गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी रयतेच्या रक्षणकर्त्याने जन्म घेतला आणि सह्याद्रीला जाग आली. (“सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभूराजा; दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा…”) त्यांनी शौर्याची मशाल पेटवली. त्यांच्या पराक्रमाची, निश्चयाची, निर्धाराची गाथा ऐकतच आम्ही मोठे झालो. “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी!”
एक महान भारतीय राजा, परकीयांशी संघर्ष करून जिद्दीने, हिंमतीने शून्यातून स्वतःचे राज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याच्या स्वराज्याचा भगवा रोवला. “भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही. भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे स्वराज्य, भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती होय.” शिवाजीराजांच्या जन्मदिवशी ‘शिवजयंती’ला शिवरायांचा जयघोष करणे सोपे आहे. त्याऐवजी शिवाजी महाराजांचे समाजाला जीवदान देणारे विचार, जे त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा होती. ती त्यांची शिकवण चरित्रातून जाणून घेऊन त्याचा रोजच्या आयुष्यात उपयोग करू.
लहानपणीच बालशिवाजीला युद्धाभ्यास, रणनीतीचे शिक्षण गुरुवर्य दादाजी कोंडदेवांकडून लाभले. शौर्याचा वारसा पिता शहाजींकडून आणि मातोश्री जिजाऊने शिवाजीच्या हृदयात स्वराज्य निर्माणाची ज्योत प्रज्वलित केली.
शिकवणीत शिवाजीराजे म्हणतात…
१ ‘सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरू, नंतर पालक, नंतर देव.’ सर्वप्रथम स्वतःकडे न पाहता राष्ट्राकडे पाहा.
२ ‘राज्य छोटं का असेना स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण कर, तरच जग तुमचा आदर करेल’. मित्रांनो! आयुष्यात कोणाच्या सावलीखाली उभे राहू नका. झगडल्याशिवाय स्वतःचे अस्तित्व निर्माण होत नाही आणि अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही. त्याचबरोबर स्वतःचे अस्तित्व अबाधित राखता आले पाहिजे.
३ ‘शत्रूची फौज मोजण्यापेक्षा आपल्याजवळील फितूर किती ते मोजा.’ संख्येला महत्त्व कधीच नसते (उदा. कौरवांचे सैन्य). पाय खेचणारे शत्रू (फितूर) नेहमी आपल्याजवळच असतात.
४ ‘शत्रूला दुर्बल समजू नका. पण अधिक बलवान समजून घाबरूही नका.’ प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात काम करताना आजूबाजूच्यांना कमी लेखू नका, स्पर्धेत कोणीही पुढे जाऊ शकतो. न घाबरता काटशह देणे महत्त्वाचे असते. शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई प्रेरणादायी होती. कारण महाराजांच्या मावळ्यांची संख्या कमी आणि तुलनेने शत्रुपक्षाचे सैनिक व युद्धसामग्रीचे बळ नेहमीच प्रचंड असायचे.
५ “समोर संकट दिसले, तर लढायचं. मरण आले तरी चालेल, शत्रूला शरण जाणार नाही की, माघारी फिरायचे नाही” हे त्यांचे ब्रीद होते. त्याच्याच पुढे ते म्हणतात, “विजय त्याचाच होतो, जो विजयासाठी साहस करतो.” शत्रूच्या छावणीत घुसून बोटे छाटणारे, वाघनखे घुसवणारे निर्भीड शिवराय आठवा. आयुष्यात लढा देताना प्रत्येक प्रसंगी ‘मी जिंकणार’ या भावनेतून खेळलात, तरच पुढे जाल.
६ ‘योग्य निर्णय घ्या. परिस्थिती बदल्यास त्याहून जास्त महत्त्वाचे, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य बनवा.’ तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे वाटचाल करताना परिस्थिती बदल्यास, मनासारखे न झाल्यास, लगेच मागे न फिरता, घेतलेला निर्णय योग्य तऱ्हेने फिरवा. “जब हाैसला बुलंद हो, तो पहाड भी एक मिट्टी का ढेर लगता है।” हे ध्यानात ठेवा.
७ प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घ्यायला हवे. युद्धाच्या वेळी काही वेळा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. ते चाैफेर ज्ञान शिक्षणातून मिळते. कोंढाणा किल्ला लढाई न करता स्वराज्यात दाखल झाला. कठीणप्रसंगी वाद-भांडण युक्तीने हाताळता आले पाहिजेत.
८ महाराजांनी बांधलेले गड-किल्ले हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे. आज त्या गड-किल्ल्यांची अवस्था काय आहे? व्यसनाधिनतेकडे वळण्याऐवजी गड चढा. गडाचा इतिहास जाणून घ्या, गडाचे पावित्र्य राखा.
९ ‘कुणाही पुढे वाकणार नाही की, झुकणार नाही’ याची प्रचिती बालवयातच बालशिवाजीने आदिलशाहीला मुजरा केला नाही तेव्हा दिली.
१० ‘शिवाजीराजे कोणत्याही जाती-धर्माविरुद्ध नव्हते, तर ते अन्यायाच्याविरुद्ध होते.’ एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे करणाऱ्यांमध्ये आम्ही नाही. अन्याय करणार नाही आणि सहनही करणार नाही.
११ ‘जाती-धर्माच्या भिंती भेदून माणुसकीने जगायला शिकविणाऱ्या छत्रपतींच्या फौजेत अठरापगड जातीच्या लोकांसह तोफखाना, आरमार अशा महत्त्वाच्या जागी प्रमुख मुसलमान होते.
१२ ‘परस्त्री मातेसमान’ ही शिकवण मोडणाऱ्यांचे हातपाय तोडले जात होते. अशी कडक शिक्षा आजही पाहिजे. छत्रपतींच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही.
१३ विशेष वैशिष्ट्य : शिवाजी महाराजांनी कुठल्याही गडाला देवाचे नाव, लिंबू-मिरची की, सत्यनारायची पूजा केली नाही. समुद्रात आरमार उभे केले. आमावस्या अशुभ न मानता, त्याच काळोख्या रात्रीच गनिमी काव्याने लढाया केल्या आणि ते जिंकले.
१४ शहाजीराजे गेल्यानंतर, जिजाऊला सती न पाठवल्याने शहाजीच्या मार्गदर्शनाची उणीव भरून निघाली.
१५ ‘महाराजांनी दैववाद-अंधश्रद्धा कधीच मानले नाहीत. त्यांचा स्वतःच्या मेंदूवर व मनगटावर विश्वास होता.’
शेवटी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना विनम्र अभिवादन! “झाले बहु… होतील बहु…पण शिवरायांसारखा कोणीच नाही! जय जिजाऊ, जय शिवाजी!”