अरुण बेतकेकर, माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना
सुधीर जोशी म्हणजेच आमचे सुधीर भाऊ. शिवसेनेचे संस्थापक नेते, विभागीय नेते, नगरसेवक, सर्वात तरुण महापौर, आमदार, महाराष्ट्राचे महसूल व शिक्षणमंत्री. एवढे सारे पदरी पडूनही पापभिरू, नाकावर चालणारे सरळमार्गी, सदोदित जमिनीवर पाय, हसरी मुद्रा, कार्यकर्त्यांत रममाण होणारा स्वभावगुण, हजरजबाबी, तल्लख विनोदबुद्धी, मोहक चेहरा, आकर्षक व्यक्तिमत्त्व, वादातीत, अजातशत्रू, उत्कृष्ठ प्रशासक. लिहावे तेवढे थोडके. १९९५ साली प्रथमच महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी सुधीर जोशी यांचे नाव अग्रस्थानी होते. पण वर व्यक्त केलेल्या त्यांच्या स्वभावातील काही सद्गुणच त्यांना भोवले हे दुर्दैव. त्यावेळच्या किचकट राजकीय परिस्थितीनुरूप बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पद बहाल केले. अशा या सर्वगुणसंपन्न नेत्यासंगे काम करण्याचे भाग्य मला लाभले, खूप शिकवले, शिकायला मिळाले. म्हणूनच त्यांचे स्वर्गाच्या दिशेने प्रस्थान जिव्हारी लागले, मनाला चटका देऊन गेले.
शिवसेनेत सुधीरभाऊंनी अनेक भूमिका पार पाडल्या, पूरक निर्मिती केल्या. त्यातील त्यांची सर्वात सुंदर निर्मिती ‘‘स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ’’. त्यांच्याच संकल्पनेतून आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाने १९७३-७४ साली महासंघाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रातील केंद्र व राज्य सरकारी, निमसरकारी तसेच खासगी कार्यालयांतील कर्मचारी भरतीत मराठी माणसास ८०% प्राधान्य हा लढा सुरू झाला. यशस्वीही ठरला. याच माध्यमाद्वारे शिवसेनेसाठी सर्वात मोठी पर्वणी लाभली ती मुंबई महाराष्ट्रातील सुशिक्षित, व्हाइट कॉलर, मध्यमवर्गीय व त्यांचे कुटुंबीय शिवसेनेकडे आकर्षित झाले. या वर्गाच्या शिवसेनेकडे वळण्याने इतिहास घडवला. तो सर्वश्रुत आहे. महासंघ निर्मिती व सुधीरभाऊंची ही दूरदृष्टी शिवसेनेच्या इतिहासातील सोन्याचे पान आहे. मीही सुधीरभाऊंच्या महासंघाद्वारे १९७७ साली बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक झालो. १९८३ साली मी कर्मचारी असलेल्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत लोकाधिकारची शाखा स्थापन केली. यात माझे मार्गदर्शक होते शांताराम बर्डे. तत्पूर्वीच मी कार्यरत झालो होतो. एकेदिवशी सकाळी १०.०० वाजता बर्डे यांनी मला बोलावून घेतले. सुधीरभाऊंच्या दादरस्थित निवासस्थानी नेले. पुढे भाऊंच्या गाडीतून आम्ही मातोश्री गाठली. याची मला कल्पनाही नव्हती. साहेबांशी ओळख करून दिली. चर्चा झाली. बाळासाहेबांनी, जोमाने काम करत राहा, तुमचे भवितव्य चांगले आहे, असा आशीर्वाद दिला. अल्पशा परिचयातच भाऊंनी असे घडवून आणले. हा त्यांचा स्वभावगुण आणि मनाचा मोठेपणा. त्यानंतर लगेच १९८५ साली महासंघाच्या कार्यकािरणीत मला बढती दिली गेली. कार्यकारिणीतील मी वयाने व ज्येष्ठतेतही सर्वात लहान तरीही भाऊंनी ही किमया साध्य केली. तद्नंतर त्यांचा सहवास अनेक वर्षं लाभला. या काळात मी त्यांना एकदाच उद्विघ्न झालेले पहिले. महासंघ कार्यकारिणीची बैठक होती. माझ्यासाठी ती पहिलीच. उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांनी माझ्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले. चव्हाण हे कडवे शिवसैनिक, स्पष्ट वक्ते, शीघ्रकोपी त्यामुळे सगळेच त्यांना वचकून असत. मी स्पष्टीकरण देण्याची विनंती अध्यक्ष सुधीर भाऊ यांच्याकडे केली. भाऊंनी अनुमती दिली. चव्हाणांना हे आवडले नाही. स्पष्टीकरणानंतर ते अधिकच बेभान झाले. बैठक सोडून निघू लागले. या वागण्यावरून भाऊ उद्विघ्न झाले, समज देत म्हणाले, ‘‘अशा पद्धतीने माझ्यासमोर बैठक सोडून निघून जाणार असशील तर तुझ्यासाठी कायमचे दरवाजे बंद.’’ भाऊंचा अाविर्भाव पाहून चव्हाण निमूटपणे स्थानापन्न झाले.
सुधीर भाऊ यांच्यासाठी महासंघाचा कार्यभार हाताळताना एका यक्षप्रश्नी मात्र त्यांना कधीच यश प्राप्त झाले नाही. बाळासाहेबांची मध्यस्थी देखील येथे अयशस्वी ठरली. ठरावीक ज्येष्ठ महासंघ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक विरोध दर्शवत त्यांचा प्रयत्न प्रत्येकवेळी हाणून पाडला. विविध आस्थापनांत लोकाधिकाराच्या शाखा प्रभावीपणे कार्यरत होत्या. तेथील पदाधिकारी कर्मचारी संघटनात जाण्यास उत्सुक होते. भाऊंची काळजी अशी, त्यांच्या कर्मचारी संघटनांत जाण्याने लोकाधिकारकडे दुर्लक्ष आणि कर्मचारी सघंटनेस प्राधान्य. कारण संघटनेसाठी मराठीबरोबरच अमराठी मतदारांना कुरळवावे लागेल. त्याचा विपरीत परिणाम महासंघाच्या कार्यावर होईल. त्यांनी विचार मांडला, लोकाधिकाराने अधिकृतरीत्या कर्मचारी संघटना स्थापन कराव्यात का? बरेच विचारमंथन झाले, बैठका-शिबिरे झाली. या विचारास प्रामुख्याने बँका व विमा कंपन्यांतील पदाधिकारी विरोध करीत होते. यात महासंघाचे मातब्बर नेते, स्वतः सरचिटणीस गजानन कीर्तिकर, उपाध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांचा पुढाकार होता. रिझर्व्ह बँकेतील हे दोघेही कर्मचारी, वर्ग ३ व वर्ग ४ चे नेतृत्व करीत होते, ते कम्युनिष्ट लाल बावटा युनियनद्वारे. त्याचा पुरेपूर उपभोग घेत होते, ते यांना सोडवत नव्हते. त्याचबरोबर भगव्याचे सुखही ह्यांना हवे होते. एका खांद्यावर भगवा, तर दुसऱ्यावर लालबावटा अशी दुहेरी निष्ठा. यास अपवाद स्टेट बँक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कडवट शिवसैनिक. विठ्ठल चव्हाण यांची ते यास कडाडून विरोध करत. तरीही प्रत्येकवेळी वेळ मागत, वेळ मारून नेत विषय टाळण्यात कीर्तिकर-महाडिक यशस्वी होत गेले. तशीच परिस्थिती आजही अखंड सुरू आहे. या प्रयत्नात बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे, ज्यांनी शिवसेनेच्या कारभारात लक्ष घालावयास सुरुवात केली होती, यांच्यासाठी सुधीर भाऊंच्या सूचनेनुसार मी, बँक व विमा कंपनीबाह्य पदाधिकारी म्हणून तटस्थ भूमिका बजावत पार्श्वभूमी व सत्य परिस्थिती मांडत असे. विठ्ठल चव्हाणांप्रमाणेच माझी भूमिका ही लालबावटा त्याग करून शक्ती प्रदर्शनाद्वारे या क्षेत्रातील कर्मचारी संघटना ताब्यात घ्याव्यात व भगवा फडकवावा अशी होती. आजही तसे झाल्यास ती सुधीर भाऊंसाठी खरी श्रद्धांजली ठरेल. पण दुर्दैवाने लोकाधिकार महासंघच आज नाममात्र राहिला आहे. सुधीर भाऊंच्या जाण्याने एक द्रष्ट्ये नेतृत्व विसर्जित झाले. राजहंस पडद्याआड गेला.