सीमा दाते
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी एकीकडे सुरू असताना राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोप आणि विशेष म्हणजे सुडाचे राजकारण पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीत तिघे मिळून जोर लावत आहेत, तर दुसरीकडे भाजप मात्र एकटाच उभा आहे.
विषय आहे तो म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकण्यासाठी सुरू असलेले राजकारण. पण मुंबईकरांना राजकारण नकोय, तर समाजकारण हवे आहे. पण सध्या तेच होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष केवळ एकमेकांची उणिधुणी काढण्यात कर्तृत्व समजत असतील, पण मुंबईकर मात्र त्याच्या रोजच्या समस्यांनी त्रासला आहे.
सध्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पत्रकार परिषदा, गोंधळ, कार्यकर्त्यांची हाणामारी हे पाहताना केवळ एकच गोष्ट समजते ती म्हणजे राजकीय पक्षांना केवळ निवडणूक जिंकणे महत्त्वाचे वाटत आहे. पण लोकांच्या कामाबद्दल, विकासाबद्दल मात्र काहीच वाटत नाही.
आशियातील श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिका आहे. या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सगळ्याच पक्षांची कसरत सुरू आहे. निवडणुकीसाठी कार्यकर्ते यांची तयारी करत असले तरी पक्षाचे ज्येष्ठ नेते मात्र विविध मार्गांनी निवडणुका कशा जिंकता येतील हे पाहत आहेत.
मुंबईत २५ हून अधिक वर्षे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे याही आगामी निवडणुकीत शिवसेनेला आपली जागा कायम ठेवायची आहे. त्यामुळे लागतील तितके प्रयत्न शिवसेनेला करायचे आहेत. दुसरीकडे मुंबईत शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजप देखील मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे. शिवसेनेला सत्तेपासून कसे दूर ठेवता येईल यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडी झाल्यानंतर नाराज असलेल्या काही कार्यकर्ते आणि नागरिकांमुळे शिवसेनेला काही प्रमाणात फटका बसू शकतो, तर भाजप-मनसेची अँडरस्टँिडंग युती होण्याची शक्यता असल्यामुळे भाजपकडे प्लस पॉइंट असणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आधीपासूनच तयारी करून ठेवली असून मुंबईसाठी महत्त्वाच्या नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, आशीष शेलार, अतुल भातखळकर यांसारखे मोठे चेहरे सध्या उतरले आहेत. लोकांमध्ये जाणे, संवाद साधणे, समस्या सोडवणे ही सगळी कामे या नेत्यांकडून केली जाऊन घराघरांपर्यंत भाजप पोहोचत आहे. इतकेच नाही तर महापालिकेत होत असलेल्या गैरव्यवहारांनादेखील बाहेर काढल्यामुळे या निवडणुकीत भाजपकडे मतदारांचा कौल जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील दादर, दक्षिण मुंबई इथे मात्र भाजपला जोर द्यावा लागणार आहे. सध्या वरळीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. मात्र आताची परिस्थिती पाहता वरळी भागातील मतदार शिवसेनेवर नाराज आहे. कोस्टल रोडच्या कामामुळे कोळी वर्ग देखील नाराज आहे. त्यामुळे कुठे तरी भाजपचे सुरू असलेले प्रयत्न येथे जिंकू शकतात. वरळीत आतापर्यंत भाजप पक्ष दिसत नव्हता. मात्र आता होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी वरळीतही भाजप जोर लावत आहे. विविध समाजउपयोगी कार्यक्रमांसाठी भाजपचे बॅनर आता दिसू लागले आहेत. त्यामुळे वरळीसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे.
२०१७च्या महापालिका निवडणुकीत भाजप अवघ्या काही मतांनी सत्तेपासून दूर राहिला होता, तर मनसेतून शिवसेनेत काही नगरसेवक गेल्याने शिवसेनेचे संख्याबळ वाढले होते. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेना-९९, भाजप-८३, काँग्रेस-३०, राष्ट्रवादी-८, समाजवादी पार्टी-६, मनसे-१, एमआयएम-२ असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांचा विचार करता अवघ्या काहीच मतांचा फरक आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत. पण यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या न झाडता आणि सुडाचे राजकारण न करता मुळात मुंबईकरांचे जे प्रश्न आहेत त्यांचा विचार केल्यास बरे होईल.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आल्या आहेत. एक प्रकारचा वचननामा शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे, असेच वाटत आहे. पण या वचनांची पूर्तता मात्र सत्ताधाऱ्यांनी केली पाहिजे. गेले अनेक वर्षे ही मुंबईची जनता तुम्हाला जिंकवत आहे. त्यामुळे यावेळी देखील राजकारणापेक्षा जनतेचा विचार केल्यास जनता मतदानाकरिता संभ्रमात तर राहणार नाही ना? कोणता पक्ष मुंबईकरांचे भल करेल हे जनतेला ठरवू द्या. आरोप-प्रत्यारोप, गोंधळ, भ्रष्टाचार या सगळ्यांमुळे जनतेला गोंधळात घालू नका.
सध्या भाजपकडूनदेखील मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. कार्यकर्ते संघटन, बुथ संघटन या सगळ्यांच्या माध्यमांतून भाजप मुंबईकरांचे प्रश्न समजून घेत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सत्तेसाठी भाजप देखील तितकाच उत्सुक असल्यामुळे ही निवडणूक तितकीच अटीतटीची होणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे हे पक्ष जरी निवडणुकीत असले तरी गेल्या काही वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेना- भाजपमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात युद्ध रंगणार असे दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक |सेना-भाजपची आहे, असेच म्हणावे
लागणार आहे.