Monday, March 17, 2025
Homeसाप्ताहिककोलाजइंडियाच्या ‘फोक डान्सिंग क्वीन’

इंडियाच्या ‘फोक डान्सिंग क्वीन’

स्वयंसिद्धा : प्रियानी पाटील

महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीच्या राजपथापासून ३५ देशांमध्ये पुष्पलता राजपूत यांनी डान्स परफॉर्म केले आहेत. ‘फोक डान्स’वरच त्यांनी आतापर्यंत भर दिला आहे. भारतातील विविध नृत्यांची ओळख घडवण्यासाठी त्यांची धडपड गेली ४० वर्षे अविरत सुरू आहे.

आपलं सारं आयुष्य कलेला वाहून घेताना इंडियन कल्चरलला प्राधान्य देऊन भारतातील मुलांबरोबरच परदेशातील मुला-मुलींनीदेखील भारतीय संस्कृती शिकावी हा अट्टहास बाळगून स्वत: मुबई ते दिल्ली आणि दिल्लीबरोबरच अवघं जग फिरून तिथवर आपली डान्सिंग कला पोहोचवून विशेषत: भारतीय कलेची ओळख करून देणाऱ्या डान्सिंग क्वीन पुष्पलता अरविंद राजपूत यांनी खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य कलेसाठी बहाल केले आहे.

मुंबई, प्रभादेवी येथील पुष्पलता राजपूत या पूर्वाश्रमीच्या पुष्पलता नारायण भाटकर. पहिल्यापासूनच डान्सिंगची आवड, शाहीर अमर शेख यांच्याकडे डान्स शिकता शिकता पती अरविंद यांचेही लाभलेले मोलाचे सहकार्य कलेच्या प्रांतात विशेष ओळख करून देणारे ठरले आहे.

कलेसाठी नवीन कलाकारांना संधी देणे, कोळीनृत्य, क्लासिकल डान्स, कथ्थक, भरत नाट्यम आदी प्रकारातील नृत्याचे धडे केवळ स्वत:पुरते मर्यादित न ठेवता नवे कलाकार घडावेत यासाठी त्यांनी ४० वर्षांपूर्वी अरविंद कलादर्शन नृत्य मंडळ नावाची संस्था सुरू केली. या सस्थेद्वारे अनेक मुलांना डान्सर म्हणून तयार केले आहे. ३५ देशांमध्ये पुष्पलता यांच्या डान्सची छाप उमटली आहे.

दिल्ली येथे २६ जानेवारीला राजपथावर २००० साली पहिले पाऊल ठेवले ते नृत्याच्या माध्यमातून. नागपूरच्या २०० मुलांना घेऊन नृत्याचा केलेला आविष्कार महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळवून देणारा ठरला. तिथपासून सात वेळा प्रथम पुरस्कार मिळाल्याचे पुष्पलता राजपूत यांनी सांगितले.

आदिवासी नृत्य असो किंवा धनगर नृत्य ते शिकण्यासाठी पुष्पलता यांनी स्वत: त्या ठिकाणी जाऊन त्यांची वेशभूषा, त्यांचे दागिने याबाबतचे ज्ञान घेऊन ते कौशल्य आत्मसात केले. स्वत: पुष्पलता या क्राप्ट डिझायनर देखील असल्याने दागिन्यांचे क्राप्ट डिझाइन त्या स्वत: करतात.

स्काऊट गाईडच्या मुलांना कपडे, शूज, शिक्षण देण्यासाठी मदतीचा हात देताना पुष्पलता यांची सेवाभावी वृत्तीही येथे सार्थकी ठरते.

पुष्पलता आिण त्यांचे पती अरविंद राजपूत दोघेही डान्सर, यांमुळे चित्रपटासाठी डान्स ग्रुप तयार करणे, वर्कशॉपच्या माध्यमातून नवीन मुलांना नृत्यकार बनविणे, कोळीवाड्यातील मुलांना डान्स शिकवणे, यासाठी स्वत: मेहनत घेऊन फोक डान्सच्या माध्यमातून इंडियन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आजही ते झटत आहेत.

कला जिवंत ठेवण्यासाठी, थिएटरचे भाडे भरण्यासाठी प्रसंगी पैसे नसताना, पुष्पलता यांनी स्वत:चे मंगळसूत्र गहाण टाकल्याचे कळल्यावर पती थोडे नाराज झाले. पण कलेसाठी हे करताना ‘नवरा हाच मंगळसूत्र आहे’ म्हणून त्यांची काढलेली समजूत कलेसाठी दाद देऊन जाते.

आजवर महाराष्ट्रच नव्हे, तर परदेशात ३५ देशांत आपण डान्स परफॉर्म केल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका, लंडन, वेस्ट इंडिज, कोरिया, बँकॉक, हाँगकाँग, सिंगापूर आदी ठिकाणी भारतातील डान्स कला पोहोचविण्याचे प्रयत्न केले आहेत, तर हॉटेल ताजमध्येही ४ ते ५ वर्षांचे दर १५ दिवसांसाठीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. पण जसं पुढे नेणारे असतात. तसे पाय मागे खेचणारे असतात. पण डान्सिंगचा मार्ग आजवर सोडला नसल्याचे पुष्पलता यांनी सांगितले.

संपूर्ण जगात कलादर्शनच्या माध्यमातून डान्सिंगचा स्त्रोत जपल्याचे असे त्यांनी सांगितले. डान्सिंगची आवड, सेवाभावी वृत्ती, लहानपणी जोपासलेली नृत्यशैली आणि नृत्यकार घडवण्याची उदात्त वृत्ती ज्यांच्यात आहे, त्या डान्सिंग क्वीन पुष्पलता राजपूत अवघ्या महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात आपल्या नृत्यशैलीने वेगळा ठसा उमटवून राहिल्या आहेत. इतकेच नाही तर अनेक नृत्यकार त्यांनी आपल्या संस्थेद्वारे घडवले आहेत.

फोक डान्सवरच त्यांनी आतापर्यंत भर दिला आहे. भारतातील विविध नृत्यांची ओळख घडवण्यासाठी ही धडपड असल्याचे पुष्पलता सांगतात. पत्नीचं कौतुक करताना अरविंद राजपूत देखील भरभरून कौतुक करतात. यामागे सारं पुष्पलता यांचं श्रेय असल्याचे ते सांगतात. नृत्यात बिनधास्तपणाने पुढे आलेली आपली पत्नी सेवाभावी वृत्तीने अनेक नृत्यकार घडविण्यासाठी आजवर प्रयत्नशील राहिल्याचे ते सांगतात.

राजस्थानी नृत्य असो किंवा असो लोकनृत्य, आदिवासी नृत्य. कलेचा आदर आणि कलेला दाद देताना, नव्या नृत्यकारांना घडवताना त्या स्वत: कधी थकल्या नाहीत आणि नव्या नृत्यकारांना दिलेले प्रोत्साहन यातून कलेचा वारसा जपल्याचं फार मोठं समाधान मिळत असल्याचे पुष्पलता आणि त्यांचे पती अरविंद राजपूत आवर्जून सांगतात.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -