
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून, राज्यभरात ठिकठिकाणी भाजपविरोधात आंदोलने, निदर्शने केली जात आहे. यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर, पण त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. सोमय्यांनी 'डर्टी डजन'ची लिस्ट दाखवली आणि यापैकी कोणाचा नंबर लागणार यासाठी ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
किरीट सोमय्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत अधिकाऱ्यांच्या नावाने धमक्या देतात. किरीट सोमय्याला, पत्नीला आणि मुलाला जेलमध्ये टाकणार अशी धमकी दिली जाते. हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना शोभते का? आम्ही सर्व कुटुंब जेलमध्ये जायला तयार आहोत, पण हे डर्टी डझन महाराष्ट्राला लुटत आहेत. त्यांचा हिशोब होणार. डर्टी डझन ही केवळ १२ नावे नाहीत, तर त्यांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.
मी संजय राऊत नाही. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचे नाव संजय राऊत सांगू शकले नाही. कुठे आहे वाधवान? आम्ही कागदपत्रांसह सांगतो. आता १२ नेत्यांपैकी पुढचा नंबर कोणाचा ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काढू द्या. कोणत्या नेत्याला आधी तुरुंगात पाठवायचे, हे त्यांना ठरवू द्या, असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे यांचा घोटाळा सिद्ध झालाय. मुख्यमंत्री गप्प बसले, हिंमत असेल तर उत्तर द्या. कितीही दबाव आणला तरी फरक पडणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1496763567726493696
दरम्यान, संजय राऊत यांच्या धडपडीवरून लक्षात येतं की आता कुणाची बारी आहे. मविआचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? डर्डी डझनची यादी जाहीर केली आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परब आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झालीय. बेनामी रिसॉर्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू झाली, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.