मनोरंजन : सुनील सकपाळ
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या नव्या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता शशांक केतकर हा सर्वांसमोर येत आहे. १४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मालिकेसह भूमिकेबाबत शशांकने काही महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली…
‘मुरांबा’ मालिकेविषयी काय सांगशील?
‘मुरांबा’ या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ही एक कौटुंबिक गोष्ट आहे. नात्यांमधले ऋणानुबंध, त्यातला गुंता यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. जवळपास दीड वर्षांनंतर लव्हस्टोरी घेऊन भेटीला येतोय. प्रेमात आहेत, त्यांच्यासाठी आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे, त्यांच्यासाठी ‘मुरांबा’ ही मालिका छान गिफ्ट असेल.
तुझ्या लूकविषयी काय सांगशील?
मी आणि माझी बायको प्रियांका नुकतेच आई-बाबा झालो. आई-बाबा झालो असलो, तरी पूर्वीसारखंच फिट राहायचं आहे. वेटलॉस नाही, मात्र फॅटलॉस केला आहे. त्यामुळे नव्या रूपात आणि नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे.
पुन्हा एकदा रोमँटिक भूमिकेत?
मी अनेक दिवसांपासून रोमँटिक भूमिकेची वाट पाहत होतो. भूमिकेबाबत तुम्ही कितीही वेगळा प्रयोग करायला गेलात, तरी लव्हस्टोरीची गोष्टच वेगळी आहे. प्रेक्षकांना लव्हस्टोरी आपलीशी वाटते. मालिकेच्या नावाप्रमाणेच एक आंबट-गोड लव्हस्टोरी आहे. ‘मुरांबा’ ज्याप्रमाणे मुरला की त्याची चव वाढते. अगदी त्याचप्रमाणे मालिकेत नाती मुरताना तुम्ही अनुभवाल. स्टार प्रवाह वाहिनीसोबत जवळपास आठ वर्षांनंतर पुन्हा काम करतोय.
तुझ्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण काय आहे?
अक्षय मुकादम असे माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारा आणि आजीच्या धाकाखाली वाढलेला, असा हा अक्षय. अक्षयला नाती जपायला आवडतात. शशांक आणि अक्षय या दोघांमधलं साम्य असं ती म्हणजे खवय्येगिरी. स्वयंपाकघरात नवनवे प्रयोग करायला मला आवडतात. मालिकेतदेखील माझं स्वयंपाकघराशी जवळचं नातं असणार आहे.
‘मुरांबा’ मालिकेत रमा आणि रेवा यांच्या भूमिका महत्त्वपूर्ण आहेत. मालिकेच्या निमित्ताने रमा आणि रेवाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निशाणी बोरुले आणि शिवानी मुंढेकर पडद्यावरची मैत्री खऱ्या आयुष्यातही जपत आहेत.