मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड कनेक्शनमध्ये एका मालमत्ता व्यवहार प्रकरणी ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत त्यांना अटक केली.
बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ईडीचे एक पथक मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी विविध ठिकाणी झडत्या घेतल्या. त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास या पथकाने नवाब मलिक यांना ताब्यात घेतले. सात वाजण्याच्या सुमारास हे पथक मलिक यांना ईडीच्या फोर्ट येथील कार्यालयात घेऊन आले. तेथे दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यात आल्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे जगताशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती आहे.
१९९३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील एका आरोपीची मुंबईतील जमीन मलिक यांनी विकत घेतली होती. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल करण्यासाठी ईडीचे अधिकारी बुधवारी पहाटेच मलिक यांच्या घरी दाखल झाले. मलिक यांच्यापूर्वी गुन्हेगारी जगताशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे आहे. अटकेनंतर मलिक यांची जे. जे. रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे जवळजवळ तीन तास दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात जवळपास दोन तास चाललेल्या युक्तिवादात ईडीतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी काम पाहिले.
राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर
मलिक यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आला आहे. हे होणारच होते. मलिक यांचे डी, आणि ए, बी, सी की आणखी काही गँगशी असलेले संबंध आता उघड होतील. – नारायण राणे, केंद्रीय मंत्री
मुस्लीम असल्याने टार्गेट
काहीही झाले आणि त्यात मुस्लीम कार्यकर्ता असला, तर दाऊदचे नाव घ्यायचे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर याचे हे सर्वात मोठे
उदाहरण आहे. – शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष
मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
ईडीने अटक केल्यामुळे नवाब मलिक यांनी नैतिकता म्हणून तसेच कायदेशीर बाब म्हणून त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
लोकशाही मूल्यांची पायमल्ली
केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून शासकीय यंत्रणांना राजकीय आयुध म्हणून वापरल्याने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. आम्ही राष्ट्रवादीचे सर्व सहकारी मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. – दिलीप वळसे – पाटील, गृहमंत्री