मुंबई : मुख्यमंत्री आता कशाची वाट पाहताहेत? तुमचा एक मंत्री मुलीच्या आत्महत्या प्रकरणात गेला, तुमचा गृहमंत्री जेलमध्ये आहे, मुंबईचे पोलिस कमिश्नर अचानक गायब होतात, त्यांच्यावरही केसेस आहेत. तुमचा एक पोलिस अधिकारी सचिन वाझे जेलमध्ये आहे, तुमचे एक मंत्री ईडीसमोर हजर राहत नाहीत, म्हणून त्यांना सक्तीने हजर करावे लागते. आज अल्पसंख्याक मंत्र्यांना अटक झाली. तुमच्या परिवहन मंत्र्यांचे रिसॉर्ट तोडण्याची केंद्रातून ऑर्डर निघाली तर दुसऱ्या एकाने भीतीपोटी स्वतःच बंगला तोडला,’ अशाप्रकारे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या प्रकरणांचा पाढाच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी वाचला.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मलिकांच्या अटकेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘अशाप्रकारचे आरोप झाल्यानंतर नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही. मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करतो की, त्यांनी मलिक यांची तात्काळ हकालपट्टी करावी. मलिकांची हकालपट्टी केली नाही’, तर भाजप आंदोलन करेल.
ते पुढे म्हणाले की, ‘तुमच्या लोकांनी कोविड महामारीत घोटाळे केले, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या नावे असलेले १९ बंगले गायब झाले. तुमच्या एका मंत्र्यांच्या दोन बायका आहेत, जे कायद्यात बसत नाही, ही यादी वाचताना मला दम लागला. मी एक नोट तयार केली आहे, ज्यामध्ये या सरकारमधील मंत्र्यांनी काय-काय केले त्याची यादी आहे. ही यादी तयार करताना २२ पाने भरली. ही अशी सगळी प्रकरणे असूनही सरकार काहीच करत नाहीत’, अशी टीका पाटील यांनी केली.