मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर जल्लोष करणे मुंबई भाजपाचे नेते मोहित कंबोज यांना महागात पडले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर मुंबई पोलीस बुधवारी रात्री मोहित कंबोज यांच्या घरीही गेले होते. त्यानंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर मोहित कंबोज यांनी आपल्या समर्थकांसहीत घराबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपा समर्थकांनी पक्षाचे झेंडे फडकवत जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली. यावेळी फटाके फोडले. तसेच कंबोज यांनी म्यानातून तलवार काढत ती हवेत उंचावली. या सर्व जल्लोषाचा व्हिडिओ समोर आला. मुंबई पोलिसांनी घरी जाऊन कंबोज यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमवणे, सार्वजनिक ठिकाणी तलवार नाचवून शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.