Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमोहमयी जाहिरातींचे आभासी जग

मोहमयी जाहिरातींचे आभासी जग

सुमिता चितळे : मुंबई ग्राहक पंचायत

हल्ली खरेदीच्या वेगवेगळ्या साईट्सवर आपल्याला उपयुक्त वाटेल, अशा वस्तूंच्या जाहिराती आपण बघतो. इतक्या आकर्षक की खरेदी करण्याची भूल न पडली तरच नवल. अॅमेझॉनवर २०१९ मध्ये एक काश्मिरी स्कार्फची जाहिरात होती. ‘पण हे स्कार्फ अस्सल काश्मिरी नसून बनावट आहेत. त्यामुळे अॅमेझॉनने त्याची विक्री तत्काळ थांबवावी’ असा आक्षेप एका काश्मिरी उद्योग संस्थेने त्यावर घेतला. त्यावर अॅमेझॉनने वचन दिले की, स्कार्फचा पोत/धागा याची योग्य माहिती दिल्याशिवाय त्याची विक्री करणार नाही. पण अॅमेझॉनने स्वतःचा शब्द न पाळता नुसती या वस्तूंची विक्री चालूच ठेवली नाही, तर त्याचे भौगोलिक क्षेत्र परदेशांपर्यंत वाढवले. त्यामुळे काश्मिरी अँड कॅमल हेअर मॅन्युफॅक्चरर्स इन्स्टिट्यूटने अॅमेझॉनवर नोव्हेंबर २०२१ मध्ये खटला भरला आणि त्यात नमूद केले की, अॅमेझॉनने इतरही काश्मिरी कपड्यांचे मार्केटिंग केले आहे. शिवाय हे कपडे अमेरिका आणि इतर देशांतही अॅमेझॉनच्या साइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये सी.सी.एम.आय.ने अमेरिकेतील विक्रेत्यांना काश्मिरी उत्पादने विकण्यास मनाई करण्याचा ठराव मंजूर केला. पण असे असूनसुद्धा अॅमेझॉनविरुद्धचे हे दावे फेटाळले गेले. यात अॅमेझॉनची वस्तूंची जाहिरात करण्याची पद्धत, स्टार रेटिंग्स आणि फक्त एक विक्रेता म्हणून अॅमेझॉनची जबाबदारी या गोष्टींचा ऊहापोह न्यायालयात केला गेला, एवढेच या खटल्याचे फलित होय असे म्हणावे लागेल.

दुसरे उदाहरण अॅमेझॉन कंपनीचेच पाहू. त्यांच्या मालकीच्या ‘रिंग’ या कंपनीच्या ‘जीवनरक्षक’ या उत्पादनाच्या जाहिरातीचे. हे उत्पादन म्हणजे औषध नसून लाइफ अलर्ट, बटण-अॅक्टिव्हेटेड मेडिकल अलर्ट सिस्टीम अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. अमेरिकेत २०२० मधील याच्या जाहिरातीत ‘मी पडलो आणि मी उठू शकत नाही’ ही टॅगलाइन वापरली होती. या उत्पादनामुळे आम्ही बऱ्याच जणांचा जीव वाचवला, अशी जाहिरातबाजी केली. पण प्रत्यक्षात किती जीव वाचवले याची आकडेवारी मात्र दिली नाही. ‘रिंग’पेक्षा कितीतरी जुनी १८७४ मध्ये स्थापना झालेली एडीटी ही होम सिक्युरिटीमधील सर्वात जुनी कंपनी. अनुभव संपन्नतेमुळे ती इतर कोणत्याही उत्पादकांच्या पेक्षा अधिक सरस जीवनरक्षक उत्पादने बनवण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे त्याची उत्पादने अधिक चांगली असतीलच असे मात्र नाही. म्हणूनच अशा प्रकारच्या फसव्या दाव्यांवर ग्राहकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये अमेरिकेतील औद्योगिक गुन्ह्यांसाठी दंड आकारण्याचा अधिकार असलेल्या फेडरल ट्रेड कमिशनने अनेक उद्योगांना जाहिरातींच्या कायद्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत कळवले आणि सांगितले की, त्यांनी या कायद्यांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यास मोठा आर्थिक दंड भरावा लागेल. यात काही एम.एल.एम. कंपन्याही होत्या.

२०१२ मध्ये अमेरिकेत ‘ट्रूथ इन अॅडव्हर्टीझिंग’ ही संस्था स्थापन झाली. त्यांनी एम.एल.एम. कंपन्या ‘व्यवसायाच्या संधी’ या नावाखाली दिशाभूल करणारे आर्थिक दावे कसे करतात, याचे हजारो पुरावे गोळा केले. या संस्थेने फेडरल ट्रेड कमिशनला एकूण ६३८ एम.एल.एम. कंपन्यांची यादी सादर केली, ज्यांनी त्यांच्या भरती प्रक्रियेत अवास्तव आणि खोटे उत्पन्नाचे दावे केले होते. एफ.टी.सी.ने त्या सर्व कंपन्यांना नोटीस पाठवून कळवले की, त्यांनी फसवणूक करणारे आर्थिक दावे केल्यामुळे त्यांना प्रत्येक गुन्ह्यामागे ४३,७९२ डॉलरचा दंड भरावा लागेल. अमेरिकेतील एम.एल.एम. कंपन्यांनी याची दाखल न घेतल्यास २०२२ या वर्षात त्यांना फार मोठ्या आर्थिक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

‘डार्क पॅटर्न’ नावाच्या ग्राहकांना फसवणाऱ्या योजनांविरुद्ध मोहीम उघडण्याचे ऑक्टोबर २०२१ मध्ये अमेरिकेतील एफ.टी.सी.ने जाहीर केले. या योजनांमध्ये ग्राहकांना सदस्यता घेण्यास उद्युक्त केले जाते व पुढे ती रद्द करायची असल्यास त्यांना वारंवार पैसे द्यावे लागत. यात ग्राहकाची लुबाडणूक होते. एक उदाहरण म्हणून ट्रूथ इन अॅडव्हर्टीझिंग या संस्थेने फेडरल ट्रेड कमिशनला ‘अगोरा’ नावाच्या एका कंपनीची जाहिरात सादर केली, ज्यात त्यांनी वयस्क लोकांना पोषणाची उणीव भरून काढणारे टॉनिक घेण्यास प्रवृत्त केले. हे उत्पादन थोड्याच काळासाठी उपलब्ध आहे आणि मर्यादित साठा आहे, असे सांगून खोटी निकड निर्माण केली. ग्राहकांकडून जास्त नफा मिळवण्यासाठी त्यांना हे उत्पादन लवकर घेण्यास भाग पाडले. अशा प्रकारच्या योजनांमुळे ग्राहक आपली स्वतंत्र विचारशक्ती हरवून बसतात व हेच घातक आहे.

आधुनिक काळातील ग्राहकांसाठी अजून एक फसवी गोष्ट म्हणजे ‘मेटाव्हर्स’, म्हणजे आभासी विश्वात डिजिटल माध्यमातून आपण संपर्कात असणे. सर्व कंपन्या आपल्या उत्पन्नांच्या जाहिरातींचा भडीमार करून याचा फायदा उचलतात आणि लहानथोर या जाळ्यात अडकतात. उदाहरणार्थ, अमेरिकेतील ‘रॉब्लॉक्स’ नावाची कंपनी. याचे अर्धे ग्राहक १३ वर्षांखालील कुमार गटातील आहेत. ही कंपनी या मुलांना भुलवणाऱ्या आभासी विश्वातील गोष्टींचा उपयोग करते. तसेच नायकी, वॅन्स, हुंदाई या कंपन्यासुद्धा याच आभासी जगाचा उपयोग करून आपली जाहिरात करतात. आता ‘मेटा’ म्हणून ओळखले जाणारे फेसबुकही डिजिटल कपड्यांपासून ते डिजिटल घरांपर्यंत हर प्रकारच्या आभासी प्रतिमेच्या जाहिराती दाखवून कोट्यवधी डॉलरचा व्यवसाय करते. पण हे सर्व आभासी जग आहे, यात किती गुंतायचे हे ग्राहकांनी सजगपणे ठरवले पाहिजे.

वरील सर्व उदाहरणे जरी अमेरिकेतील असली तरी भारतातील ग्राहकांनाही ती लागू पडतात. त्यामुळे अशा फसव्या जाळ्यात न अडकता ग्राहकांनी खरे काय ते ओळखून जागरूक राहिले पाहिजे.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -