क्वीन्सटाऊन (वृत्तसंस्था) : भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी कडवी झुंज दिली तरी तिसरी लढत ३ विकेट आणि ५ चेंडू राखून जिंकताना न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. शुक्रवारी झालेल्या लढतीत पाहुण्यांचे २८० धावांचे आव्हान पार करताना यजमानांना शेवटचे षटक उजाडले.
क्वीन्सटाऊन मैदानावरील सामन्यात फलंदाजांनी वर्चस्व राखले. संपूर्ण लढतीत एकूण सहा अर्धशतके नोंदली गेली. त्यात भारत आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी तीन हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. २८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांना यश आले. त्यात वनडाऊन अमेलिया केर (८० चेंडूंत ६७ धावा), चौथ्या क्रमांकावरील अॅमी सॅथरवेट (७६ चेंडूंत ५९ धावा), मधल्या फळीतील लॉरेन डाऊन (५२ चेंडूंत नाबाद ६० धावा) तसेच तळातील कॅटी मार्टिन यांचे (३७ चेंडूंत ३५ धावा) मोलाचे योगदान राहिले.
फलंदाजांनी तारले. तसेच सलग तिसरा विजय मिळवला तरी न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. भारताची अनुभवी मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामीने तिच्या पहिल्या दोन ओव्हर्समध्ये सलामीवीर आणि कर्णधार सोफी डिव्हाइन आणि सुझी बेट्सला आल्यापावली माघारी धाडले. कॅप्टन खातेही उघडू शकली नाही. झुलनने तिला पायचीत पकडले. त्यानंतर बेट्सचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या षटकातील २ बाद १४ धावा अशा खराब सुरुवातीनंतर यजमानांच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील अनुक्रमे केर आणि सॅथरवेट यांनी शानदार अर्धशतके झळकावतानाच तिसऱ्या विकेटसाठी शतकी (१०३) भागीदारी रचताना न्यूझीलंडला सावरले. केर हिच्या ८० चेंडूंतील ६७ धावांच्या खेळीत ८ चौकारांचा समावेश आहे. सॅथरवेटने ७६ चेंडूंत ५९ धावा करताना अर्धा डझन चौकार मारले.
केर आणि सॅथरवेटनंतर लॉरेन डाऊनने ५२ चेंडूंत ६४ धावांची नाबाद खेळी करताना भारताला पिछाडीवर नेले. तिच्या नाबाद खेळीत ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. लिया तहुहु (१ ) लवकर माघारी परतली तरी कॅटी मार्टिनने डाऊनला चांगली साथ दिली. मार्टिनने ३७ चेंडूंत ३५ धावा काढताना एक चौकार लगावला. सहा विकेट पडल्या तरी डाऊन आणि मार्टिनने खेळपट्टीवर थांबताना न्यूझीलंडला पाच चेंडू राखून जिंकून दिले. भारताकडून झुलन गोस्वामीने (४७ धावांत ३ विकेट) अप्रतिम गोलंदाजी करताना छाप पाडली. रेणुका सिंग, एकता बिश्त, दीप्ती शर्मा आणि स्नेह राणाने प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र, एक शतकी आणि एक अर्धशतकी भागीदारी भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरली. डाऊन हिला वुमन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले.
न्यूझीलंडपूर्वी, भारताचीही फलंदाजी बहरली. सभिनेनी मेघना (४१ चेंडूंत ६१ धावा) आणि शफाली वर्मासह (५७ चेंडूंत ५१ धावा) अष्टपैलू दीप्ती शर्माच्या ६९ चेंडूंतील नाबाद ६९ धावांच्या झटपट खेळीनंतरही पाहुण्यांचा डाव ४९.३ षटकांत २७९ धावांवर आटोपला. मेघनाच्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. शफालीने अर्धशतकासाठी ७ चौकार मारले. दीप्तीने नाबाद हाफ सेंच्युरी लगावताना ७ चौकार आणि १ षटकार ठोकला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचे शेपूट वळवळू दिले नाही. त्यांच्याकडून हॅनन रोव आणि रोझमेरी मेयर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. यजमान गोलंदाजांनी बऱ्यापैकी प्रभावी मारा केला तरी १२ वाइडसह १३ अवांतर धावा दिल्याने भारताला पावणेतीनशेपार मजल मारता आली.
न्यूझीलंडने घरच्या पाठिराख्यांसमोर खेळताना विजयाची हॅटट्रिक साधताना पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. चौथा आणि पाचवा सामना २२ आणि २४ फेब्रुवारीला क्वीन्सटाऊन येथे खेळला जाणार आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात एकमेव टी-ट्वेन्टी सामन्याने झाली. त्यात यजमानांनी बाजी मारली. त्यामुळे शुक्रवारचा हा भारताचा सलग चौथा पराभव आहे.