अॅड. हर्षा हेमंत चौकेकर
असंख्य राजे झाले या जगती,
पण, शिवराय जैसा नसे कोणी अवती भवती,
रयतेचा शूर राजा लाभला महाराष्ट्राला,
एकच तो राजा शिवबा जाहला.
शौर्य व धैर्याची मूर्ती, भारताचे शूर पुत्र छत्रपती शिवाजी महाराज एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक होते. एकीकडे ते खूप सामर्थ्यवान होते, तर दुसरीकडे, ते दयाळूपणासाठी देखील ओळखले जातात.
महाराष्ट्राच्या रयतेच्या मनात त्यांनी अधिराज्य गाजवले. अशा छत्रपती शिवरायांना कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या शौर्याच्या कथा येणाऱ्या प्रत्येक पिढीला मोठ्या अभिमानाने सांगण्यात येतात. आजही पोवाड्यातून त्यांच्या गाथा गायल्या जातात. शिवाजी महाराज यांची जयंती हा एक प्रसिद्ध सण स्वरूपात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो.
आपल्याला हे माहितीच आहे की, शिवाजी महाराज घडण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा हा त्यांच्या पालकांचा शहाजी महाराज आणि विशेषतः आई जिजाऊचा आहे. शिवाजी महाराज वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत त्यांच्या आईच्या देखरेखीखाली वाढले. या कालावधीत त्यांच्या आईने त्यांच्यावर जे संस्कार केले ते त्यांनी आयुष्यभर सांभाळले आणि सर्वांसमोर एक आदर्श बालक कसा असावा, याचे उदाहरण ठेवले. हे संस्कार करताना आई जिजाऊंनी त्यांना देव, धर्मभेद, जातीभेद, रूढी, परंपरा यात जखडून ठेवल्याचे शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतल्यास दिसून येत नाही. जिजाऊंनी त्यांना निसर्गनियम, निसर्गातील सत्य, नीतिमत्ता, संयम आणि विवेकाने विचार करण्याची क्षमता, विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता अशा गोष्टी शिकविण्याचे दिसून येते.
वयाच्या पाचव्या वर्षांपासून तेराव्या वर्षांपर्यंत शिवाजी महाराज हे तंजावरला शहाजी महाराजांकडे होते. या कालावधीत शहाजी महाराजांनी त्यांना विविध लढाईचे प्रकार, युद्धकौशल्य, युद्धातील डावपेच, राजकारण, समाजकारण, व्यवहार चातुर्य या प्रकारच्या विषयांचे शिक्षण दिले आणि त्यांना त्या विषयांत पारंगत केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिवाजी महाराज महाराष्ट्रात परत आले आणि पुण्याची जहांगीरदारी सांभाळू लागले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा गड काबीज करून त्यांनी आपल्या कार्यकीर्तीची सुरुवात केली. शिवाजी महाराज हे त्यांच्या आई-वडिलांनी दिलेल्या शिक्षण, ज्ञान, संस्कार यांवर आधारित संपूर्ण जीवन जगले.
त्याचबरोबर आई जिजाऊ आणि वडील शहाजी महाराज हे देखील आपल्या हयातीत शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या पायाभरणीवर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना सुराज्य निर्माण करता आले. यातून मुलांच्या जडणघडणीमध्ये आई-वडिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे दिसून येते.
महाराजांचे सामाजिक धोरण परिवर्तनाच्या दिशेने जाणारे होते. ते प्रजाहित दक्ष राजा होते. ते रयतेचे राजे होते. आपल्या मुलखात शांतता प्रस्थापित करणे, जनतेला निःपक्षपाती न्यायदान करणे, महसूल पद्धतीत सुसूत्रता आणणे, शेतकरी व शेतीला उत्तेजन देणे, मुलखाचे रक्षण करण्यासाठी एका ठरावीक घटकांचे वर्चस्व नाकारून अठरापगड जातींचे सैन्यदल उभारणे, व्यापारासाठी आरमार उभारणे, सुराज्यामागचे मुख्य उद्देश प्रजाहीत असल्याने त्या संबंधाने काटेकोर व कडक धोरण अवलंबिले. हजारो वर्षांपासून प्रचलित असलेल्या अनिष्ट परंपराना विरोध करण्याची तसेच त्या मिटविण्याची हिंमत शिवाजी महाराजांनी केली होती व ते त्यात यशस्वीही झाले होते. स्त्रियांना दास्यत्व अथवा गुलाम म्हणून वापरले जाई. त्यांची खरेदी-विक्री होई. महाराजांनी स्त्री विटंबना, मालकी, दास्यत्व या प्रकारांवर बंदी आणली.
सुराज्यात स्त्रियांना मोहिमेवर नेणे, युद्धात पकडून आणणे, स्त्रीसंबंधित गुन्हे यावर कठोर शिक्षा होती. स्त्रीजातीला त्यांनी संरक्षण दिले व आदराने वागविले. महाराजांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी व उंचावण्यासाठी प्रयत्न केले व स्त्रियांच्या दैनावस्थेला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली. वर्णव्यवस्थेमुळे वर्षानुवर्षे चालत आलेली स्त्री दास्यत्व व गुलामगिरीची प्रथा मोडण्यासाठी शिवाजी महाराजांनी केलेले कार्य हे त्या काळातील स्त्रीमुक्तीसाठी केलेली सामाजिक क्रांतीच होती.
महाराष्ट्रातील डोंगर-दऱ्यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठी राज्याचे बीजरोपण केले. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/किल्लेदार, जनतेवर अन्याय, अत्याचार करत असत.
शिवाजी महाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभासाठी मराठी भाषेला प्राधान्य दिले, त्यामुळे महाराजांना मराठी साम्राज्याचे संस्थापक असेही संबोधले जाते.
शिवाजी महाराज हे नीतिमान राजा होते. नीतिमत्तेच्या तत्त्वावर त्यांनी सुराज्यात लिंगभेद, जातीभेद, धर्मभेद, अंधश्रद्धा या प्रवृत्तींना कोणत्याही प्रकारचा थारा न देता सुराज्याचा राज्यकारभार कर्तव्य, नीतिमत्ता याच्या आधारे राज्यकारभार करणे व सर्वधर्मसहिष्णू आणि समानता या तत्त्वावर राज्यपद्धती स्थापन करण्यावर भर दिला.
वेगवेगळ्या समाजातील लोकांना त्यांची गुणवैशिष्ट्ये ओळखून आपल्या कार्यात समाविष्ट करून घेणे, समाजात रूढ असलेल्या परंपरा, रूढी, मान्यता, विधी, ज्योतिष, यावर अवलंबून न राहता प्रसंगानुरूप कार्याला महत्त्व देणे. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी कार्य करणे. शेतकरी वर्गाचे हक्क, अधिकार यासाठी समाजव्यवस्थेविरुद्ध लढणे आणि त्यांच्यासाठी व शेतीच्या भल्यासाठी विविध पद्धती विकसित करणे, राजा हा लोकांसाठी असतो याचे भान ठेवत लोकाभिमुख राजकारण करणे, यामध्ये शेतकरी आणि कष्टकरी हा समाजव्यवस्थेचा कणा आहे, याची जाणीव ठेवून त्यांच्या हितासाठी कार्य करणे, रयतेची काळजी घेणे, शिवाजी महाराजांचे इतर कर्तृत्व, गुण-वैशिष्टे, नैतिकता, सहिष्णुता, राज्य व्यवस्थापन, सामाजिक नेतृत्व, जनतेचे हित यांसारख्या अनेक बाबी या आजच्या पिढीला आणि समाजाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाच्या आहेत.
शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले सुराज्याचे काम बाबासाहेबांनी तडीस नेले याची प्रचिती भारताच्या संविधानातून दिसून येते; परंतु आपला समाज शिवाजी महाराजांनी केलेले सामाजिक कार्य व त्यांना अपेक्षित असलेले सुराज्य व त्याला अनुसरून असलेले भारतीय संविधान या दोहोंचा एकत्रित अभ्यास करीत नसल्याने अजूनही शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या सुराज्यापासून वंचित आहे.
आपण महाराजांची नुसतीच जयंती साजरी न करता शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारणे, त्यांनी पाहिलेले सुराज्य हे वास्तवात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाऊल उचलले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे, असे वाटते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांना व त्यांच्या कार्याला शतशः नमन.
जय भवानी जय शिवाजी!