नवी दिल्ली : जून २०२० पासून भारतात बंदी असलेल्या टिकटॉकला (TikTok) टक्कर देण्यासाठी फेसबुक (Facebook) आता स्वतःचे रील बाजारात आणत आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये यूएसपासून रोल आउट करण्यास सुरुवात झालेलं ‘फेसबुक रील्स’ (Facebook Reels) हे फीचर आता १५० देशांमध्ये उपलब्ध आहे, असं कंपनीनं एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.
भारत सरकारनं टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर पहिल्यांदा इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून भारतात रील सादर करण्यात आले होते. स्मॉल व्हिडिओ फॉरमॅटच्या माध्यमातून रील्स आणि टिकटॉक दोन्ही समान सर्व्हिस देतात. इन्स्टाग्राम आणि फेसबुक रील्स एक मिनिटांच्या ड्युरेशनचे असू शकतात. व्हिडिओ पाहिजे तसे एडिट करण्यासाठी युजर्सला अॅपमधील टूल्सचा होस्ट म्हणून अॅक्सेस मिळतो. एकदम लेटेस्ट फीचर्सचा आनंद घेण्यासाठी अॅपचं लेटेस्ट व्हर्जन (App Version) वापरण्याचा सल्ला युजर्सला दिला जात आहे.
मेटाच्या म्हणण्यानुसार, युजर्सना सर्चमध्ये मदत करण्यासाठी कंपनी नवीन ठिकाणी रील आणत आहे. यामध्ये ‘रील्स इन स्टोरीज’ (Reels in Stories) नावाच्या फीचरचा समावेश असून यामुळे युजर्सना पब्लिक रील आपल्या फेसबुक स्टोरीवर शेअर करता येणार आहेत. युजर वॉच टॅबमध्ये (Watch Tab) आणि फीडच्या टॉपलादेखील रील शेअर करू शकतात. याशिवाय फीडमध्येसुद्धा काही रील सजेस्ट केले जातील. परंतु, ही सुविधा सध्या फक्त निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीनं पुढं असंही म्हटलं आहे की, क्रिएटर्सला त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम ऑडियन्ससोबत रील्स शेअर करणं सोपं व्हावं यासाठी कंपनी क्रॉसपोस्टिंगसारखे (Cross posting) सोपे पर्याय शोधत आहे. फेसबुक रील्स युजर्सना पब्लिशरला फॉलो करण्याची परवानगी देईल. याशिवाय ते त्यांच्या आवडत्या व्हिडिओवर कमेंट आणि लाईकदेखील करू शकतात.
फेसबुक रील्सच्या माध्यमातून कमवा पैसे
अलीकडे, अनेक टिकटॉक युजर्सनी क्रिएटर्सच्या फंड डिस्ट्रिब्युशनबाबत (Funds Distribution) शंका व्यक्त केली आहे. मेटा या समस्येचं निराकरण करत आहे आणि अधिकाधिक रील्स युजर्स व क्रिएटर्सला आपल्या प्लॅटफॉर्मवर आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी तिच्या रील्स प्ले बोनस (Reels Play Bonus) प्रोग्रामद्वारे क्रिएटर्सला कमाई करण्याची संधी निर्माण करत आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून पात्र क्रिएटर्सला व्ह्युज आणि इतर घटकांवर आधारित दरमहा 35 हजार डॉलर्सपर्यतची रक्कम मिळू शकते. येत्या काही महिन्यांत मेटा आपला हा बोनस प्रोग्राम अधिक देशांमध्ये सुरू करणार आहे.
फेसबुक रील्स क्रिएटर्स (Facebook Reels Creators) मेटाच्या मॉनिटायझेशन प्रॉडक्ट्सद्वारे कमाई करण्यासदेखील पात्र असतील. इन-स्ट्रीम जाहिराती (In-stream Ads) आणि आधीपासूनच फेसबूक लाईव्हवर (Facebook Live) ऑफर केल्या जाणाऱ्या स्टार्सच्या माध्यमातून कमाई होऊ शकते. या ओव्हरले अॅड्स (Overlay Ads) मध्येच प्ले न होता व्हिडिओच्या टॉप किंवा बॉटमला असलेल्या एका लहान बॉक्समध्ये दिसतील. मेटानं दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक रील्समधील ओव्हरले अॅड्सच्या चाचण्यांमध्ये यूएस, कॅनडा आणि मेक्सिकोमधील सर्व क्रिएटर्सचा समावेश केला जाणार आहे. याशिवाय येत्या काही आठवड्यांमध्ये अधिक देशांमध्ये या टेस्टिंगचा विस्तार केला जाणार आहे. इतर देशांना मार्चच्या मध्यापर्यंत इन-स्ट्रीम अॅड्स प्रोग्राम मिळण्याची शक्यता आहे.
ब्रँडसाठी कंटेंट समजून घेणं आणि त्यांचा रीच ट्रॅक करण्यासाठी, मेटानं (Meta) नवीन टूल्स लाँच करण्याची घोषणा देखील केली आहे. यामध्ये फेसबुक रील्समधील बॅनर आणि स्टिकर जाहिरातींसाठी असलेली पब्लिशर्स लिस्ट, ब्लॉकलिस्ट, इन्व्हेंटरी फिल्टर्स (Inventory Filters) आणि डिलिव्हरी रिपोर्ट्सचा समावेश आहे. कंपनीला ज्या ठिकाणी आपल्या जाहिराती प्रदर्शित होऊ नयेत असं वाटतं अशा ठिकाणीही त्यांची जाहिरात कशा पद्धतीने प्रदर्शित व्हावी यावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा या नव्या टूल्समुळं जाहिरातदार कंपनीला मिळणार आहे, असं मेटानं स्पष्ट केलं आहे.
एकूणच फेसबूकनं टिकटॉकला टक्कर देण्याची पूर्ण तयारी केली आहे. फेसबुकच्या या नवीन अपडेटला युजर्स कसा प्रतिसाद देतील यावर या अपडेटचं यश अवलंबून आहे.