Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीमातोश्री २ चे बेकायदा बांधकाम पैसे देऊन नियमित केले

मातोश्री २ चे बेकायदा बांधकाम पैसे देऊन नियमित केले

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप!

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचे सांगत महापालिकेने त्यांना नोटीस बजावल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे सामना रंगला आहे. राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

‘उद्धव ठाकरे यांना आता जे मिळाले आहे ती केवळ बाळासाहेबांची पुण्याई आहे. कुठलीही गुणवत्ता आणि पात्रता नसताना ते सव्वा दोन वर्षे मुख्यमंत्रीपदावर आहेत. स्वत:च्या ताकदीवर उभं राहता येत नाही. उभं राहायचं असेल तर दोन माणसं लागतात. मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही, पण दुसरा कोणी माणूस असता तर पदावर राहिला नसता,’ असा जोरदार टोला राणेंनी उद्धव ठाकरे यांना हाणला.

‘माझ्या विरोधात सूडबुद्धीनं राजकारण सुरू आहे. नीतेशच्या विरोधातही अशीच कारवाई करण्यात आली. त्यानं ‘म्यॅव म्यॅव’ केलं होतं. त्या आवाजामुळं कोणाला का त्रास व्हावा? स्वत:ला वाघ म्हणवणाऱ्यांना मांजरीचा आवाज का झोंबला?, असा सवाल नारायण राणे यांनी केला. आता महापालिकेनं बजावलेली नोटीसही सूडबुद्धीची कारवाई आहे. बाळासाहेब असते तर असं झालं नसतं. जुहूतील घर बाळासाहेब असताना मी घेतलं होतं. घर घेत असल्याबद्दल साहेबांनी अभिनंदनही केलं होतं, अशी आठवणही राणेंनी सांगितली. ‘माझ्या घराच्या विरोधात मुंबईतील कोणीही तक्रार केलेली नाही. सिंधुदुर्गातील लोकांनी ही तक्रार केली आहे. त्यात तिथला खासदारही आहे, असं म्हणत राणेंनी विनायक राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

‘आम्ही कधी कोणाच्या पोटावर मारलं नाही, मारणार नाही. लोकांची घरं वसवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, पण इथं उलटं सुरू आहे. लोकांच्या विरोधात कपटकारस्थानं करणारं सरकार महाराष्ट्रात राहू नये अशी प्रार्थना मी आजच्या शिवजयंती दिनी करतो, असंही राणे म्हणाले.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे अडीच वर्ष तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र, तशाच प्रकारचा गुन्हा ठाकरे कुटुंबीयांनी देखील केल्याचा खळबळजनक आरोप भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “माझ्याकडे सगळे पुरावे असून मी ईडीपर्यंत सगळी माहिती पोहोचवली आहे”, असं देखील राणे म्हणाले आहेत. शुक्रवारी शिवसेनेतील चार नेत्यांविरोधात ईडीच्या नोटिसा तयार असल्याचं ट्वीट राणेंनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज केलेल्या आरोपांवर तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

नारायण राणेंच्या जुहूमधील बंगल्यावर मुंबई महानगर पालिकेनं नोटीस बजावली आहे. बेकायदा बांधकामाबद्दल ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर नारायण राणेंनी त्यावर खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. आपण १०० टक्के कायदेशीर बांधकाम केल्याचा दावा राणेंनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, त्यावेळी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले.

पैसे देऊन मातोश्री २ चं बेकायदा बांधकाम नियमित करण्यात आल्याचा आरोप यावेळी नारायण राणेंनी केला. “शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत. त्यांनी एक मातोश्री दुरुस्त केली, मातोश्री पार्ट टू बांधली. आम्ही काही म्हणालो का? भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना मातोश्री दोनचं बेकायदेशीर बांधकाम पैसे देऊन नियमित केलं”, असा दावा राणेंनी केला आहे.

“मी ईडीपर्यंत सगळी माहिती पोहोचवली आहे. भुजबळ अडीच वर्ष आत गेले. तसेच गुन्हे मातोश्रीचे आहेत. त्या दोघांचा सीए एकच आहे. माझ्याएवढी माहिती कुणाला नाही. मी इन्कम टॅक्सलाही दोन वर्ष होतो. भुजबळ ज्या गुन्ह्यात अडीच वर्ष तुरुंगात गेले, त्याच गुन्ह्यासाठी हे का नाही तुरुंगात गेले?” असं राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला. “गेल्या सव्वादोन वर्षात शिवसेना कार्यकर्त्यांना काय मिळालं यापेक्षा मातोश्री आणि चमच्यांना काय मिळालं याची आज ना उद्या चर्चा होईल. शिवसैनिक हे सगळं बघत आहेत. भेटणं नाही, दर्शन नाही. मी कुणाच्या आजारपणावर बोलणार नाही. दुसरं कुणी असतं, तर पदावर राहिलं नसतं. राजीनामा दिला असता. आता उभं राहायलाही दोन-दोन माणसं लागतात. या महाराष्ट्रात अशी पाळी कुणावर आली नाही”, अशा शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

‘दिशा सलियन, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या नाही हत्याच’

दिशा सलियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा काही खळबळजनक दावे केले आहेत. खरंतर राणे कुटुंबियांकडून आधीपासूनच दिशा सलीयनच्या आत्महत्या प्रकरणावर अनेक प्रश्न निर्माण केले गेले होते. तीनं आत्महत्या केली नसून ती हत्या होती, तसंच ती प्रेग्नंट होती आणि प्रेग्नंट असल्यामुळे तिची हत्या केली गेली. आणि ती एका पार्टीमध्ये झाली. पार्टीमध्ये तिच्यावर बलात्कारही करण्यात आला अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे आरोप नारायण राणे आणि त्यांच्या कुंटुंबियांकडून खासकरून नितेश आणि निलेश राणे या नारायण राणेंच्या दोन मुलांकडून वारंवार केले जात होते. त्यासाठी पत्रकार परिषही घेण्यात आली होती. पण आता नारायण राणे यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत या सर्व गोष्टींचा पुन्हा उल्लेख केला. त्यांनी अनेक सवाल या पत्रकार परिषदेत उठवले आहेत.

”दिशा सलियनवर बलात्कार होत असताना त्या फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक पहारा देत होते?..” असा सवाल करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता या प्रकरणाला नव्यानं वाचा फोडली आहे. ८ जूनला दिशा सलियनची हत्या झाली होती. जेव्हा सुशांतला या सर्व प्रकरणाविषयी कळले तेव्हा त्यानं आवाज उठवण्याचं ठरवलं. पण म्हणूनच त्याचीही हत्या करून त्याला शांत करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी दिशा सलियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाविषयी आणखी नवे खुलासे केले. पण या प्रकरणावर पोलिसांकडून मात्र वेगळाच निर्णय याआधीच घेण्यात आला आहे.

पोलिसांनी आता स्पष्ट केलं आहे की या वर्षाच्या सुरुवातीला दिशा सलियन ही केस कोणतेही आरोप सिद्ध न झाल्यामुळे तसंच पुराव्यां अभावी बंद करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी या केसची सखोल चौकशी केली पण कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. दिशा सलियन कोणत्याही पार्टीला उपस्थित राहिली नव्हती. ती प्रेग्नंट नव्हती, ना तिची हत्या झाली आहे. तसंच, तिनं आत्महत्या केली त्या रात्री कोणतीही पार्टी झाली नव्हती. आता दिशा सलियनची हत्या न झाल्याच्या निष्कर्षापर्यंत तपास अधिकारी पोहोचले आहेत. तसंच यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा हात नाही हे देखील पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसंच, दिशा सलियन ही सुशांत सिंह राजपूतचं काम पाहत होती पण मॅनेजर नव्हती. तिचा आणि सुशांत सिंहच्या मृत्यूचा कोणताही संबंध नाही हे देखील तपास अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद केले गेले आहे.

दिशा सलियन मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांकडून बंद करण्यात आल्यामुळे आता नारायण राणे यांनी थेट ठाकरे सरकारला आव्हान देत म्हटलं आहे की, ”आम्ही ही केस पुन्हा उभी करू, कोर्टात न्याय मागू पण शांत बसणार नाही. ठाकरे सरकारला दिशा सलियन, सुशांत सिंह राजपुत संदर्भातल्या अनेत अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावेच लागेल”, असंही केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -