झुंजार पेडणेकर ( आंगणेवाडी) : श्री देवी भराडी मातेचा जयजयकार ऽऽऽऽ, श्री देवी भराडी माते नमो नम:ऽऽऽऽ असा चाललेला जयघोष, आंगणे कुटुंबियांच्या वार्षिकोत्सवाच्या म्हणजेच यात्रेच्या पार्श्वभुमीवर देवालयाच्या गाभाºयासह सभामंडपात केलेली फुलांची सजावट, आणि मंदिराच्या कळसावरुन केलेला फिरत्या लेझर लाईटचा शो या मुळे आंगणेवाडीचा नजारा अवर्णणीय असाच वाटत होता. प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कोरोनाच्या निर्बंधाखाली होत असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी मातेच्या यात्रेला गुरुवारी जनसागर लोटला होता.

मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमान्यानी देवीच्या दर्शनासाठी पहाटे दोन वाजल्या पासून रांगा लावल्या होत्या. आंगणे कुटुंबिय आणि जिल्हा प्रशासनाच्या चोख नियोजना मुळे एकूण नऊ रांगा तसेच मुखदर्शन व्यवस्थे मुळे भाविकाना कमीत कमी वेळेत देवीचे दर्शन झाले. आंगणे कुटुंबियांच्या वतीने अत्याधुनिक ड्रोन कॅमेºयाद्वारे आंगणेवाडी यात्रा परिसराचे केलेले शुटिंग तिन ठिकाणी लावलेल्या डिजीटल बोर्ड वर दाखविण्यात येत असल्याने एक वेगळेपण याची देही याची डोळा भाविकाना अनुभवता आले.
सायंकाळ नंतर भाविकांचा ओघ वाढला
यात्रे दरम्यान अनेक राजकीय, शैक्षणिक, औद्योगीक, तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची भराडी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत मांदियाळी फुलली होती. दुपार पर्यंत भाविकानी फुलुन गेलेला आंगणेवाडीचा परिसर सुर्यास्ता नंतर तर गर्दीने ओव्हरफ्लो झाला. प्रतिवर्षी पेक्षा भाविकांची गर्दी कमी प्रमाणात दिसून आली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी महापौर दत्ता दळवी,आमदार रवींद्र फाटक, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर,जिल्हा पोलिस प्रमुख राजेंद्र दाभाडे,अरुण दुधवडकर, मेडिकल कॉलेज सीईओ आसावरी राजोपाध्यय, अभिनेते भूषण कडू, खास विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, परिवहन मंत्री अनिल परब, जि.प. मुख्य कार्य अधिकारी प्रजित नायर, माजी आमदार श्याम सावंत, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभपती राजेंद्र परुळेकर, माजी जि.प. अध्यक्ष अशोक सावंत, आमदार रमेश कोरगावकर, खासदार राजन विचारे, भाजप डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, उद्योजक दीपक परब, उद्योजक दीपक सावंत, गोसावी ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब गोसावी, मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत, तसेच विविध लोकप्रतिनिधींनी दर्शन घेतले. लाईफ टाईम हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य सुविधा स्टॉल , विजय क्रीडा मंडळ वैधकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.कोकणरेल्वे प्रवासी सेवा संघ पदाधिकारी यांनी सुद्धा दर्शन घेतले.
दरम्यान आंगणे कुटुंबियांच्या वतीने राणे कुटुंबाला उत्तम आरोग्य तसेच विविध तऱ्हेने होत असलेल्या त्रासाचा सामना करताना देवीचे आशीर्वाद असावे यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचा तुलाभर करून नवस करण्यात आला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
पहाटेच्या बोचऱ्या थंडीची तमा न बाळगता भाविकानी रांगेद्वारे दर्शन घेतले. दर्शन रांगामध्ये भाविकांची गर्दी दिसून आली नाही. काही वेळातच भाविकांना दर्शन मिळत होते. भाविकाना आवश्यक सुचना देण्यासाठी बाबु आंगणे, बाळा आंगणे आदि मेहनत घेत होते. पोलीस विभागाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एस. टी. महामंडळाने केवळ मालवण व कुडाळ स्टॅण्ड कडून थेट बस सेवा ठेवल्या होत्या. गावागावातून खास यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन न केल्याने भाविकांची गैरसोय झाली. मसुरे येथून शिवसेना नेते कै जयवंत परब यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतच्या वतिने मोफत बस सेवा ठेवण्यात आली होती. जिल्हा बँकेच्या वतीने फिरती एटीम सेवा, बचत गटाना स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले होते. विजय क्रिडा मंडळाच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. लाइफ टाईम हॉस्पिटल कडून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने नियंत्रण कक्षा कडून ग्रामस्थाना वेळोवेळी सुचना देण्यात येत यात्रेत छोट्या मुलांचे मुख्य आकर्षण असलेले आकाश पाळणे, मौत का कुवा तसेच इतर फनफेअर याना यावर्षी कोरोनाचे निर्बध असल्याने परवानगी नाकारली होती.त्यामुळे देवालय लगतच्या परिसरात कमी गर्दी दिसून आली. शुक्रवारी मोड यात्रेने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.
वेगवेगळी पदे मिळाले ती आई भराडीदेवीच्या आशीर्वादामुळेच : केंद्रीयमंत्री नारायण राणे
मला विविध क्षेत्रात यश तसेच वेगवेगळी पदे मिळाले ती आई भराडीदेवीच्या आशीर्वादामुळेच. त्यामुळे न चुकता मी आंगणेवाडी यात्रेला येतो. केलेली विकास कामे मी कधी सांगत नाही. गेली ३३ वर्षे विविध पदावर देवीच्या आशीर्वादाने जनकल्याण करावं यासाठी मी प्रयत्नशील आहे. केंद्रात एमएसएमइ या खात्याचा मंत्री असून ८० टक्के उद्योग या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. चांगल्याला चांगलं म्हणावं. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. आज देवीला एकच प्रार्थना करणार आहे, देवी माझ्याशी राजकारणात दृष्ट बुद्धीने वागणारे, माझ्यावर विविध मार्गाने अडचणी निर्माण करून द्वेषाची भावना ठेवणाऱ्यां राजकारण्यांना उत्तम आरोग्य दे! आणि या लोकांना सामोरे जाण्याची ताकद राणे कुटुंबाला देवीने द्यावी असे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आंगणे कुटुंबियांचे स्वागत स्वीकारल्यानंतर सांगितले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार हल्ला करताना परखड विचार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मांडले. शिवसेना पदासाठी सत्तेत आहे.शिवसेनेची केंद्रात सत्ता येणे लांबची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मगिलवेळी १८ खासदार निवडून आले होते. पुढच्या वेळी पाच खासदार सुद्धा असणार नाहीत. भाजपचे देशात ३०१ खासदार आहेत. संजय राऊत वेड्यासारखे बोलत आहे. देशद्रोही लोकांचे समर्थन करत आहे. त्यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या पापाबद्दल बोलावे. हिंदुत्वाचा त्याग करून सत्तेत बसलेल्यांनी आम्हाला सत्तेत येऊ असे सांगू नये. खरंतर देशद्रोही माणूस आज मंत्रीपदावर आहे. नवाब मलिक यांना राष्ट्रवादी सहित सर्वजण समर्थन करत आहेत. त्यामुळे कडवट हिंदुत्ववादी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सुद्धा देश द्रोही लोकांचे समर्थन करण्यासाठी उपोषण करत आहे. या सर्वांना देशद्रोही कायद्याखाली अटक केली पाहिजे असेही सांगितले.
आई भराडी देवीच्या आशीर्वादाने राणे कुटुंबाला नेहमीच यश मिळाले : आ. नितेश राणे
राणेसाहेब केंद्रात मंत्री झाल्यानंतर तसेच कोरोना संकटानंतरचा हा पहिलाच यात्रोत्सव आहे. आई भराडी देवीच्या आशीर्वादाने राणे कुटुंबाला नेहमीच यश मिळाले आहे. राणे साहेबांच्या नेतृत्वा खाली जिल्ह्याचा विकास चालू आहे. या भागाच्या विकासासाठी राणे साहेबांचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक आहेत. कुडाळ मालवणच्या जनतेने निलेश राणे यांच्या रूपाने पुढील निवडणुकीत आणखीन एक आमदार निवडून द्यावा. या भागातील विकासाचा प्रश्न पूर्णपणे दूर करण्याची ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या वतीने देत आहे. आंगणेवाडीतील विकासकामांसाठी जसे यापूर्वी योगदान राणे कुटुंबाचे लाभले त्याच पद्धतीचे योगदान पुढील कालावधीमध्ये सुद्धा लाभेल असे यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता येऊ दे : आ. आशिष शेलार
२५ वर्ष एकाच घराण्याजवळ मुंबई महानगरपालिका सत्ता आहे. ठेकेदारी, कमिशन याच साठी महानगरपालिकेत यांना सत्ता हवी आहे. नागरिकांना सुविधा देण्यात सत्ताधारी कमी पडत आहेत. भाजप चे पूर्ण बहुमत येऊन मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता येऊ दे अशी प्रार्थना केल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले