Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणे“काही जणांना दुसऱ्याला मुलगा झाल्याचेही श्रेय…!”

“काही जणांना दुसऱ्याला मुलगा झाल्याचेही श्रेय…!”

देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला

ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडल्यानंतर आता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर तोफ डागली आहे. ठाण्यामध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधताना खोचक टोला लगावला आहे.

जुन्या ठाण्यातील अधिकृत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा कायदा आमच्या सरकारच्या काळात झाल्याचा दावा करत सर्वजण आता त्याचे श्रेय घेत असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. कुणाचे लग्न असेल तरी त्याचे श्रेय घ्यायचे आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे, अशी सवय काही लोकांना लागल्याचा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. ठाण्यात शनिवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

“जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासासाठी भाजपा आमदार संजय केळकर यांनीच पाठपुरावा केला होता आणि आमच्या सरकारच्या काळात त्याबाबतचा कायदा तयार करण्यात आला होता. परंतु हा कायदा मंजूर होण्यासाठी एक वर्षाचा काळ का लागला?” असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. “गेल्या काही दिवसांपासून काही लोक आमच्याच प्रेरणातून कामे झाल्याचे सांगत त्याचे श्रेय घेत आहेत. त्यामुळे कुणाचे लग्न असेल तरी त्याचे श्रेय घ्यायचे आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे, अशी सवय काही जणांना लागल्याची” टीकाही त्यांनी केली. “आम्ही केवळ शिवरायांची प्रेरणा घेऊन काम करतोय आणि अन्यायाविरोधात संघर्ष करून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहोत”, असेही ते म्हणाले.

ठाण्यात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवछत्रपतींच्या कार्याचा गौरवर केला. “जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत, तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही आणि म्हणून शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्यासाठी नाही तर त्यांच्या मार्गाने चालण्यासाठी आहे. म्हणून मी खरोखर या ठिकाणी सकल मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम आयोजित करून पुन्हा एकदा तुम्ही हा भगव्याचा जो अलख निर्माण केला आहे, हा भगव्याचा अलख पुन्हा एकदा आमच्यातील छत्रपती जागृत करेल”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -