नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह देशवासीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्या अनुषंगाने मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाने २४२ जण सुखरूप मायदेशी परतले.
या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी तेथील तणावपूर्ण स्थितीचे अनुभव कथन केले. यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी सांगितले की, तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतलो.
एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमानाने दिल्लीहून मंगळवारी सकाळी ७.३० वाजता उड्डाण केले. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता बोरिस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते उतरले. त्यानंतर विमानाने भारतीयांना घेऊन मायदेशी परतीचा प्रवास केला. युक्रेनमधून सुमारे २४० भारतीयांना घेऊन मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.