरज आहे. कारवाईची हीच वेळ आहे’ असं वक्तव्य युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केलं आहे.
सोबतच, पुतीन यांनी इतर देशांनाही इशारा दिला आहे. रशियन कारवाईत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास ‘यापूर्वी कधीही पाहिलेले नाही’ अशा परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा, अशी धमकी त्यांनी पाश्चिमात्य आणि युक्रेनच्या मित्रदेशांना दिली आहे.