नवी दिल्ली : अभिनेते अल्लू अर्जुन याच्या धमाकेदार पुष्पा : दि राईज चित्रपटाला ‘दादासाहेब फाळके फिल्म ऑफ द इयर’ पुरस्कार घोषित झाला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत इंस्टाग्रामद्वारे हे जाहीर करण्यात आले. तसेच पुष्पा चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तुमच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ मिळाले, अशा शब्दात अभिनंदन केले आणि आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
‘पुष्पा’ चित्रपटास अखिल भारतात जोरदार प्रतिसाद लाभला. अल्लू अर्जुन यांनी प्रस्थापित हिंदी चित्रपटांना मागे टाकत अखिल भारतीय स्तरावर ख्याती आणि प्रसिद्धी प्राप्त केली. अनेक क्षेत्रातील मान्यवर देखील ‘पुष्पा ‘चे सामाजिक माध्यमांवर कौतुक करीत आहेत. विविध भाषांमधील आघाडीच्या अभिनेत्यांनी, मान्यवरांनी पुष्पा आणि अल्लू अर्जुनचे जाहीर कौतुक केले आहे.
बाहुबलीद्वारे प्रभास, आरआरआरद्वारे रामचरण आणि ज्युनियर एनटीआर प्रमाणेच अल्लू अर्जुन अखिल भारतीय अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे. बाहुबली दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्याप्रमाणेच दिग्दर्शक सुकुमार देखील पुष्पामुळे प्रकाशझोतात आले आहेत. राजमौली यांच्या सल्ल्यानुसारच पुष्पा हिंदीत प्रस्तुत करण्यात आला.
हिंदी ‘पुष्पा’साठी श्रेयस तळपदे याने अल्लू अर्जुनच्या व्यक्तिमत्वास साजेसा आवाज दिला आहे. अभिनेता अल्लू अर्जुन याचे हिंदी भाषेत मोठ्या प्रमाणात चाहते आणि प्रशंसक आहेत. अनेक वर्षांपासून दूरचित्रवाणीवर, विविध हिंदी चित्रपट वाहिन्यांवर त्यांच्या तेलुगू चित्रपटाच्या हिंदी भागांद्वारे तो संपूर्ण देशात आधीच प्रसिद्ध होते.
पुष्पा हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत इंग्रजी सह-शीर्षकांसह ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. ऍमेझॉन प्राईमवरही चित्रपटास आणि अल्लू अर्जुन याच्या अभिनयास उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
पुष्पा : दि राईज नंतर पुष्पा : दि रुल जास्तीत-जास्त भारतीय भाषांमध्ये प्रस्तुत करण्याचा निर्णय अल्लू अर्जुन याने यापूर्वीच जाहीर केला आहे. दुसऱ्या भागाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे.
पुष्पा : दि राईज आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या सीमावर्ती भागात विशेषतः तिरुपती येथील अरण्यात चंदन तस्करी या विषयावर एका मजुराची आणि त्याने निर्माण केलेल्या साम्राज्याची एक काल्पनिक कथा आहे.