मुंबई : युक्रेन-रशिया यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह ५६,४३८.६४ अंकावर उघडला. काल बाजार ५७,६८३.५९ अंकावर बंद झाला होता. यानंतर सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला होता. सध्या, निफ्टी २३४.१० अंकासह १६,९७२.५५ च्या पातळीच्या आसपास दिसत आहे. त्याचवेळी, सेन्सेक्स १००१.६१ टक्क्यांनी घसरून ५६,६८१.९८ च्या पातळीवर आहे.
रशिया-युक्रेन संकट अधिक गडद झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेतील वातावरण खराब झाले आहे. आशिया, युरोपपासून रशियापर्यंतच्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सिंगापूर एक्सचेंज लिमिटेडमध्ये निफ्टी १७५ अंकांनी घसरला आहे. तर डाऊ फ्युचर्स सुद्धा ५०० अंकांच्या आसपास खाली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात निर्माण झालेल्या युद्ध सदृष्य परिस्थितीत, रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क आणि लुगांस्कला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केल्यानंतर युरोपियन युनियन, नाटो तसेच अमेरिका-यूकेसह अनेक देशांनी निषेध नोंदवला असून युक्रेनच्या मुद्द्यावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचीही बैठक होणार आहे. या बैठकीत रशियावर नवीन निर्बंध लादण्याची शक्यता आहे.
रशियाने दोन फुटीरतावादी प्रांतांना मान्यता दिली आहे. त्याचवेळी रशियाकडून युक्रेनवर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. या राजकीय तणावामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. भारतीय शेअर बाजारात निफ्टीवरील आयटी निर्देशांक दोन टक्क्यांनी घसरला आहे, तर बँक आणि वित्तीय निर्देशांक १ ते १.५ टक्क्यांनी घसरला आहे. ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरूण खाली आले आहेत. दरम्यान, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ५ लाख कोटींहून अधिक खाली आले आहे.