
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्याचे महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटले आहेत. आज महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सकाळी १० वाजल्यापासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतील नेते आंदोलनाला बसले आहेत.
केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या भाजपच्या दडपशाहीविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळी मंत्रालयाजवळ असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार व पदाधिकारी केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने करत आहेत. तर शुक्रवारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून जिल्हा पातळीवर या दडपशाही विरोधात मोर्चे काढणार आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
“कोणत्याही मंत्र्याचे नाव दाऊदसोबत जोडले की त्याची बदनामी करायला सुरूवात करतात. नवाब मलिकांनी काहीही चुकीचे केलेले नाही. भाजपा अनेक नेत्यांना धमकावत आहे. दाऊदचे संबंध मुद्दाम मलिकांसोबत जोडले जात आहेत, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
केंद्रातील तपास यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सरकार तसेच मंत्र्यांविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्टच दिसत होते. त्यादृष्टीने आवश्यक पार्श्वभूमी तयार करीत नवाब मलिक यांच्या निमित्ताने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हा राजकीय डाव साधला गेल्याची भावना महाविकास आघाडीमध्ये आहे. तसेच अशावेळी भाजपच्या राज्यातील काही नेत्यांविरोधात गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचाराचे थेट पुरावे असतानाही कचखाऊ धोरण बाळगल्याचाच हा परिपाक आहे. त्यामुळे आता तरी राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेतृत्वाने जागे होत केंद्राच्या या कारवाईला जशास तसे उत्तर द्यावे, अशी उघड मागणी सत्ताधारी पक्षांतील सर्वच मंत्री एकमुखाने करू लागले आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.