Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाभारत सलग दुसऱ्या मालिका विजयाच्या दिशेने

भारत सलग दुसऱ्या मालिका विजयाच्या दिशेने

वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी टी-ट्वेन्टी आज; पाहुण्यांसाठी ‘करा किंवा मरा’

कोलकाता (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी टी-ट्वेन्टी लढत शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) खेळली जाणार आहे. विजयी सलामीनंतर रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांना मायदेशातील झटपट मालिकेतील सलग दुसरी मालिका जिंकण्याची संधी चालून आली आहे.

कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर सुरू झालेल्या टी-ट्वेन्टी मालिकेत यजमानांनी विजयी सुरुवात केली. भारताने पहिल्या सामन्यात ६ विकेट आणि ७ चेंडू राखून विजय मिळवला. विजयी प्रारंभानंतर यजमानांचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे सातत्य राखून दुसऱ्या लढतीसह मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न रोहित शर्मा आणि सहकारी करतील. मध्यमगती हर्षल पटेलसह लेगस्पिनर रवी बिश्नोईने गोलंदाजीत चमक दाखवली. फलंदाजीत कर्णधार रोहितसह इशान किशन तसेच सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यरने महत्त्वपूर्ण योगदान दिले. बिश्नोईने दमदार आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तसेच यजमानांची गोलंदाजी प्रभावी ठरली तरी अनुभवी भुवनेश्वर कुमारसह दीपक चहर या मध्यमगती त्रिकुटाला आणखी अचूक आणि प्रभावी मारा करावा लागेल. अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहललाही नियंत्रित गोलंदाजीवर भर द्यावा लागेल. रोहितने इशानसह झटपट आणि आश्वासक सुरुवात केली तरी माजी कर्णधार विराट कोहलीचा बॅडपॅच सुरूच आहे. यष्टिरक्षक, फलंदाज रिषभ पंतनेही निराशा केली. मात्र, मधल्या फळीतील सूर्यकुमार यादव आणि वेंकटेशमुळे त्यांचे अपयश झाकले गेले.

वेस्ट इंडिजचा संघ हा टी-ट्वेन्टी स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. मात्र, अपयशी सुरुवातीनंतर पाहुण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वनडे मालिकेतील ०-३ अशा व्हाइटवॉशनंतर टी-ट्वेन्टी मालिकेतील पराभव टाळण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. नियोजित कर्णधार कीरॉन पोलार्ड पहिल्या सामन्यात खेळला तरी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो दुखापतीतून अद्याप सावरला नसल्याचे दिसून येत आहे. आघाडी फळीतील निकोलस पुरन आणि काइल मेयर्सने फटकेबाजी केली तरी मधली फळी कोसळली. गोलंदाजीतही रोस्टन चेस वगळता अन्य बॉलर्सनी निराशा केली. त्यामुळे भारताला रोखण्यासह मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी पाहुण्या वेस्ट इंडिजला सर्व आघाड्यांवर खेळ उंचावण्याची गरज आहे.

वेळ : रा. ७.३० वा.

संघ : भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, कुलदीप यादव, दीपक हुडा.

वेस्ट इंडिज – कीरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अँब्रोस, शाइ होप, खेरी पेरी, रोस्टन चेस, अल्झरी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पुरन, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रोमारिओ शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श (ज्युनियर).

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -