नागपूर : बाळासाहेब ठाकरे हयात असताना महाराष्ट्रात शिवसेना होती. परंतु, आता ती काँग्रेससेना बनल्याची टीका आमदार रवी राणा यांनी गुरुवारी नागपुरात केली. तसेच आपण विदर्भाचे सुपुत्र असून १५ वर्षांपासून लोक निवडून देताहेत. त्यामुळे कुणातही आपल्याला थोपवण्याची क्षमता नसल्याचे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातून ट्रांझिक बेल घेतल्यानंतर गुरुवारी ते विमानाने नागपूरला पोहचले. त्यांना २८ तारखेपर्यंत बेल मिळालेली आहे. यावेळी राणा म्हणाले की, मी अमरावतीत नसतानाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र केले. माझ्याविरोधात ३०७ सारखे खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या यांच्या दबावात झाल्याचे राणा यांनी सांगितले. महाविकास आघाडी खोटे गुन्हा दाखल करून आमदाराला फसवत आहे. आमदारासोबत अस घडत असेल तर सामान्य जनतेचे काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मी दिल्लीत असताना माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करतात ही फसवणूक आहे. आज मी दिल्लीतील न्यायालयातून ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा १२०० कोटींचा घोटाळा उघडकीस येईल. ईडी त्याचा तपास करीत आहे. या सरकारचे अनेक मंत्री ईडीच्या रडारवर आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब यांचे घोटाळे देखील समोर येतील. त्यांच्या फाईल तयार असल्याचा इशारा आमदार राणा यांनी यावेळी दिला.