Wednesday, February 19, 2025
Homeमहत्वाची बातमीपुतीन यांच्याकडून युद्धघोषणा

पुतीन यांच्याकडून युद्धघोषणा

युक्रेनला शरणागती पत्करण्याचे आवाहन

मॉस्को, रशिया : युक्रेन आणि रशिया आता प्रत्यक्ष रणांगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धाची घोषणा केली असताना हे युद्ध थांबवणे संयुक्त राष्ट्राची जबाबदारी असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तिकडे रशियाने लष्करी कारवाईची घोषणा करतानाच युक्रेनची राजधानी किव आणि पूर्वेकडील बंदरावरील शहर मारिओपोल येथे स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनमध्ये आणीबाणी लागू केली असून सर्व विमान वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध लष्करी करावाई करण्याची घोषणा केली आहे. युक्रेन आणि रशियाचं युद्ध टाळलं जाऊ शकत नाही, असंही वक्तव्य पुतीन यांनी केले आहे. त्यामुळे, रशियाचा प्रत्यक्ष युद्धाचा मनसुबा आता उघडपणे समोर आला आहे.

रशियाकडून स्पेशल मिलिटरी ऑपरेशन लॉन्च केलं जात असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय. ‘युक्रेनचं निशस्त्रीकरण’ हे पुतीन यांचं ध्येय आहे. युक्रेनच्या लष्करानं शस्त्रास्त्र टाकून घरी निघून जावं, असं आव्हान देत पुतीन यांनी युक्रेनला शरणागती पत्करण्यास सांगितलंय.

युक्रेनवर कब्जा मिळवण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं पुतीन यांनी म्हटलंय. यापूर्वी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी
‘येत्या काही दिवसांत रशिया युरोपमध्ये मोठ्या युद्धाला सुरूवात करू शकतं’ अशी शक्यता वर्तवली होती.

याच घडामोडींदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी युद्धाच्या भीतीनं रशियाच्या समकक्षासोबतची बैठक रद्द केली. सोबतच, ‘रशियाने आधीच केलेल्या अपराधांची किंवा ज्या अपराधांची त्यांची योजना आहे त्याबद्दल त्यांना दंड देण्यासाठी जगानं आपल्या सर्व आर्थिक सामर्थ्यासहीत प्रत्यूत्तर द्यायला हवं, असं आवाहन ब्लिंकेन यांनी जगाला केलं होतं.

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्राकडून रशियाला हल्ला रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -