मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटल्याने आज गुरुवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली. गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. या पडझडीत सेन्सेक्स २००० अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल ५८० अंकांनी कोसळला. या घसरणीत जवळपास पाच लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
बाजार सुरु होताच सर्वच क्षेत्रात विक्रीचा मारा दिसून आला. बँका, ऑटो, पीएसयू यामध्ये प्रचंड विक्री झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम याची चिंता गुंतवणूकदारांना लागली आहे.
सेन्सेक्स मंचावरील सर्वच्या सर्व ३० शेअरमध्ये मोठी घसरण झाली. एसबीआय, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टीसीएस, या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. निफ्टी मंचावरील सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात २ ते ३ टक्के इतकी प्रचंड घसरण झाली. यात बँकांच्या शेअरला मोठा फटका बसला. अदानी पॉवर, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, टाटा मोटर्स, येस बँक, धनी सर्व्हिसेस, सेल या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.
सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८०९ अंकाच्या घसरणीसह ५५४२२ अंकावर आहे. निफ्टी ५०५ अंकांनी कोसळला असून तो १६५५८ अंकावर ट्रेड करत आहे. या पडझडीने गुंतवणूकदार मात्र चांगलेच होरपळून निघाले आहेत.