Wednesday, March 26, 2025
Homeक्रीडाअजित आगरकरला गोलंदाजी प्रशिक्षक बनवा

अजित आगरकरला गोलंदाजी प्रशिक्षक बनवा

भारताच्या अनुभवी क्रिकेटपटूंची मागणी

मुंबई (प्रतिनिधी): मराठमोळा क्रिकेटपटू आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने २०२३ वनडे विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा भार सांभाळावा, असे मत सध्या खेळत असलेल्या एका वरिष्ठ व अनुभवी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे.

भारतीय संघातील मोजक्या वरिष्ठ खेळाडूंपैकी एक असलेल्या आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका सिनियर खेळाडूने अजित आगरकरच्या नावाची मागणी केली आहे. २०२३चा वन डे विश्वचषक होईपर्यंत अजित आगरकर याला संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात यावे अशी मागणी त्या खेळाडूने केली आहे. पारस म्हांबरे हे एक उत्तम गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. भारत अ, भारताचा १९ वर्षांखालील संघ आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील उदयोन्मुख गोलंदाजांना प्रशिक्षक देणं त्यांना नक्कीच जमतं. पण भारतीय संघातील गोलंदाजांना मार्गदर्शन व प्रशिक्षक देण्यासाठी अजित आगरकरसारखा एखादा अनुभवी गोलंदाजच प्रशिक्षकपदी असायला हवा, असं त्या क्रिकेटपटूचं मत आहे.

टी- ट्वेन्टी विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर भरत अरूण यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षकपदी तर भारताचा माजी गोलंदाज पारस म्हांब्रे याची गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु, एका सिनियर खेळाडूच्या मते खास कारणास्तव अजित आगरकरला या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद सोपवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अजित आगरकरने भारतीय संघासाठी २६ कसोटी, १९१ वन डे आणि ४ टी- ट्वेन्टीआंतरराष्ट्रीय सामने खेळले. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५८, वनडेत २८८ तसेच आंतरराष्ट्रीय टी- ट्वेन्टी प्रकारात तीन विकेट घेतल्या आहेत. निवृत्तींनतर अजित आगरक हा समालोचक आणि क्रिकेट जाणकार या भूमिकेत चाहत्यांसमोर आला आहे.

पारस म्हांब्रे यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधून लेव्हल-थ्री कोचिंग डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळवले आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी ते बंगाल, महाराष्ट्र, बडोदा आणि विदर्भ या संघांचे प्रशिक्षक होते. तसेच, त्यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससोबत चार वर्षे काम केले आहे. याशिवाय भारत अ आणि १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -