नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा आणली असली तरीही राजकीय पक्ष प्रचारामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतात. सेंटर फॉर मीडिया स्टडीजने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल ६० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३० हजार कोटी रुपये खर्च झाले होते.
विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये एकट्या भाजपाने ३ हजार ५८५ कोटी रुपये खर्च केले. तर काँग्रेसने १४०५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. हा आकडा २०१५-१६ पासून २०१९-२० पर्यंतचा आहे. ही माहिती राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे.
दरम्यान, यावेळी एकट्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये चार हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. हा पैसा मागच्या दरवाजाने येत असतो. त्यामुळेच निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम पकडली जात आहे.
याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात २० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमधून १९१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. तर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेशात ११५ कोटी रुपयांची रोकड सापडली होती.